गुगलच्या ‘नॅनो बनाना’ या टुलवरील नवनवीन ट्रेंडसमुळे संपूर्ण जगात धमाल सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी चॅटजीपीटीच्या ‘घिबली इफेक्ट’ने असाच धुमाकूळ घातला होता. आता याची कुणाला आठवणही येत नाही. याचप्रमाणे सध्या सुरू असलेली क्रेझ ही लवकरच ओसरणार हे नक्की ! तथापि, नॅनो बनानाच्या वापरातून युजर्सच्या गोपनीय माहितीच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत असून यामुळे अनेक जण संभ्रमात पडले आहेत.

गुगल नॅनो बनाना आणि तत्सम टुलवर फोटो अपलोड केले असता याचा गैरवापर होण्याची शक्यता असते असा इशारा काही तज्ज्ञांनी दिला आहे. विशेष करून गुगल कंपनी एआयला प्रशिक्षित करण्यासाठी याचा वापर करत असल्याचा आरोप यातून करण्यात येत आहे. तर अलीकडेच एका तरूणीने ”आपण अपलोड केलेल्या फोटोत हातावरील तिळ दिसत नसतांना देखील इफेक्ट देऊन तयार करण्यात आलेल्या प्रतिमेत तो आला कसा ?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. या बाबींमुळे युजर्सची गोपनीयता ( प्रायव्हसी ) धोक्यात आल्याचा समज पसरला असून तो बरोबर देखील आहे. तथापि, आपण आजवर इतक्या बेसावधपणे सोशल मीडिया तसेच स्मार्टफोनादी उपकरणांचा वापर केलाय की, आता ठरविले तरी गोपनीयता बाळगून काहीही उपयोग होणार नसल्याचे माझे मत आहे. यासाठी मी माझा स्वत:चा अनुभव कथन करतो.
मी वैयक्तीकरित्या इंटरनेट आणि सोशल मीडियाचा सर्वात आधी स्वीकार केला होता. माझा shekhar**3@rediffmail.com हा पहिला ई-मेल 2000 सालचा असून मी गेल्या पंचवीस वर्षापासून याचा वापर करत आहे. माझे युट्युबचे पर्सनल लॉगीन हे याच ई-मेल वरून 26 डिसेंबर 2006 रोजीचे असून हे अकाऊंट अजूनही सुरू आहे. मी फेसबुक 2007 साली तर ट्विटर 2009 साली जॉईन केले होते. मी सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात सक्रीय होतो. मध्यंतरी यापासून विराम घ्यावा म्हणून फेसबुकवरून एक्झीट केली. आणि दीड वर्षानंतर अलीकडेच पुन्हा यावर आलो.
माझ्या सोशल मीडियावरील ‘हायपर ॲक्टीव्ह’ कालखंडात देखील मी माझी कोणतीही पर्सनल माहिती फेसबुक, ट्विटर, युट्युब व व्हाटसअप वर टाकली नाही. मुले शाळकरी वयात असतांनाचे फोटो टाकले होते, नंतर ते देखील डिलीट केले. हा अपवाद वगळता मी काहीही वैयक्तीक शेअर केले नाही. यात मी आणि माझ्या कुटुंबियांसह निकटच्या मित्रांची वा आप्तांची माहिती, छायाचित्रे, विवरण आदींची माहिती जाहीरपणे सांगितली नाही. मी काय खरेदी केले ? कुठे फिरलो ? कुणाला भेटलो ? मी खुश आहे की नाराज ? या कोणत्याही बाबी मी शेअर केल्या नाहीत. तसेच, कुणाचा प्रचार वा हेटाळणी देखील केली नाही.
बरं, माझ्या घरातील सदस्यांना देखील सोशल मीडियाचे फारसे अप्रूप नाही. माझ्या पत्नीला अनेकदा आग्रह केल्यावर ती काही दिवस फेसबुकवर आली. मात्र तिला हे ‘रिकामपणाचे काम’ वाटल्याने तिने अकाऊंट डिलीट केले. ती आता व्हाटसअप ग्रुप्स आणि युट्युबवर रमते. मुलगा आणि मुलगी हे देखील कामचलावू वापर करतात. ते फेसबुकवर नसून फक्त स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम, युट्युब आणि व्हाटसअप वापरतात. त्यांचा ॲप्रोच अगदी ‘कॅज्युअल’ असाच आहे. इतके सारे करून देखील माझी सर्व माहिती ही टेक कंपन्यांना असल्याची जाणीव मला अनेकदा झाली.
