वेदनेचा स्वर : मजाज लखनवी !

जावेद अख्तर यांची ‘मै और मेरी आवारगी’ ही रचना मला खूप आवडते. मग ती नज्मच्या स्वरूपात मुक्तछंदातील वाचन असो, किशोरदांच्या आर्त स्वरातील दुनिया या चित्रपटातील गीत असो वा नुसरत फतेह अलींच्या काळीज चिरणाऱ्या सुरातील गायन ! मला हे काव्य हृदयस्पर्शी वाटते. याच्यापेक्षा काळीज विदीर्ण करणारी गजल ही जावेद अख्तर यांचेच मामा मजाज यांनी याआधी अनेक दशके आधी लिहून ठेवली आहे. याच मजाज यांची आज जयंती. यामुळे आज त्यांचेच स्मरण !

असरारुल हक उर्फ मजाज लखनवी हे शायरीतील उत्तुंग नाव… एक तेजस्वी पण शापीत तारा ! इंग्रजीत ज्या प्रकारे जॉन कीटस्‌ त्याच प्रकारे उर्दूत मजाज यांना मानले जाते. खरं तर, शायरीत प्रेमाचे अनेक विलोभनीय प्रकार दिसून येतात. तथापि, मजाज यांनी इष्काला इन्कलाबशी जोडले. त्यांच्या काव्यात हळूवार प्रेमाची अनुभुती तर आहेच, पण क्रांतीच्या ज्वाला देखील आपण अनुभवू शकतो. त्यांनी आपल्या काव्यात प्रगतीशीलता दर्शविली. खालील काव्यपंक्ती याची ग्वाही देतात.

तेरे माथे पे ये आँचल बहूत ही खूब है लेकीन ।
तू इस आँचल से इक परचम बना लेती तो अच्छा था ॥

महिलांनी आयुष्यात काही तर करावे असा संदेश यात दिला आहे. मजाज यांच्या काव्यात असा आशावाद अनेकदा व्यक्त करण्यात आल्याचे दिसून येते. कॉलेजात असल्यापासूनच मजाज यांच्या प्रतिभेने उत्तुंग झेप घेतली. शिकत असतांनाच त्यांचा ‘आहंग’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असता त्याला उदंड लोकप्रियता लाभली. यामुळे विशेष करून ते तरूणींच्या गळ्यातील ताईत बनले.

तलत यांच्या आवाजातील गीत

मजाज यांच्या समवयस्क आणि अलीगडच्याच रहिवासी असणाऱ्या दिग्गज लेखीका ईस्मत चुगताई यांनी त्याच्याबाबत तरूणींमधील क्रेझबाबत अतिशय भरभरून लिहले आहे. एकीकडे अनेकींच्या स्वप्नाचा राजकुमार असणाऱ्या मजाजला मात्र खरे प्रेम मिळाले नाही. तीसच्या दशकात नव्यानेच सुरू झालेल्या ‘ऑल इंडिया रेडिओ’त त्यांना नोकरी लागली. अर्थात दिल्लीस येण्याआधीच मजाज यांची लोकप्रियता येथे पोहचली होती. त्यांना भेटण्यासाठी तीन मैत्रीणींनी चक्क ‘लकी ड्रॉ’ काढला. यात शेहनाज अहमद या तरूणीचे नाव निघाले, आणि तिने मजाजला फोन करून घरी आमंत्रीत केले. पहिल्याच भेटीत मजाज तिच्या प्रेमात पडला आणि त्याचे आयुष्य विस्कटले !

शेहनाज ही प्रतिष्ठीत घराण्यातील आणि विवाहित महिला मजाजच्या प्रेमात आकंठ बुडाली. या घटनेने एकीकडे मजाजला जीवन जगण्याची व सृजनाची प्रेरणा मिळाली. मात्र त्याला बदनामीला सामोरे जावे लागले. याच काळात त्याचे मद्यपानाचे व्यसन बळावले. शेहनाजचे पती अहमद खान हे युरोपला जाण्यासाठी मुंबईला गेले असता मजाज देखील त्यांच्या सोबत गेला. मात्र यासाठी सुटी न घेतांना मुंबईस गेल्यामुळे मजाजची नोकरी गेली. तर शेहनाजच्या पतीने तिला मजाजला भेटण्यासाठी मज्जाव केला, अन्‌ तो उन्मळून पडला.

घरापासून शेकडो किलोमीटर दूरवर मुंबई सारख्या महानगरीत बेरोजगारी आणि प्रेमभंगाच्या आघाताने जर्जर झालेल्या मजाजच्या लेखणीतून ‘आवारा’ ही अजरामर कलाकृती साकारली. त्याच्या विमनस्क मनस्थितीचे विदारक दर्शन तर यात आहेच पण यात प्रस्थापितांविरूध्दच्या ठिणग्या देखील आहेत.

ही केवळ वैयक्तिक दुःखाची कविता नाही, तर ती सामाजिक विषमतेवर आणि बंडखोरीवर केलेले एक शक्तिशाली भाष्य आहे. मजाज यांनी आपल्या वैयक्तिक वेदनेला वैश्विक रूप दिले.

