व्हाटसॲपवर गुप्त एआय चॅटींग : गोपनीयतेची क्रांती अन्‌ आव्हानांची नांदी !

जगातील सर्वाधीक लोकप्रिय असलेला मॅसेंजर प्लॅटफॉर्म अर्थात व्हाटसॲपने आता आपल्या युजर्ससाठी एआयशी चॅटींग करतांना ‘इन्कॉग्नीटो चॅट’ म्हणजेच ‘गुप्त वार्तालाप’ हे नवीन फिचर सादर केले असून ते आपल्याला लवकरच वापरण्यास मिळणार आहे. खरं तर व्हाटसअपवर अनेक नवनवीन फिचर्स सादर करण्यात येत असल्याने ही नवीन सुविधा फारशी नवलाईची नाहीच. तथापि, या माध्यमातून गोपनीयतेच्या क्षेत्रात एका नव्या अध्यायाची सुरवात होत असून व्हाटसअपच्या प्रत्येक युजरने याला समजून घेण्याची गरज आहे.

मेटा, अल्फाबेट आदी कंपन्या युजर्सची माहिती जमा करून त्याच्याशी सुसंगत असणाऱ्या जाहिराती ( टार्गेट ॲड. ) दाखवून पैसे कमावत असल्याची बाब आपणा सर्वांना माहित आहेच. आपण कितीही प्रयत्न केले तरी आपली डिजीटल पदचिन्हे जाणून घेत या जाहिराती आपल्यावर आदळत असतात. अगदी त्याच प्रमाणे चॅटजीपीटी, गुगल जेमीनी, मेटा एआय आदींसारखे एआय टुल्स हे इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरच आपल्या मॉडेलला प्रशिक्षीत करून युजरच्या टास्कचे समाधान करत असतात. या दोन्ही मॉड्यूलमध्ये युजर्सची माहिती हा सर्वात महत्वाचा घटक आहे. आता नेमका हाच भाग जर अदृश्य झाला तर काय होणार ? याचीच प्रचिती देणारे फिचर म्हणजेच व्हाटसॲपचे ‘इन्कॉग्नीटो चॅट’ हे फिचर होय.

इक्नाग्निटो चॅटची कार्यप्रणाली समजून घेण्याआधी आपल्याला व्हाटसॲपवर मेटा एआयची सुविधा वापरता आली पाहिजे. हे टुल एकदम सहजसोपे आहे. आपल्या व्हाटसॲपच्या इंटरफेसवर आस्क मेटा एआय लिहलेली रिंग दिसते. यावल क्लिक करून आपल्याला याचा वापर करता येतो. हे चॅटजीपीटीसारखे एआय टुल असून ते युजर्सला विविधांगी प्रकारे वापरता येते. याआधी मेटा एआय वापरतांना युजर्सने विचारलेले प्रश्न हे व्हाटसॲपच्या चॅट सर्व्हरवर संग्रहीत होत असतात. उदाहरणार्थ मी मेटा एआयला माझ्या वैयक्तीक गोपनीय माहितीच्या आधारे प्रश्न विचारत असतांना ते व्हाटसॲपवर रेकॉर्ड होत असत. अर्थात, यातून माझी गोपनीय माहिती ही व्हाटसॲपकडे जमा होत होती. आता नेमक्या याच समस्येवर समाधान म्हणून इन्कॉग्नीटोची सुविधा देण्यात आली आहे.

सोप्या भाषेत सांगायचे तर, ‘इन्कॉग्नीटो चॅट’ हे मेटा एआय सोबत संवाद साधण्याचे एक सुरक्षीत कवच आहे, जिथे तुमच्या संवादाचा कोणताही ठसा (Digital Footprint) मागे उरत नाही. जेव्हा कुणीही हा मोड सक्रिय करताे, तेव्हा तो व्यक्ती एका ‘डिजिटल ब्लॅक होल’मध्ये प्रवेश करतो. जिथे माहितीवर प्रक्रिया केली जाते, परंतु ती कधीही साठवली जात नाही. मेटाने अधिकृत निवेदनात या फिचरची व्याप्ती स्पष्ट करताना म्हटले आहे की-इन्कॉग्नीटो चॅटमधील युजर्संचे संवाद एका अत्यंत सुरक्षित आणि विलग वातावरणात प्रोसेस केले जातात. या संवादांवर मेटाचे नियंत्रण नसते आणि तांत्रिकदृष्ट्या जगातील कुणीही याला वाचू शकत नाही.

इन्कॉग्नीटो चॅट ही मेटा एआय सोबत संवाद साधण्यासाठी तयार करण्यात आलेली एक विशेष आणि ‘टेम्पररी’ चॅट विंडो आहे. हे सामान्य चॅटपेक्षा तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे भिन्न आहे. विशेष म्हणजे युजरने मेटा एआयची चॅट विंडो बंद करताच ही माहिती पूर्णपणे नष्ट होते. याहून महत्वाची बाब म्हणजे सामान्य चॅट्सचा वापर मेटा आपल्या मॉडेल्सना अधिक स्मार्ट बनवण्यासाठी करू शकते, परंतु इन्कोग्निटो चॅट्समधील डेटा मेटा कंपनीच्याच ‘म्युझ स्पार्क’ किंवा इतर कोणत्याही मॉडेलच्या ट्रेनिंगसाठी वापरला जाणार नाही. अर्थात, यातून युजरची गोपनीयता सुरक्षित राहत असल्याचा दावा मेटा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.

