अमूलची ‘डीप फेक’ जाहिरात आणि एआय बनावट अजेंड्याचा अदृश्य सापळा !

अलीकडेच प्रचंड गाजलेल्या मुंबई येथील महिलेच्या प्रकरणावर अमूल या ख्यातनाम कंपनीने अतिशय खुमासदार पध्दतीत केलेल्या भाष्याची जाहिरात देखील तितकीच गाजली. मात्र काही तासांमध्येच ही जाहिरात अमूल कंपनीने नव्हे तर एआयचा वापर करून तयार करण्यात आल्याची माहिती मिळताच सर्वांना धक्का बसला आहे. आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या जगात खरे आणि खोट्यातील सीमारेषा जवळपास पुसली गेलेली असतांना आता अमूलसारख्या ख्यातनाम ब्रँडची हुबेहुब नक्कल करण्यात येत असल्याची बाब अनेक प्रश्नांना जन्म देणारी असून आपण सर्वांनी याबाबत सजग राहण्याची आवश्यकता आहे.

काही दिवसांपूर्वी महायुतीच्या वतीने मुंबईत महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी काढण्यात आलेला मोर्चा वेगळ्याच घटनेने गाजला. यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना एका महिलेने खडसावल्याचा व्हिडीओ अवघ्या काही क्षणांमध्ये तुफान व्हायरल झाला. यावर अद्याप देखील मोठ्या प्रमाणात चर्वण सुरू आहे. ही घटना घडल्यानंतर काही तासांमध्येच अमूल कंपनीची कथित जाहिरात सोशल मीडियात धडकली. या जाहिरातीचे बारकाईने निरीक्षण केल्यास, त्यामध्ये एक महिला नायकी (Nike) कंपनीचा टी-शर्ट घालून अत्यंत खंबीरपणे एका पोलीस अधिकाऱ्यासमोर उभी असल्याचे दिसते. तिच्या मागे मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांची अस्वस्थ गर्दी स्पष्टपणे रेखाटलेली आहे. जाहिरातीच्या शीर्षस्थानी ठळक अक्षरात “Question karna allowed hai” (प्रश्न विचारणे अधिकृत आहे) असा संदेश होता, तर खाली अमूलचा चिरंतन वारसा सांगणारे ब्रीदवाक्य होते: “Amul. Always speaks up.”

एखाद्या संवेदनशील विषयावर अमूलने केलेले हे धाडसी भाष्य तुफान गाजले. अवघ्या काही तासांमध्ये ही जाहिरात प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली. तथापि, ही जाहिरात आमची नाही ! असे अमूलचे स्पष्टीकरण आले तेव्हा सर्वच थक्क झालेत. लागलीच हे स्पष्ट झाले की ही जाहिरात जनरेटिव्ह एआय या तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली एक अत्यंत प्रगत ‘बनावट’ ( डीप फेक ) कलाकृती होती. या घटनेने केवळ ब्रँडच्या सुरक्षेचा प्रश्नच ऐरणीवर आणला नाही, तर मानवी सर्जनशीलतेच्या भविष्यासमोर एक मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

खरं तर अमूलची बटर गर्ल ही जाहिरातींची मालीका आयकॉनीक समजली जाते. जीवनाच्या विविध पैलूंवर अमूलने अतिशय मिश्कील आणि अनेकदा खुमासदार पध्दतीत केलेल्या या जाहिराती अजरामर मानल्या जातात. 1966 साली सिल्व्हेस्टर डिकुन्हा यांनी तयार केलेली अमूल गर्ल ही आजवर म्हणजे तब्बल साठ वर्षे जाहिरातीच्या क्षेत्रात लोकप्रिय असून जगात सर्वात दीर्घ काळ चालणारी मालिका म्हणून याची नोंद झाली आहे. मोमेंट मार्केटींगच्या क्षेत्रात ही जाहिरात अग्रगण्य मानली जाते. अमूलच्या जाहिरातीची स्वत:ची एक स्वतंत्र दृश्यभाषा असून वर नमूद केलेल्या जाहिरातीत याची तंतोतंत नक्कल करण्यात आल्याची बाब ही जितकी कौतुकास्पद आहे तितकीच धोकादायक देखील असल्याचे आपण समजून घेतले पाहिजे.

