माझ्या नवीन कार्यालयाचे उदघाटन झाल्यानंतर एका मान्यवराने दिलेल्या भेटीप्रसंगी प्रश्न उपस्थित केला की, ”भाऊ…तुमच्या न्यूजरूममध्ये स्टुडिओ कुठे आहे ?” मी त्यांचे छायाचित्र माझ्या मोबाईलमध्ये काढून दोन मिनिटात त्यांना एका भव्य अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरून न्यूजरूमच्या स्टुडिओत बसलेले दाखविले तेव्हा थक्क होण्याची पाळी त्यांची होती. अर्थात, अद्ययावत तंत्रज्ञानामुळे न्यूजरूममध्ये आमूलाग्र बदल होत असतांनाच आता एआयमुळे माध्यमांमध्ये किती जबरदस्त प्रमाणात बदल होतआहेत ? याची चुणूक अलीकडच्या एका घटनेतून दिसून आली असून याबाबत आज भाष्य करावेसे वाटते.

गेल्या काही महिन्यांपासून एपस्टीन फाईल्सने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. याच भयंकर प्रकरणावर ‘द एफस्टीन फाईल्स’ या नावाने ऑडिओ पॉडकास्टची एक मालिका सध्या जगभरात तुफान लोकप्रिय झालेली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये पहिला भाग आलेल्या या मालिकेत अवघ्या सहा आठवड्यांमध्ये तब्बल १२१ भाग लाँच करण्यात आले असून ते लोकांच्या पसंतीस उतरलेले आहेत. आता आपण म्हणाल की-”यात काय विशेष ?” तर यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे हे पॉडकास्ट पूर्णपणे कृत्रीम बुध्दीमत्ता म्हणजेच एआयच्या मदतीने निर्मित करण्यात आले आहे.
याचे निर्माते ॲडम लेव्ही हे पत्रकार नसून तंत्रज्ञ आहेत. त्यांनी एपस्टीन फाईल्सच्या ओपन डोमेनमध्ये उपलब्ध असलेल्या तब्बल पस्तीस लाखांपेक्षा जास्त डॉक्युमेंटस तपासून ही पॉडकास्टची मालिका तयार केली आहे. या कागदपत्रांमध्ये या प्रकरणाशी संबंधीत पुरावे, साक्षी, शपथपत्रे, आरोपपत्रे, न्यायालयीन कामकाजांचे दस्तऐवज, संकेतस्थळांच्या लिंक्स, व्हिडीओज आदींचा समावेश असून या सर्व डेटावर प्रोसेसींग करून सदर मालिका ही ऑडिओ पॉडकास्टच्या स्वरूपात सादर करण्यात आली आहे. स्पॉटीफाय आणि ॲपल पॉडकास्टवर याला अलोट लोकप्रियता लाभली आहे.
सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, या शोने अॅपल पॉडकास्ट चार्ट्सवर सहा आठवड्यात दोन दशलक्ष लोकांनी याला डाऊनलोड केले असून बीबीसी न्यूज आणि एबीसी न्यूज आदीं सारख्या दिग्गज संस्थांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले. यात कोणतीही मानवी मुलाखत किंवा प्रत्यक्ष फील्ड रिपोर्टिंग नाही. तर, यातील सर्व घटक हे मशीन जनरेटेड आहेत. पारंपरीक न्यूजरूमच्या तुलनेत विचार केला तर यात कोणताही मानवी पत्रकार वा कोणती प्रॉडक्शन टीम काम करत नसून या विषयाची प्राथमिक माहिती, संशोधन, संहिता लेखन आदींपासून ते सादरीकरणापर्यंत सर्व बाबी या स्वयंचलीत पध्दतीत करण्यात आल्या आहेत. एका दिवसाला दोन एपीसोड या पध्दतीत ही मालिका सादर करण्यात आली असून तिला युजर्सची पसंती मिळाली आहे. याहून सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एका एपिसोडला एक डॉलर इतक्या अल्प मूल्यात याची निर्मिती झालेली आहे.