‘इन्कॉग्नीटो चॅट’ हे सुरक्षेचे अभेद्य असे कवच असून ते निश्चीतच युजर्सच्या लाभासाठी आहे. यामुळे कुणीही मेटा एआयला खासगी प्रश्न विचारून समस्यांचे निराकरण करू शकतात. आणि ही माहिती मेटा कंपनीच्या सर्व्हरवर जमा होत नसल्याने कुणीही निर्धास्तपणे याचा वापर करू शकतो. व्हाटसॲपने दहा वर्षांपूर्वीच ‘एंड-टू-एंड एनक्रिप्शन’ हे सुरक्षा कवच प्रदान केले आहे. यामुळे व्हाटसॲपवरून दोन युजर्स हे एकमेकांना संदेश पाठवितात ते फक्त दोन युजर्सच पाहू शकतात. यात अगदी व्हाटसॲप कंपनी देखील ते संदेश वाचू शकत नाही. आता याचीच पुढील आवृत्ती ही ‘इन्कॉग्नीटो चॅट’ होय. खरं तर चॅटजीपीटी मध्ये देखील ‘टेंपररी चॅट’ हे फिचर असले तरी त्याच्यापेक्षा अधिक सुरक्षीत म्हणून व्हाटसॲपचे फिचर असल्याचा दावा मेटा कंपनीने केला आहे.

लक्षणीय बाब म्हणजे याच्या सोबतच मेटा कंपनी व्हाटसॲपवर ‘साईड चॅट’ नावाचे एक भन्नाट फिचर आणत आहे. समजा तुम्ही एखाद्या कम्युनिटी ग्रुपमध्ये किंवा ऑफिसच्या एखाद्या मोठ्या ग्रुपमध्ये आहात. तिथे शेकडो मेसेजेस येतात. एखाद्या विषयाचा संदर्भ आपल्याला समजत नाही, पण ग्रुपमध्ये प्रश्न विचारणे संकोचल्यासारखे वाटते. अशा वेळी ‘साईड चॅट’ फिचरच्या मदतीने कुणीही ग्रुपमध्येच राहून मेटा एआयला खाजगीत विचारू शकता, “या चर्चेचा सारांश काय आहे?” किंवा “या कठीण शब्दाचा अर्थ काय?” हे सर्व इतरांना न कळता घडेल. हे फीचर ‘प्रायव्हेट प्रोसेसिंग’वर आधारित असल्याने तुमची ही खाजगी विचारणा कोणालाही दिसणार नाही. तर याच प्रकारे लवकरच व्हाटसॲपच्या ग्रुपमध्ये प्रायव्हेट चॅटींग देखील करणे शक्य होणार आहे. म्हणजे एखाद्या ग्रुपमधील सदस्याशी आपण इतरांना सुगावा लागू न देता त्याच ग्रुपमध्ये चर्चा करू शकणार आहे.

‘इन्कॉग्नीटो चॅट’चे युजर्सला लाभ असले तरी याची दुसरी बाजू तपासून पाहिली असता अनेक दुष्परिणाम देखील दिसून येतात. अमेरिकेसह युरोपातील अनेक देश व्हाटसॲपच्या अभेद्य सुरक्षा कवचात डोकावून पाहण्याच्या सुविधेची मागणी करत आहेत. कारण त्यांच्या मते सर्व संवाद डार्करूममध्ये होऊन याचा कोणताही पुरावा नसेल तर मग गुन्हेगारी कारवाया शोधणे जवळपास अशक्य होईल. यात विशेष करून दहशतवादी कृत्यांसाठी याचा वापर होण्याचा धोका आहे. न्याय व्यवस्थेत लवकरच एआय चॅटचा पुराव्यासाठी वापर होण्याची शक्यता आहे. अशा वेळी इन्कॉग्नीटो मोडचा वापर करून कुणीही युजर कायदेशीर पळवाट काढू शकतो. यामुळे फॉरेन्सिक ऑडिटिंग आणि पुरावे जतन करण्याच्या प्रक्रियेवर मोठा परिणाम होऊ शकतो. तसेच जर मेटा तुमचे चॅट पाहू शकत नसेल, तर एआयने दिलेली चुकीची माहिती (Hallucinations) सुधारणे या कंपनीला शक्य नाही. उदाहरणार्थ, एआयने दिलेला चुकीचा वैद्यकीय किंवा आर्थिक सल्ला घातक ठरला, तर त्याची जबाबदारी कोणाची ? हा मोठा प्रश्न आहेच. यामुळे मेटा कंपनीने हे फिचर जाहीर केल्यानंतर याच्या बाजूने व विरोधात अनेक मते नोंदविण्यात येत आहेत.

माझ्या मते तरी व्हॉट्सॲपचे ‘इन्कोग्निटो चॅट’ हे डिजिटल गोपनीयतेच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. हे फिचर आणि यातील तंत्रज्ञान गुंतागुंतीचे असले तरी त्याचा उद्देश स्पष्ट आहे-युजरला त्याच्या डेटावर पूर्ण नियंत्रण देणे. शेवटी, प्रश्न तांत्रिक नसून मानसिक आहे. मेटाने आपल्या सिस्टीममध्ये ‘अभेद्य’ भिंती उभ्या केल्या आहेत हे खरे असले, तरी “तुम्ही तुमचे सर्वात वैयक्तिक विचार मेटाच्या एआयला सांगण्याइतपत त्यांच्यावर विश्वास ठेवता का?” हे तुम्हालाच ठरवायचे आहे. एआयच्या या नवीन जगात, गोपनीयता आता लक्झरी नसून तो प्रत्येकाचा हक्क बनत आहे. याचा विचार करता, आपल्या व्हॉट्सॲपमधील इन्कॉग्नीटो चॅट हे या दिशेने टाकलेले एक भक्कम पाऊल आहे हे मात्र निश्चीत !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top