जाणीवपूर्वक खूप काळजी घेऊन देखील मला माझ्या गोपनीयचेचा भंग झाल्याचे अनेकदा दिसून आले. यात वेबसाईट व अकाऊंट हॅकींगपासून ते अन्य बाबींचा समावेश होता. खरं तर, आपण जे काही करतो ते आपला स्मार्टफोन, लॅपटॉप, पीसी आदींसह विविध कंपन्यांच्या सर्व्हरवर अंकीत होत असते. याचाच टेक कंपन्या व्यावसायिक वापर आणि गैरवापर देखील करत असतात. याचा प्राथमिक प्रकार म्हणजे ‘टार्गेट ॲड’ अर्थात डिजीटल माध्यमांवर दिसणाऱ्या जाहिराती होत.
आपण जे काही सर्च करतो त्याच्याशी संबंधीत जाहिराती आपल्याला विविध वेबसाईटवर दिसतात. यातील दुसरा प्रकार म्हणजे ‘अल्गोरिदम’ होय. आपण सोशल साईटवर जे काही सर्च करतो, त्याच्याशी संबंधीत काँटेंट आपल्याला वारंवार दिसू लागते. आता एआयचा वापर विपुल प्रमाणात होत असल्याने अगदी एखाद-दुसरी पोस्ट जरी पाहिली तरी आपल्या टाईमलाईनवर त्याच्याशी संबंधीत पोस्ट मोठ्या प्रमाणात अवतरतात. आता सोशल साईट आपल्याला फुकट वापरायला मिळत असल्याने या बाबी आपल्याला सहन कराव्या लागतात. तथापि, याच सर्व डेटाचा गैरवापर करून हॅकर्स आणि स्कॅमर्स हे युजर्सला अडचणीत आणतात. आणि ‘त्यांना ही माहिती नेमकी कुठून मिळते’ ? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
अलीकडच्या काळात तर माझ्या सोबत दोन धक्कादायक घटना घडल्या. गेल्या महिन्यात एक पत्रकार मित्र माझ्या कार्यालयात आला. आमची डिजीटल काँटेंटबाबत चर्चा सुरू असतांना अमुक कंपनीचा वायरलेस माईक चांगला असल्याचे मी त्याला सांगितले. अमेझॉनच्या स्वातंत्र्य दिनाच्या सेलमध्ये हे मॉडेल उपलब्ध असल्याचे मी नमूद केल्यानंतर आम्ही दोघांनी यावर अल्प चर्चा केली. थोड्या वेळात त्या मित्राने मोबाईलवर सर्फींग सुरू करताच त्याला त्याच कंपनीच्या माईकची जाहिरात दिसली तेव्हा आम्ही दोन्ही थक्क झालो.
याचाच अर्थ असा की, आमची चर्चा ही स्मार्टफोनमधील कोणत्या तरी ॲपने ऐकून तात्काळ ‘टार्गेट ॲड’ दाखविली. यानंतर मी माझ्या स्मार्टफोनवरून सर्फींग केले असता हा प्रकार घडला नाही. म्हणजे-माझ्या मित्राच्या मोबाईलमध्ये कोणते तरी ॲप हे त्याच्या भोवतालचा आवाज देखील टिपत असल्याची बाब स्पष्ट होती.
यानंतरची घटना तर अजून धक्कादायक आहे. मी एका जागतिक पातळीवरील ख्यातनाम पेड टेलीग्राम ग्रुपमध्ये असून यात एआयवर अतिशय सखोल चर्चा होत असते. यात स्मार्टफोनवरील टेलीग्राम ॲपवर संबंधीत ग्रुपमध्ये ‘एआय ऑटोमेशन’ बाबतची समस्या मी लिहून टाकली. यावर ग्रुपमधील अन्य तज्ज्ञ सदस्य उत्तर देतील याची वाट मी पाहू लागलो. यासाठी थोडा वेळ लागेल म्हणून मी युट्युबवर गेलो असता थक्क होण्याची वेळ आली.
कारण मी टेलीग्रामच्या ग्रुपमध्ये जो प्रश्न टाकला त्याच्याशी संबंधीत व्हिडीओज मला दिसू लागले. आता टेलीग्राम ॲप हे व्हाटसअप प्रमाणेच ‘एंड-टू-एंड एनक्रिप्टेड’ ( हे एक प्रकारचे अभेद्य कवच होय ! ) असल्याने यावरील माहिती ही कुठेही बाहेर जाणार याची खात्री असतांनाही हा प्रकार असल्याने मला धक्का बसला. मी लागलीच याचा स्क्रीनशॉट काढून त्याच ग्रुपमधील मान्यवरांना- ”हे कसे घडले असावे ?” असा प्रश्न विचारला.
यावर एका तज्ज्ञाने मी टेलीग्रामवर प्रश्न टाकला असला तरी तो टाईप करतांना थर्ड पार्टी कि-बोर्ड ॲपचा वापर केल्याने ही माहिती बाहेर जाऊन लागलीच युट्युबच्या अल्गोरिदमने याच्याशी संबंधीत व्हिडीओज दाखविल्याचे सांगितले. यानंतर त्यांच्या सुचनेनुसार मी स्मार्टफोनच्या कि-बोर्डवरूनच त्या ग्रुपमध्ये दुसरा प्रश्न विचारला असता या वेळेस मात्र युट्युबवर त्याच्याशी संबंधीत काहीही दिसले नाही.
