मी अनेक विषयांवर लिहतो, अलीकडच्या काळात जाणीवपूर्वक तंत्रज्ञान, एआय आणि यासोबत डिजीटल मीडिया यावरच लक्ष केंद्रीत केले आहे. तथापि, मला सर्वाधीक आवडणाऱ्या विषयावर मी सर्वात कमी लिहलेय, ते क्षेत्र म्हणजे- धर्म व आध्यात्मीकता ! मी माझ्या उमलत्या वयात तारूण्यसुलभ बाबींच्या मागे जितका धावला नसेल तितका स्वत:चा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये उच्च उदात्त आध्यात्मीक विचारांपासून ते ध्यान, योग, उपासना, तंत्र-मंत्र, जारण-मारण ते थेट अगदी अघोरी पंथापर्यंत मी प्रचंड झपाटला गेलो. अनेक कल्ट आणि महाराजांच्या मागे धावलो. यात अनेक चित्तथरारक अनुभव आलेत. माझा प्रवास थांबला तो कॉलेजात शिकत असतांना ओशो रजनीश यांच्याशी पहिल्यांदा पुस्तकांतून आणि नंतर ध्यानातून परिचय झाल्यानंतर ! येथून मी पुढे सर्व शोध थांबविला, किंबहुना शोध आपोआप विरला. यातील पुढील एकमेव स्थानक लागले ते जे. कृष्णमूर्ती यांचे. ओशो आणि कृष्णमूर्ती म्हणजे तत्वज्ञानाच्या क्षेत्रातील दोन उत्तुंग शिखरे ! यातील ओशोंना मी अमृता समान प्राशन केले, तर ओशोंनीच दिलेल्या चिकित्सक दृष्टिकोनामुळे कृष्णमूर्ती यांचे देखील डोळसपणे अध्ययन केले. अलीकडेच जिद्दू कृष्णमूर्ती यांची जयंती साजरी झाली. यानिमित्त दोन शब्द सांगावेसे वाटतात.

मानवी चेतनेच्या इतिहासात गेल्या शतकात सर्वाधीक प्रभाव टाकणारे दोन महापुरूष भारतीय असावेत हा विलक्षण योगायोग होय. यातील ओशो रजनीश हे पॉप्युलर या प्रकारातील होत. कधीकाळी त्यांचे नाव येताच लोकांच्या कपाळावर आठ्या पडत असत, मात्र आज तेच ओशो हे जगात सर्वाधीक वाचले/पाहले/ऐकले जाणारे विचारवंत बनल्याची बाब ही त्यांची महत्ता व काळाच्या कसोटीवर टिकणारा प्रभाव दर्शविणारी आहे. तर जे. कृष्णमूर्ती हे मोजक्या इंटलॅक्चुअल्सच्या पलीकडे पोहचले नाहीत. मी ओशोंचे जवळपास सर्व साहित्य वाचले/ऐकले असून नित्यनेमाने त्यांच्या ध्यानविधी केल्या आहेत. तर कृष्णमूर्ती यांचे मोजके लिखाण वाचनात आले आहे. यात त्यांच्या प्रचंड गाजलेल्या ‘फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम’, ‘फ्रीडम फ्रॉम नोन’ आदींसह अन्य पुस्तकांचा समावेश आहे. यापेक्षा वेगळे ग्रंथ म्हणजे त्यांची ‘कॉमेंटरीज ऑन द लिव्हींग’ ही तीन पुस्तकांची मालिका होय. आपली बहुतांश प्रवचने आणि पुस्तकांमधून तसे निरस वाटणारे कृष्णमूर्ती या जीवनभाष्यांमध्ये विलक्षण प्रवाही व रसाळ वाटतात. याबाबत कधी तर विस्तृत नक्की लिहतो.
