आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक नलेल्या चॅटजीपीटीत नेमके काय-काय नवीन फिचर्स येतात याची सर्वांनाच उत्सुकता लागून असते. या अनुषंगाने चॅटजीपीटीची मालकी असणाऱ्या ‘ओपनएआय’ या कंपनीचे सीईओ सॅम अल्टमन यांनी लवकरच या चॅटबॉटवर प्रौढ वापरकर्त्यांना कामुक सामग्री अर्थात ‘इरोटिका’ तयार करता येणार असल्याची घोषणा केली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या निर्णयाला प्रखर विरोध होत असतांना याच्या बाजूने उभे राहणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय प्रमाणात असल्याची बाब अधोरेखीत झाली आहे.
सॅम अल्टमन यांनी एक्सवरून (आधीचे ट्विटर ) पोस्ट करत चॅटजीपीटीवर इरोटिका येणार असल्याची घोषणा केली आहे. चॅटजीपीटीच्या प्रौढ युजर्सशी प्रौढासारखे वागता यावे यासाठी हा निर्ण घेण्यात आल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी वयाची खातरजमा करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी यात नमूद केले आहे. अत्यंत विरोधाभासाची बाब म्हणजे अल्टमन यांनीच दोन महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत चॅट-जीपीटीवर कदापी ‘सेक्सबॉट’ येणार नसल्याचे ठासून सांगितले होते. आता मात्र त्यांनीच घुमजाव करत यावर श्रुंगारीक कंटेंटचा मार्ग मोकळा केला आहे.
चॅटजीपीटीवरील पोर्न तयार करण्याची वा पाहण्याची सुविधा ही कायदेशीररित्या वय पूर्ण केलेल्या युजर्सलाच मिळणार असल्याचे अल्टमन यांनी जाहीर केले आहे. म्हणजेच वयाची खातरजमा केल्यानंतरच कोणताही प्रौढ युजर याचा वापर करू शकेल. साधारणपणे वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्यांना ही सुविधा मिळेल असे मानले जात आहे. यासाठी संबंधीत युजरचे चॅटमधील वर्तनाचे अध्ययन आणि वयाच्या पुराव्याची कागदपत्रे आदींचा समावेश असणार आहे. तथापि, ऑनलाईन मंचावर वयाच्या अटीला सहजपणे भेदण्याचे अनेक उपाय असतांना हा नियम फारसा परिणामकारक राहणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. म्हणजेच अल्पवयीन मुलांना अगदी सुलभपणे ही सुविधा वापरता येणार असून येथेच मोठा धोका असल्याचे अनेकांचे मत आहे.
एलन मस्क यांच्या मालकीच्या ग्रोक एआय या चॅटबॉटवर अलीकडेच श्रुंगारीक सामग्रीसाठी दोन ‘कंपॅनिअन चॅटबॉट’ सादर करण्यात आल्यानंतर ओपनएआयने देखील हाच निर्णय घेतल्याची बाब ही योगायोग नसून नव्या पातळीवरील स्पर्धेकडे अंगुलीनिर्देश करणारा आहे. ग्रोकवर पोर्न सामग्री उपलब्ध होत असतांना आपण मागे का रहावे ? या हेतूने सॅम अल्टमन यांनी याच प्रकारचे फिचर चॅटजीपीटीवर देण्याची तयारी केली असावी असा तर्क अनेकांनी लावला आहे. स्पर्धेत टिकून राहण्याच्या अनिवार्यतेतून हे फिचर उपलब्ध होणार असल्याची शक्यता कुणाला नाकारता येणार नाहीच. तथापि, याचे जागतिक पातळीवर अनेक भयंकर परिणाम होण्याची शक्यता देखील यातून बळावणार असल्याचे दुर्लक्ष करता येणार नाही.