अॅडम लेव्हीने कोणत्याही प्रगत कोडिंग ज्ञानाशिवाय क्लॉड ओपस ४.५ या प्रगत टुलचा वापर करून ‘डिस्टिल’ (Distill) नावाचे खासगी अॅप तयार केले. हे अॅप लाखो कागदपत्रांचे विश्लेषण करून त्याचे स्क्रिप्टमध्ये रूपांतर करते. विशेष म्हणजे, एआयने चुकीची माहिती देऊ नये म्हणून लेव्हीने यात ‘कॉन्फिडन्स स्कोअर ऑफ वेरासिटी’ ही प्रणाली वापरली आहे. याशिवाय विविध साधनांचा वापर करून माहितीची पडताळणी केली जाते. यामुळे अतिशय अचूकपणे याची निर्मिती करण्यात आलेली आहे. याच्याच मदतीने त्याने फक्त दोन दिवसात ही पॉडकास्टची मालिका सुरू केली. आता हा बहाद्दर यावरच न थांबता त्याने ‘वॉर डेस्क’ या नावाने नवीन प्रोजेक्ट सुरू केला असून यात इराण युध्दाशी संबंधीत सर्व वार्तांकन स्वयंचलीत पध्दतीत करण्यात येत आहे.
ज्याप्रमाणे विकिपीडियावर प्रत्येक माहितीला पुराव्यांचा आधार असतो, तसेच हे पॉडकास्ट देखील पुराव्यांनी सज्ज आहे. जगातील कोणतीही मोठी वृत्तसंस्था, न्यूज वेबसाईट किंवा डझनावारी पत्रकारांची टीम जे काम महिनोनमहिने करू शकणार नाही, ते ॲडमने एकट्याने आणि एआयच्या मदतीने काही दिवसांत साध्य केले. हे सत्य माहिती मिळविण्याच्या प्रक्रियेतील तंत्रज्ञानाचे श्रेष्ठत्व सिद्ध करते. मानवी पत्रकारांना माहिती जमा करणे वा त्यावर संपादकीय संस्कार करतांना अनेक मर्यादा असतात. त्यांना डेटा फिल्टर करताना अविरत कामामुळे थकवा जाणवू शकतो, पण एआय कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय केवळ पुराव्यांच्या आधारे माहिती मांडू शकते याची प्रचिती या पॉडकास्टमधून आली आहे. अर्थात, यामुळे पत्रकारितेची व्याख्या बदलली असून, ती आता एका ‘ऑपरेटिंग सिस्टिम’ सारखी काम करू लागली आहे. हे मॉडेल अधिक वेगवान, कार्यक्षम आणि किफायतशीर आहे. मीडिया आता केवळ एक ‘आर्ट’ (कला) राहिला नसून, तो एक ‘इंजिनिअर्ड प्रॉडक्ट’ बनल्याचे देखील यातून अधोरेखीत झाले आहे.
सदर पॉडकास्टच्या यशानंतर पारंपारिक पत्रकारांकडून ॲडमवर मोठी टीका झाली. त्यांच्या मते, AI मुळे पत्रकारितेतील सर्जनशीलता आणि मानवी भावनांचा स्पर्श नष्ट होत आहे. यासोबत यात उत्तरदायीत्वाचा अभाव देखील असल्याची टिका करण्यात येत आहे. मात्र, ॲडमचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत स्पष्ट आणि धोरणात्मक आहे. तो स्वतःला पत्रकार म्हणण्यापेक्षा एक ‘ट्रुथ-सीकर’ मानणे पसंत करतो. ॲडमच्या मते, एआय हे पत्रकारिता नष्ट करत नसून ती अधिक पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ करत आहे. जेव्हा माहितीचे स्त्रोत उघड असतात आणि विश्लेषण डेटावर आधारित असते, तेव्हा सत्याची विश्वासार्हता अधिक वाढते. सद्यस्थितीत एआयच्या युगात कंटेंट निर्मिती ही प्रक्रिया अत्यंत स्वस्त आणि सोपी झाली आहे. यामुळे भविष्यात निश्चीतच माहितीचा महापूर येणार आहे. अशा वेळी, सर्वात महत्त्वाचे कौशल्य कोणते असेल? तर ते आहे ‘क्युरेशन’ आणि सृजनशीलतेचे !
