संगीत, मौन व प्रेमाचा अद्वैत सोहळा आणि पंचमदांच्या प्रतिभेची ‘भैरवी’ !

असंख्य रसिकांच्या भावविश्वातील एक महत्वाचा घटक असणारे महान संगीतकार आर. डी. बर्मन उर्फ पंचमदा यांची जयंती ! खरं तर ते संगीतातील एक कलंदर व्यक्तीमत्व. नवनवीन प्रयोग करणारे, भारतीय व पाश्चात्य सुरावटींच्या फ्युजनचे आद्य प्रवर्तक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विलक्षण उर्जावान संगीताचे प्रणेते म्हणून आपण सर्व रसिक त्यांना ओळखतो. आज त्यांचे स्मरण करतांना अनेक गाण्यांचा रसास्वाद घेतला. तथापि आज त्यांच्या जयंती निमित्त मला खूप आवडणारे आणि पंचमदांच्या कारकिर्दीच्या शिखरावरील शेवटच्या सृजनापैकी एक असणाऱ्या ‘१९४२-अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटातील ‘कुछ ना कहो-कुछ भी ना कहो !’ या गाण्याबाबत दोन शब्द सांगावेसे वाटतात.

शेखर पाटील

साठीच्या दशकाच्या मध्यावर आलेल्या ‘तिसरी मंजील’ या चित्रपटातील गाण्यांनी हिंदी सिनेसृष्टीला आर.डी. बर्मन यांच्या रूपाने एक नवा संगीत सम्राट दिला. यानंतर सत्तरचे संपूर्ण दशक धुमाकूळ घातल्यानंतर ऐशीच्या प्रारंभीही आर.डी. यांची जादू कायम होती. तथापि, अर्जुन आणि सागर चित्रपटानंतर अचानक त्यांना अपयशाचा फटका बसला. खरं तर त्यांना चित्रपट मिळत गेले, तथापि, त्यांना यश न लाभल्याने आर.डी. संपले अशी आवई उठली. मग काय…त्यांच्या अगदी जवळच्या असलेल्यांनी देखील पाठ फिरवली.

अनेक चित्रपट दिग्दर्शकांनी शब्द देऊनही त्यांना काम दिले नाही. (राम लखन हे त्याचे मोठे उदाहरण !) सिनेसृष्टीची निष्ठुरता अशी की, कधी काळी ज्यांचे नाव हीच यशाची हमी होती असे पंचमदा लोकांच्या विस्मरणात जाऊ लागले. त्यांच्यावर बायपासची शस्त्रक्रिया झाली. ते शरीर व मनाने पूर्णपणे खचलेले असतांनाच विधू विनोद चोप्रा यांनी आधी त्यांना परींदा मध्ये संधी दिली. यातील संगीतही गाजले. आणि नंतर त्यांनीच अत्यंत महत्वाकांक्षी अशा १९४२-अ लव्ह स्टोरी या चित्रपटासाठी पंचमदा यांची निवड केली तेव्हा अनेकांनी चोप्रा यांना वेडात काढले. मात्र खिन्नपणे आपल्या करियरची उतरण पहात असलेल्या आर. डी. बर्मन यांनी आपल्या प्रतिभेची अशी काही विलक्षण झेप या चित्रपटात घेतली की, सर्वच जण अक्षरश: थक्क झालेत.

वास्तविक पाहता, या चित्रपटातील सर्वच गाणी अवीट गोडीची आहेत. यात एक लडकी को देखा तो, रिमझीम रिमझीम, दिल ने कहा चुपके से, रूठ ना जाना आदींना रसिकांनी उदंड पसंती दिलेली आहे. तथापि, माझ्या मते तरी यातील ‘मास्टर पीस’ म्हणजेच-कुछ ना कहो, कुछ भी ना कहो ! हेच गीत होय. हे
गाणे केवळ एक लोकप्रिय रोमँटिक गीत म्हणून मर्यादित राहिले नाही, तर ते दोन हृदयांमधील एका निःशब्द, शब्दातीत संवादाचे मनमोहक प्रतीक बनले.

हे गाणे म्हणजे सुरांच्या माध्यमातून मांडलेली एक प्रगल्भ दृश्य कविता आहे, जिथे शब्दांच्या मर्यादा स्पष्ट होतात आणि शांतता स्वतःच एक वैश्विक भाषा म्हणून उभी राहते. एक रसिक म्हणून जेव्हा आपण या कलाकृतीकडे पाहतो, तेव्हा आपल्याला त्यात केवळ चाल दिसत नाही, तर त्यात पंचमदांच्या आयुष्यातील संघर्षाचा अर्क, जावेद अख्तर यांच्या लेखणीतील तात्विक खोली, कुमार सानू यांच्या आवाजातील किशोर कुमार यांच्या वारशाचा मखमली पोत आणि याला पडद्यावर साकारणाऱ्या विधू विनोद चोप्रा यांच्या सौंदर्यबोधाचे एक अफाट दर्शन घडते.