शहर की रात और मैं नाशाद ओ नाकारा फिरू ।
जगमगाती जागती सड़कों पे आवारा फिरू ।।
गैर की बस्ती है कब तक दर बदर मारा फिरू ।
ऐ गमे दिल क्या करूं, ऐ वहशते दिल क्या करूं ।।

या ओळींमध्ये कवीचे एकटेपण, निरर्थकतेची भावना आणि दिशाहीन भटकणे स्पष्ट दिसते. मजाज यांचा भ्रमनिरास केवळ अमूर्त नाही, तर तो अत्यंत वैयक्तिक आहे. ते चंद्रासारख्या सौंदर्याच्या पारंपरिक प्रतीकाची मोडतोड करतात. ज्या समाजाने अफवांच्या आधारे त्यांना दोषी ठरवले, त्याच समाजाच्या नैतिक स्तंभांवर ते हल्ला तर समाजाच्या ढोंगीपणावर थेट प्रहार करतात.

‘आवारा’ ही कविता अजरामर आहे कारण ती वैयक्तिक भावना आणि राजकीय विचार यांचा एक परिपूर्ण संगम आहे. मजाज यांनी आपल्या प्रेमभंगाच्या विशिष्ट वेदनेला वैश्विक रूप दिले आणि एका हरवलेल्या प्रेमाची आणि नोकरीची कहाणी शोषणाविरुद्धच्या कालातीत गीतात बदलली. ही कविता एकाच वेळी एका प्रेमवीराचा विलाप आहे, एका समाज क्रांतिकारकाची गर्जना आहे आणि समाजाने बहिष्कृत केलेल्या प्रत्येक आत्म्याचे कालातीत गीत आहे.

जगजीतसिंग यांच्या आवाजातील गीत

मजाज, ज्यांचे आयुष्य एका ‘अपूर्ण गझल’ सारखे होते, ते आपल्या मागे एक असा संपूर्ण आणि शक्तिशाली वारसा सोडून गेले आहेत. मजाज़ यांनी समाजातील विषमता आणि सत्तेच्या अन्यायावर थेट टीका केली आहे. ‘मुफ़लिसी और ये मज़ाहिर हैं नज़र के सामने आणि सैकड़ों सुल्तान-ए-जाबिर हैं नज़र के सामने’ यांसारख्या ओळींमधून त्यांची सामाजिक जाणीव स्पष्ट दिसते. ही कविता केवळ दुःखात संपत नाही, तर ती एका शक्तिशाली क्रांतीचे आवाहन करते. ‘लेके एक चंगेज़ के हाथों से ख़ंजर तोड़ दूँ’ यांसारख्या ओळींमधून त्यांचा बंडखोरपणा दिसतो

मजाज हयात असतांनाच त्यांची ‘आवारा’ ही गजल 1953 साली आलेल्या ‘ठोकर’ या चित्रपटात गीताच्या स्वरूपात जगासमोर आली. तलत मेहमूद यांच्या मखमली आवाजासोबतच याच चित्रपटात आशा भोसले यांनी देखील अतिशय समरसून हे गीत गायले आहे. रसिकांचा याला उदंड प्रतिसाद लाभला. यानंतर अनेक गायकांनी हा कलाम पेश केला. यात जगजित सिंग यांनी गायलेले गीत देखील प्रचंड गाजले.

आशा भोसले यांच्या आवाजातील गीत

प्रेमभंग, दारिद्र्य आणि अतिमद्यपानाचे व्यसन यामुळे मजाज हे खंगत गेले. दोनदा त्यांचा नर्व्हस ब्रेकडाऊन झाला. त्यांना वेड्यांच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. अनेकदा प्रयत्न करून देखील ते व्यसन टाळू शकले नाही. अखेर 5 डिसेंबर 1955 रोजी वयाच्या अवघ्या 44 व्या वर्षी मजाज यांनी शेवटचा श्वास घेतला. आज त्यांना जाऊन सात दशके झाली तरी मजाज नावाचे गारूड अद्याप जिवंत आहे. अजूनही त्यांचे काव्य रसिकांच्या मनाचा ठाव घेते. त्यांच्या अनेक कविता, गजल या रसिक आजही गुणगुणतात. आणि निश्चीतच ‘आवारा’ ही यातील मुकुटमणी होय !

प्रसिद्ध कवी फिराक गोरखपुरी यांनी मजाज़ यांच्या काव्याचे वर्णन ‘प्रगतिशील कवितेचा जाहीरनामा’ असे केले होते. हे वर्णन ‘आवारा’सारख्या कवितांमुळे सार्थ ठरते. मात्र, त्यांच्यातील ही क्रांतिकारी आग अखेरीस वैयक्तिक निराशेच्या वादळात विझून गेली. मजाज़ लखनवी यांचे हे अपूर्ण काव्य आधुनिक उर्दू साहित्यातील सर्वात अविस्मरणीय आणि प्रभावी अध्यायांपैकी
एक आहे, जे आजही वाचकांच्या मनावर खोलवर परिणाम करते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top