ॲडमच्या मते, केवळ एआय वापरून कंटेंट तयार करणे पुरेसे नाही, तर कोणता विषय निवडायचा, त्याला कोणता कोन द्यायचा आणि तो लोकांसाठी आकर्षक कसा बनवायचा ? हे मानवी क्युरेशनवर अवलंबून असते. येथेच मानवी पत्रकारांना वाव आहे. एआयमुळे पत्रकारांचा रोजगार तर जाणार आहेच, पण ज्यांच्यात एआय निर्मित कंटेंटला आवश्यक तेथे सुधारण्याची क्षमता आहे, वा याचा उपयोग करून ते अधिक सृजनशीलता करू शकतील, ते नवीन युगात देखील टिकून राहतील.
‘द एपस्टीन फाईल्स’ हे केवळ एक पॉडकास्ट नाही, तर ते एका अशा भविष्याचे प्रतीक आहे जिथे माहिती मुक्त असेल, पुरावे पारदर्शक असतील आणि निर्मिती स्वायत्त असेल. मीडिया क्षेत्रातील या क्रांतीला आता कुठे सुरुवात झाली आहे, आणि ज्या क्रिएटरकडे ‘क्युरेशन’चे कौशल्य आहे, त्यांच्यासाठी आता एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
येथे एक महत्त्वाचा नैतिक प्रश्न उपस्थित राहतो- एआय पत्रकारितेची कला नष्ट करत आहे की सत्याचा शोध अधिक सुलभ करत आहे? लेव्हीच्या मते, हा संघर्ष पत्रकारिता विरुद्ध ‘सत्यशोधन’ असा आहे. पारंपारिक पत्रकारितेत अनेकदा वैचारिक वा राजकीय अजेंडा असलेले ‘पूर्वाग्रहदूषित विश्लेषक’ माहिती मांडतात. याउलट, एआय-आधारित प्रणाली केवळ उपलब्ध डेटा आणि पुराव्यांवर लक्ष केंद्रित करते, ज्याला ‘ट्रस्टलेस मीडिया’ म्हटले जाते.
एआय-जनरेटेड आशयामुळे पत्रकारितेत बदल होत आहे. पारंपारिक पत्रकारितेत संपादक आणि वार्ताहरांची जबाबदारी स्पष्ट असते. एक घटक माहिती जमा करतो तर दुसरा यावर संपादकीय संस्कार करतो. तर त्यांची साखळी याचे वितरण करते. एआय पॉडकास्टमध्ये ही साखळी अस्पष्ट आहे. किंबहुना यात उत्तरदायीत्वाचा पूर्णपणे अभाव आहे. एआय आवाज मानवी आवाजातील चढ-उतार आणि संभाषणाची शैली इतक्या अचूकपणे नक्कल करतात की, श्रोत्यांना ते अस्सल पत्रकारिता वाटू शकते. तर, एपस्टीन प्रकरणासारख्या संवेदनशील विषयांमध्ये एआय वापरल्यामुळे पीडितांच्या भावनांचा आदर आणि कथानकाची मांडणी यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एआयच्या मदतीने अशा प्रकारच्या तात्काळ अल्प दरात तयार होणाऱ्या कंटेंटचा महापूर येणार असल्याची बाब लक्षात घेतली असता पारंपरीक पत्रकारितेसमोर यामुळे मोठे आव्हान उभे राहणार आहे.
‘द एपस्टीन फाईल्स’चे यश हे सिद्ध करते की एआय हे मानवी पत्रकारांना पर्याय नसून, त्यांच्या क्षमता अनेक पटीने वाढवणारे साधन आहे. यामुळे माहिती केवळ सुलभ होणार नाही, तर ती राजकीय दबावापासून मुक्त आणि अधिक पारदर्शक होईल. डिजिटल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट म्हणून माझा निष्कर्ष असा आहे की, एआयमुळे येणाऱ्या ‘माहितीच्या महापुरात’ केवळ तेच टिकतील जे या तंत्रज्ञानाला आपली ताकद बनवतील. एआयला भीती म्हणून न पाहता, आपली कार्यक्षमता वाढवणारे एक शक्तिशाली साधन म्हणून त्याचा स्वीकार करा. भविष्यातील पत्रकारिता ही केवळ मानवी रिपोर्टिंग न राहता, डेटा, तंत्रज्ञान आणि मानवी क्युरेशन यांचा एक अतुलनीय संगम असेल. तंत्रज्ञानाचा हा स्वीकार केवळ प्रगतीसाठी नाही, तर पत्रकारितेतील सत्यता आणि विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक बनणार आहे.