चॅट-जीपीटीच्या या नव्या आगामी फिचरबाबत मानसोपचार तज्ज्ञांनी वेगळीच चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते कोणतीही मशीन ही मानवी शरीरसंबंधांना अचूकपणे कॉपी करू शकणार नाही. कारण यातील भावनांचा कल्लोळ हा यंत्राला कधीही पूर्णपणे ‘मिमीक’ करता येणार नाहीच. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे एआय पोर्नमुळे मानवी श्रुंगारातील ‘फँटसी’ ही पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता असून हा मोठा धोका ठरू शकतो. तसेच वयाच्या अटीला बगल देऊन अबोध वयातील बालकांना या फिचरचा ‘ॲक्सेस’ मिळाल्यास याचे भयंकर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तर प्रौढ युजर्स या सुविधेच्या माध्यमातून एआयचा वापर करत नवनवीन विकृत पोर्नचा आनंद घेतांना त्यांच्या मानसिकतेवर याचा नक्कीच विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे. यातून विलक्षण मानसिक गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका बळावणार आहे. एआय आधीच वर्णभेद, राष्ट्रभेद करत असल्याचे दिसून आले आहे. पोर्न एआयमध्ये देखील याचे प्रतिबिंब उमटण्याचा धोका मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
चॅटजीपीटीवर पोर्नचे आगमन झाल्यानंतर विविध देशांध्ये कायदेशीर पेच निर्माण होणार हे देखील अगदी स्पष्ट आहे. काही महिन्यांपूर्वी एका सोळा वर्षाच्या मुलाने चॅट जीपीटीवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्वत:चे जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली होती. यानंतर त्या बालकाचे पालक हे ओपनएआयच्या विरोधात न्यायालयात गेले आहेत. मानवी लैंगीकतेशी संबंधित अशाच प्रकारच्या अनेक घटना जगभरात होण्याचा धोका यातून बळावणार आहे. तर, जगातील अगदी आघाडीच्या असणाऱ्या अमेरिका व युरोपमध्ये देखील एआय पोर्नबाबत सक्षम कायदे नसल्याची बाब लक्षात घेतली पाहिजे. यामुळे आधुनीक राष्ट्रेदेखील जिथे पोहचू शकत नाहीत अशा एआय पोर्नशी संबंधीत गुन्हेगारीबाबत जगभरातील अन्य देश कशा प्रकारे कायदे करतील ? हा सर्वात मोठा प्रश्न देखील ‘आ’ वासून उभा राहणारच आहे. अर्थात, एआय पोर्नमुळे कायदेशीर बाबींमध्ये निश्चीतपणे मोठा गोंधळ उडणार आहे.
व्हिसीआर, केबल टिव्ही, इंटरनेट तसेच सीडी/डिव्हीडीच्या आगमनाच्या लाटेत कामुक सामग्रीनेच मोठा धुमाकूळ घातल्याची बाब आपल्याला विसरता येणार नाही. याचमुळे एआयच्या नवीन टप्प्यावर पोर्नचा वापर करण्याचा ‘पॅटर्न’ हा एलन मस्कच्या ग्रोक पाठोपाठ ओपनएआयच्या चॅटजीपीटीनेही अवलंबला असल्याचे मत अनेक एक्सपर्टनी व्यक्त केले आहे. हे फिचर डिसेंबर महिन्याच्या प्रारंभी युजर्सला मिळणार आहे. ओपनएआय पहिल्यांदा आपल्या पेड सबस्क्रायबर्ससाठीच याला लागू करण्याची शक्यता आहे. अर्थात, पोर्नच्या ओढीमुळे त्यांचे ग्राहक वाढण्याचे गणित देखील या कंपनीने लावल्याची दाट शक्यता आहे.
या निर्णयामुळे एक मूलभूत संघर्ष समोर आला आहे. एका बाजूला तंत्रज्ञानाची प्रगती आणि ‘प्रौढांना प्रौढांसारखे वागवण्याचे’ तत्त्व आहे, तर दुसऱ्या बाजूला मानसिक आरोग्य, बाल सुरक्षा आणि सामाजिक मूल्यांना असलेले गंभीर धोके आहेत. ओपनएआयने सुरक्षा उपायांचे आश्वासन दिले असले तरी, ऑनलाइन जगात त्यांची अंमलबजावणी करणे किती आव्हानात्मक असेल, हे येणारा काळच ठरवेल.
एकंदरीत पाहता, चॅटजीपीटीवरील पोर्नची ‘एंट्री’ होण्याआधीच ती वादात सापडली आहे. अनेक देशांमध्ये हे फिचर बॅन होण्याची शक्यता देखील आहेच. मानव करत असलेली विविध कामे हे एआय सहजपणे करत असतांना आता एआय मानवी लैंगीकतेला देखील कॉपी करत युजर्सला सादर करणार आहे. ओपनएआय कंपनीला यातून कदाचित रग्गड उत्पन्न देखील मिळू शकते. तथापि, ही बाब नैतिक, कायदेशीर, सामाजिक आयामांमधून योग्य आहे का ? या प्रश्नांचा सुज्ञपणे विचार केल्यास बहुतेकांचे उत्तर नाही हेच येणार आहे. मात्र, तुमच्या आमच्या मताला किंमत तरी आहे का ? याचा विचार देखील आपल्याला करावा लागणार आहे. चॅटजीपीटीवर जेव्हा पोर्न येईल, तेव्हा त्यापासून आपण, आपले कुटुंबिय आणि आप्तांना कसे वाचवता येईल ? एवढे मात्र आपण करू शकतो. कारण आपल्या हातात तेवढेच उरणार आहे…!