म्हणजेच, आपण कितीही काळजी घेतली तरी आपली माहिती टेक कंपन्यांकडे जात असतेच. याला कुणीही आळा घालू शकत नाही. जरी समजा मी नॅनो बनाना वा अन्य ॲप वापरत नसलो तरी माझ्या स्मार्टफोनमधील सर्व डेटा ( यात माझे पर्सनल फोटो, व्हिडीओज आलेच ! ) हे ॲक्सेस करण्याची परवानगी मी आधीच बहुतांश ॲप्लीकेशन्सला देऊन टाकलेली आहे. यामुळे तो डेटा एआयला प्रशिक्षित करण्यासाठी वापरला तरी मला याची जरा देखील माहिती मिळणार नाही. एका व्यापक अर्थाने आपण स्मार्टफोन वा अन्य उपकरणे वापरत इंटरनेटशी कनेक्ट असलो की, आपली डिजीटल गोपनीयता जवळपास पूर्णपणे संपुष्टात आलेली असते.
या सर्व बाबींचा विचार करता, आता कुणीही गुगल जेमीनी नॅनो बनाना वा अन्य टुलवरून आकर्षक फोटो इफेक्ट तयार करण्यासाठी स्वत:चे फोटो अपलोड करत असतील तर प्रायव्हसीचा मुद्दा हा कितपत विचारात घ्यावा लागेल ? याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. टेक कंपन्यांकडे आपली संपूर्ण डिजीटल कुंडली आधीच असून यात एखाद्या फोटोमुळे फार काही फरक पडेल असे नाही. खरं तर, फोटो अपलोड करतांना थोडी काळजी घेतली तरी पुरे ! यात अपलोड करण्यात आलेल्या फोटोंच्या जीपीएस लोकेशनसह अन्य माहिती काढून टाकावी; कोणतेही टुल वा ॲप वापरतांना ते युजर्सकडून काय परमीशन्स घेतात ? याचे बारकाईने अवलोकन करावे आदी सावधगिरी बाळगली तरी धोका बराच कमी होऊ शकतो. ( तो पूर्ण टळत नाही, हे माझे मत होय ! )
टेक कंपन्यांकडे जगभरातील अब्जावधी लोकांची छायाचित्रे, व्हिडीओज आदींसह ब्राऊजींगच्या माहितीचा संग्रह आधीच आहे. या माहितीवर प्रोसेसर करूनच नॅनो बनाना तसेच अन्य टुल्स आणि ॲप्स तयार करण्यात आलेली आहेत. यामुळे कुणाच्या एखाद-दुसऱ्या फोटोमुळे फार काही गोपनीयता धोक्यात येईल असे नाही. कारण कुणीही ही साधने वापरली नाही तरी देखील त्यांची प्रायव्हसी आधीच भंग झालेली आहे. यामुळे मनात शंका असेल तर थोडी काळजी घेऊन बिनधास्तपणे कोणतेही टुल वापरून आकर्षक फोटो इफेक्टची मजा लुटा, या प्रतिमांना आनंदाने सोशल मीडियात शेअर करा. प्रायव्हसी गेली उडत. . .
जाता-जाता- माझी मुलगी इंजिनिअरिंगला ( एआय अँड डीएस ) शिकते. काही दिवसांपूर्वी तिला एका प्रोजेक्टसाठी माझी मदत लागली. मी चॅट-जीपीटीवर दीड-दोन तास घालवून माहिती संग्रहीत केली. आणि हे करतांना मुलीसोबत चर्चा देखील करत होतो. याआधी माझ्याच अकाऊंटवरून मी बराच वेळ काम करत होतो. म्हणजे साधारणत: चॅट-जीपीटीवर माझे तीनपेक्षा जास्त तास झाले.
आम्ही पुढील कमांड देऊ तोच चॅटमध्ये मॅसेज आला- ”हॅलो शेखर, आज बराच वेळ काम करतोय. थोडा विरंगुळा हवा असल्यास मराठी, हिंदी वा इंग्रजीतील काही गाणी सजेस्ट करू का ?” या न मागता मिळालेल्या सल्ल्यामुळे मी अक्षरश: उडालोच ! कारण मी चॅट-जीपीटीवर प्रदीर्घ काळ बसलोय हे त्या बॉटला माहित असणे स्वाभाविक आहे. यातून मी थकू शकतो हा अंदाज देखील तो लाऊ शकतो. तथापि, मी विरंगुळ्यासाठी खूप गाणी ऐकतो ती देखील मराठी, हिंदी आणि इंग्रजीतील हे त्याला कसे समजले ? एआय आपल्याला अनेकदा भयचकीत करते ते असे….!