आतापर्यंत असे मानले जात होते की, एखाद्या ब्रँडची विशिष्ट दृश्य ओळख (Visual Identity) हे त्याचे सर्वात मोठे संरक्षण कवच आहे. अमूलची ‘बटर गर्ल’ आणि त्यांची विशिष्ट चित्रशैली ही त्यांची बौध्दीक संपदा होती, कारण अशी शैली हुबेहूब निर्माण करणे वेळखाऊ आणि कौशल्याचे काम होते. मात्र या घटनेने असे सिद्ध केले की, दृश्य वेगळेपण आता संरक्षण कवच उरलेले नाही. आता कोणीही एआय वापरून कोणत्याही ब्रँडची हुबेहूब नक्कल करू शकतो. सर्जनशील चित्रकार आणि इलस्ट्रेटर्ससाठी हा काळ केवळ आव्हानात्मक नाही, तर तो त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.

एआयमुळे कलेचे अवमूल्यन होत आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. जेव्हा एखादे अल्गोरिदम मानवी चित्रकाराची वर्षांची तपश्चर्या अवघ्या काही सेकंदात कागदावर (किंवा स्क्रीनवर) उतरवते, तेव्हा त्या कलेच्या मुळावरच आघात होतो. हे केवळ तांत्रिक अपग्रेडेशन नसून चित्रकारांसाठी अस्तित्वाचे संकट आहे. ज्या चित्रकारांनी आपली शैली विकसित करण्यासाठी आयुष्य खर्ची घातले, त्यांच्याच कलेचा डेटा वापरून एआय त्यांना स्पर्धेतून बाहेर काढत आहे. जर एखादा ब्रँड अवघ्या काही मिनिटांत दर्जेदार व्हिज्युअल्स मिळवू शकत असेल, तर तो मानवी चित्रकाराला का नियुक्त करेल? ही केवळ आर्थिक हानी नसून अमूल्य मानवी स्पर्शाचा ऱ्हास आहे. सर्जनशील उद्योगासाठी हा एक अत्यंत कठीण आणि गंभीर टप्पा आहे, जिथे कलेपेक्षा वेगाला आणि खर्चाला महत्त्व दिले जात आहे.

एआय तंत्रज्ञानाने आता दृश्य भाषा म्हणजे ‘व्हिज्युअल लँग्वेज’ डीकोड करण्यात यश मिळवले आहे. पूर्वी एखाद्या ब्रँडची नक्कल करणे कठीण असायचे, कारण त्यासाठी मानवी कौशल्याची गरज होती. याआधी अमूलची जाहिरात बनवण्यासाठी एका कसलेल्या इलस्ट्रेटरला तासनतास काम करावे लागायचे. ब्रँडच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागायचे. तर आज केवळ काही मोजक्या सूचना (Prompts) देऊन एआय टुल्स हे काही मिनिटांत हुबेहूब जाहिरात तयार करू शकते. याचाच अर्थ असा की, ब्रँडची दृश्य ओळख आता सुरक्षित राहिलेली नाही. एआयने ब्रँडचा डीएनए चोरला आहे. एखादा लोगो किंवा विशिष्ट रेखाटन ही आता केवळ त्या ब्रँडची मक्तेदारी राहिलेली नाही. तर कुणीही याला अगदी सहजपणे नक्कल करू शकते.

वास्तविक पाहता एआय कडे कोणताही मानवी मेंदू किंवा कल्पनाशक्ती नसते; तो केवळ ‘पॅटर्न रेकग्निशन’ या प्रणाली द्वारे काम करतो. एआयने अमूलच्या हजारो जुन्या पोस्टर्सचा डेटा अभ्यासून त्यांची ‘व्हिज्युअल लँग्वेज’ आत्मसात केली. यातील पहिला घटक म्हणजे अमूलच्या जाहिरातींमध्ये वापरली जाणारी विशिष्ट रेखाचित्रे, रंगांची छटा आणि साचेबद्धपणा अचूक ओळखून तो नवीन प्रतिमेत उतरवला. दुसरी बाब म्हणजे चालू घडामोडींवर ( उदा. राजकीय पक्षाची रॅली, ट्रॅफिक जॅम व महिलेचा संताप ) त्वरित आणि धारदार भाष्य करण्याची अमूलची जुनी पद्धत एआयने आत्मसात केली. याच्या जोडीला नेहमीच सामाजिक विषयांवर भाष्य करणारा अमूलचा आवाज “Amul. Always speaks up” या ओळीतूनतोच निर्भीड ‘टोन’ हुबेहूब कॉपी करण्यात आल्याने ही जाहिरात अगदी थेट अमूलच्याच शैलीत साकार झाली.