कृष्णमूर्ती हे अथांग मनाचा शोध घेतांना एखाद्या कुशल शल्यचिकित्सकासारखे बनतात. ते गोड-गोड बोलून आपल्याला दिलासा देत नाहीत, तर ते अगदी कठोरपणे आरसा दाखवितात. आज आपण एकविसाव्या शतकाच्या पुर्वार्धातील अतिशय गुंतागुंतीच्या जगात वावरत आहोत. या अतिशय ‘कॉम्प्लेक्स’ अशा जगात जे. कृष्णमूर्ती यांचे विचार प्रस्तुत आहेत का ? याची तटस्थ तपासणी आवश्यक आहे. यात आपल्याला दिसून येते की, कृष्णमूर्ती हे केवळ आध्यात्मिक गुरू नव्हते, तर ते मानवी मनाचा खोल अभ्यास करणारे विचारवंत होते. त्यांनी कोणताही धर्म, पंथ किंवा संघटना उभी केली नाही. त्यांनी लोकांना अंधश्रद्धा, भीती आणि मानसिक गुलामीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या मते, “खरे परिवर्तन बाहेरून नव्हे तर आतून घडले पाहिजे.” आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जगात हा विचार अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
जे. कृष्णमूर्ती यांचे विचार वाचणे किंवा ऐकणे म्हणजे स्वतःच्याच मनाच्या आरशात पाहण्यासारखे आहे. आजच्या गोंधळलेल्या, वेगवान आणि तांत्रिक युगात त्यांचे विचार आपल्याला ‘स्थैर्य’ आणि ‘स्पष्टता’ देतात. त्यांच्या शिकवणुकीचा सारांश म्हणजे: “सत्य शोधण्यासाठी तुम्हाला कोणत्याही गुरूची, पुस्तकाची किंवा संस्थेची गरज नाही. तुमच्या स्वतःच्या जीवनाचे सजगपणे निरीक्षण करणे, हेच खरे शिक्षण आणि हीच खरी साधना आहे.” आधुनिक मानवाला जर या तांत्रिक प्रगतीसोबत आनंदी आणि शांत राहायचे असेल, तर कृष्णमूर्तींनी सांगितलेली ‘आंतरिक क्रांती’ अपरिहार्य आहे.
आजचे जीवन अत्यंत गुंतागुंतीचे झालेले असून सोशल मीडियाच्या ‘हायपर कनेक्ट’ युगात मानवाचा एकाकीपणा वाढलेला आहे. यातून अनेक मनोविकार वाढीस लागलेले आहेत. अशा काळात जे. कृष्णमूर्ती हे आपल्याला आज देखील तितकेच महत्वाचे वाटतात. कारण त्यांनी मानवासाठी अत्यंत महत्वाच्या अशा मन या घटकावर केलेले काम होय. त्यांनी ओशोंसारख्या ध्यानविधी दिल्या नाहीत. एवढेच नव्हे तर त्यांनी गुरू-शिष्य परंपरेला देखील नाकारले. तर त्यांनी कोणता संप्रदाय वा संस्थादेखील उभी केली नाही. तथापि, ऋषी व्हॅली सारख्या संस्थांमधून त्यांच्या शिक्षणाविषयक विचारांना साकार स्वरूप मिळालेले आहे.
कृष्णमूर्ती यांचा सर्वाधीक भर हा ‘अवेकनिंग’ अर्थात जागृतीवर होता. त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू म्हणजे ‘स्वतःला जाणणे’. ते म्हणत की मन हे सतत भूतकाळाच्या अनुभवांवर, आठवणींवर, दुखांवर, सुखांवर, अपेक्षांवर आणि सवयींवर प्रतिक्रिया देत राहते. त्यामुळे अनेकदा आपले आजचे जीवन हे प्रत्यक्ष वर्तमानात जगणे नसते, तर भूतकाळाच्या छायेत वा मनावरील संस्कारांवर चाललेले असते. यामुळे खरे जीवन हे मनावरील कोणत्याही ओझ्याविनाच जगता येते. त्यांची शिकवण सोपी वाटते, पण ती खोल आहे. कारण ती आपल्याला स्वतःपासूनच सत्य शोधायला भाग पाडते. आणि स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहणे हे सर्वात कठीण काम असते. तसेच त्यांनी मानसिक बंधनांपासून मुक्तीची शिकवण दिली. आज प्रत्येक जण धर्म, जाती, भाषा, वर्ण, प्रांत आदींच्या भेदांमध्ये अडकलेला असतांना या सर्व बंधनांपासून मुक्त करण्यावर त्यांनी प्रामुख्याने भर दिला आहे. हे करत असतांना त्यांनी परंपरा आणि यातून येणाऱ्या मनाच्या ‘कंडीशनींग’ला नाकारून त्यापासून मुक्ततेची शिकवण दिली.