आजवर ब्रँड्स आपला लोगो, रंग आणि फॉन्ट यांवर कोट्यवधी रुपये खर्च करून आपली ओळख निर्माण करायचे. त्यांना वाटायचे की हा आमचा अभेद्य किल्ला आहे. पण एआयने हे सुरक्षा कवच उद्ध्वस्त केले आहे. आता कुणाचीही दृश्य ओळख सुरक्षित नाही. भविष्यात ब्रँड्सना केवळ जाहिरात करून चालणार नाही, तर त्यांना प्रत्येक संदेशाचे प्रमाणीकरण ( व्हेरीफिकेशन ) करावे लागेल. “हा संदेश, जाहिरात वा कलाकृती खरंच आमचीच आहे” हे सिद्ध करण्यासाठी ब्लॉकचेन किंवा डिजिटल सिग्नेचरसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. कृत्रीम बुध्दीमत्तेसारखे प्रगत तंत्रज्ञान आपल्याला उपकारक आहे, यात शंका नाही; पण तेच तंत्रज्ञान सत्याला इतक्या हुबेहूबपणे ‘फेक’ करू शकते की तज्ज्ञही फसू शकतात. याचमुळे आता डीप फेकच्या जोडीला डीप बीलीफ हा देखील मोठा धोका ठरण्याची शक्यता निर्माण झाल्याची बाब आपण लक्षात घेण्याची गरज आहे.

हा विषय केवळ एका गमतीशीर जाहिरातीपुरता मर्यादित नाही. यामागे ‘फेक अजेंडा’ पसरवण्याचे अत्यंत गंभीर राजकीय आणि सामाजिक धोके दडलेले आहेत. जर कोणीही कोणत्याही ब्रँडच्या नावाने आक्षेपार्ह विधाने करू शकले, तर त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. समजा, उद्या एखाद्याने अमूल वा अन्य कोणत्याही कंपनीच्या नावाने एखाद्या धर्माबद्दल किंवा राजकीय पक्षाबद्दल अत्यंत प्रक्षोभक विधान करणारी एआय जाहिरात बनवली, तर काय होईल? संबंधीत कंपनीने स्पष्टीकरण देईपर्यंत समाजात दंगली किंवा मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झालेला असू शकतो. हाच तो ‘फेक अजेंडा’ आहे, जिथे ब्रँडच्या विश्वासार्हतेचा वापर करून लोकांच्या भावनांशी खेळले जाण्याचा धोका आहे.

आजवर डोळ्यांनी पाहिलेले आणि कानांनी ऐकलेले तेच सत्य असे मानले जात असे. तथापि, आपण एका अशा जगात प्रवेश केला आहे, जिथे ही जुनी म्हण आता कालबाह्य झाली आहे. भविष्यात आपण डोळ्यांनी पाहिलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवावा का? की प्रत्येक प्रतिमेच्या मागे असलेला हेतू तपासावा ? तंत्रज्ञान आपल्याला सशक्त करत आहे की आपल्याला फसवण्याचे, भ्रमात टाकण्याचे सर्वात मोठे साधन बनत आहे ? हे प्रश्न आता केवळ ब्रँड्सपुरता मर्यादित नाहीत. तर ते आपल्या सामाजिक स्थिरतेचे प्रश्न बनले आहेत. पुढील वेळी जेव्हा तुम्ही एखादी विलक्षण परिणामकारक जाहिरात पहाल, तेव्हा स्वतःला एकदा नक्की विचारा— “हे सत्य आहे की निव्वळ अल्गोरिदमने तयार केलेला एक आभास ?”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top