जे. कृष्णमूर्ती यांच्या विचारांमध्ये एका प्रकारची निर्मळता आहे. ते कोणत्याही संप्रदायात अडकत नाहीत वा कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक अजेंड्याला बळी पडत नाहीत. ते माणसाच्या मानसिक स्वातंत्र्याचा आग्रह धरतात. आणि हेच आजच्या काळात सर्वात मौल्यवान आहे. कृष्णमूर्तींचे महत्त्व यासाठी वाढते कारण त्यांनी कोणतेही तयार उत्तर दिले नाही. त्यांनी “तुम्ही स्वतः निरीक्षण करा” असे सांगितले. आजच्या युगात जेव्हा अनेक लोक मतांचे, ट्रेंडचे, राजकीय नेते व धर्मगुरूंचे आणि प्रभावकांच्या सल्ल्यांचे अनुकरण करतात, तेव्हा स्वतंत्र निरीक्षणाची शिकवण अत्यंत मौल्यवान ठरते.
जे. कृष्णमूर्ती यांची शिकवण ही बुध्दाच्या निकट जाणारी आहे. ते आपल्याला कोणताही दिलासा देत नाहीत, ते परंपरा देत नाहीत, वा शिकवण देत नाहीत. तर ते अंतरापासून खरे जीवन जगण्यास प्रवृत्त करतात. कृष्णमूर्ती यांचा जगावर मोठा प्रभाव आहे. विविध क्षेत्रांमधील नामांकीत व्यक्तींनी त्यांच्या विचारांचा अंगीकार केला. आज देखील कृष्णमूर्ती यांचे विचार तितकेत सार्थ असून जगभरात त्यांना मान्यता आहे. अर्थात, आधी नमूद केल्यानुसार, कृष्णमूर्ती हे जनसमुदायापर्यंत पोहचले नाहीत ही बाब देखील तितकीच खरी !
ओशोंना कुणीही अगदी बाळबोध अवस्थेतूनही समजू शकतात. कारण ते रसाळ आहेत, ते हृदयाची भाषा बोलतात. त्यांच्या शिकवणीत फक्त बौध्दीकता वा ध्यान नसून जीवनाचा उत्सव देखील आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांनी सत्य केवळ शब्दांमधून सांगितले नाही, तर त्यासाठी ध्यानाच्या विधी देखील दिल्यात. तर जे. कृष्णमूर्ती हे याच्या अगदी विपरीत आहेत. त्यांना समजण्यासाठी आपल्याला आधी एक उच्च प्रकारची समज विकसीत करावी लागते. किंवा, तशी तयारी असल्याशिवाय, कुणी त्यांना समजू शकत देखील नाही. यामुळे आजही ते प्रखर बुध्दीमान जनांनाच जास्त भावतात. अगदी समर्पक सांगावयाचे तर- ओशो रसाळ व सुमधुर फळ असेल तर कृष्णमूर्ती हे ड्रायफ्रूट होय. माझे सौभाग्य असे की, या दोन्ही फळांचा मला आस्वाद घेता येतो. मला दोघांमध्ये मजा येते. अर्थात, झुकाव आहे तो रसाळ फळाकडे हे सांगणे नकोच ! कारण त्यांनी विचारांच्या सोबत मार्गदेखील दिलाय हे नाकारता येणार नाही.
जाता-जाता : रविशंकर बल यांचे ‘दोजखनामा’ हे अतिशय नितांतसुंदर असे पुस्तक आहे. यात मिर्झा गालीब आणि सआदत हसन मंटो हे भिन्न कालखंडातील दोन महान प्रतिभावंत एकमेकांशी विस्तृत वार्तालाप करताय असे कल्पनाचित्र दाखवलेले आहे. याच प्रमाणे ओशो आणि कृष्णमूर्ती हे अशाच प्रकारचा संवाद साधताय अशी रचना कुणाला तरी नक्की करता येईल. कारण अनेकदा शक्य असून देखील हे दोन्ही उत्तुंग व्यक्तीमत्व कधीही एकमेकांना भेटले नाहीत. या दोघांचा हृदयस्थ संवाद किती विलक्षण असेल याची कल्पना करून देखील मन रोमांचित होतेय.