या गाण्याची निर्मिती प्रक्रिया मोठी विलक्षण आहे. आर. डी. बर्मन यांनी याला आधी उडत्या चालीत तयार केले होते. त्यांनी विधू विनोद चोप्रा यांना जेव्हा ही चाल ऐकविली तेव्हा ते संतापले. त्यांनी संयत पण ठाम शब्दात आपल्याला बाजारशरण नव्हे तर आधीचेच प्रतिभावंत पंचमदा हवेत असे सांगितले. यानंतर आर.डी. यांनी चाल बदलवली जी चोप्रा यांनी एका फटक्यात मान्य केली. हे गाणे पहिल्यांदा कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात ध्वनीमुद्रीत करण्यात आले. तर पंचमदांच्या मृत्यूनंतर लता मंगेशकर यांच्या आवाजत देखील सॅड व्हर्जन रेकॉर्ड झाले. तथापि, याला लोकमान्यता मिळाली ती कुमार सानू यांच्या आवाजानेच !

खरं तर, कुमार सानू हे कारकिर्दीच्या शिखरावर होते. कुछ ना कहो गाणे रेकॉर्ड करण्याच्या काळात ते कामात विलक्षण बिझी होते. एकदा या गाण्याची रिहर्सल करण्यासाठी त्यांना पंचमदांनी बोलावले. त्यांनी एका टेकमध्येच ते ध्वनीमुद्रीत केले. यानंतर बाहेर येऊन त्यांनी आर. डी. यांना मुख्य गाण्यासाठी केव्हा येऊ ? असे विचारले. यावर त्यांनी-‘तू रिहर्सल केलेले गाणेच फायनल झालेय’ असे सांगितले. आणि यानंतर जो घडला तो इतिहास आपल्या समोर आहेच.

कुछ ना कहो या गाण्यात काळजाचा ठाव घेणारे संगीत, याला उंचीवर नेणारे शब्द, गायकाचा स्वर्गीय सूर आणि याला चित्रीत करणाऱ्या वातावरणाचा विलक्षण मिलाफ आहे. कॅनव्हासवरील ‘व्हाईट स्पेस’ वा वर्तमानपत्राच्या मांडणीतील रिकामी जागा ही खूप महत्वाची मानली जाते. याच प्रकारे संगीतात वाद्ये वा गायकाच्या सुरासोबतच यातील ‘विराम’ हा महत्वाचा असतो. यामुळे या गाण्याच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेणे म्हणजे संगीतातील ‘मौनाचे सौंदर्यशास्त्र’ समजून घेण्यासारखे आहे.

पंचमदांचे एक सर्वश्रुत तत्व होते की, “संगीत म्हणजे केवळ आवाजांचे संकलन नव्हे तर दोन सुरांच्या मधली शांतता हेच खरे संगीत होय.” या गाण्यात त्यांनी या तत्त्वाचा पराकोटीचा वापर केला आहे. जेव्हा कुमार सानू एक ओळ गातात आणि त्यानंतर जे काही क्षणांचा सांगीतिक विराम येतो, ते मौन श्रोत्याला स्वतःच्या भावनांमध्ये डोकावण्याची मुभा देते. पंचमदांच्याच ‘चिंगारी कोई भडके !’ या अभिजात गाण्यात त्यांनी ज्या प्रकारे विरामाचा वापर केलाय अगदी त्याचीच पुढील अत्युच्च आवृत्ती म्हणजे ‘कुछ ना कहो’ हे गाणे होय.

वास्तविक पाहता, चित्रपटातील हे गाणे स्वप्नातले नसले तरी याला एखाद्या ‘ड्रीम सिक्वेन्स’मध्येच गुंफण्यात आलेले आहे. गाण्याची सुरुवात ज्या संथ पियानोच्या स्वरांनी होते, ते स्वर श्रोत्याच्या मनात एका स्वप्नवत, धुक्यात हरवलेल्या वातावरणाची निर्मिती करतात. त्यानंतर येणारे व्हायोलिनचे सूर गाण्याला एक अथांग खोली प्रदान करतात. या गाण्यात कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वाद्याचा किंवा भडक सिंथसायझरचा वापर न करता, पूर्णपणे ‘अकॉस्टिक’ अर्थात पारंपरीक वाद्यांवर भर देण्यात आला आहे. तर यातील बासरी ही कुमार सानूच्या मधाळ स्वराला बिलगून येते तेव्हा अंगावर मोरपीस फिरल्याचा भास होतो. या गीतामध्ये वाद्यवृंदाचा चपखल वापर करण्यात आलाय. विशेष करून अनिल कपूर वेस्टर्न कपल डान्सच्या स्टेप्स करतो तेव्हा सिंफनेचे सूर आपल्या हृदयाला स्पर्श करून जातात. व्हायोलिनचे सस्टेन्ड स्ट्रिंग्स, बासरीचा सूक्ष्म स्पर्श आणि पियानोच्या नाजूक छटा यांचा वापर करून पंचमदा हे अथांग खोली निर्माण करण्यात यशस्वी झाल्याची अनुभूती आपल्याला येते.

पहा : नितांत सुंदर कुछ ना कहो गाणे !

या गाण्याची खासियत म्हणजे यातील जावेद अख्तर यांचे शब्द हे अगदी सरळसोपे असले तरी त्यात गहन अर्थ भरलेला आहे. “कुछ ना कहो, कुछ भी ना कहो” ही ओळ मांडताना त्यांनी शब्दांच्या मर्यादा मान्य केल्या आहेत. जेव्हा प्रेम आपल्या सर्वोच्च शिखरावर असते, तेव्हा बोलण्यापेक्षा नजरांचे संवाद, हृदयस्थ तदात्म्य आणि मनाचा मनाशी असलेला टेलिपॅथिक संबंध अधिक प्रभावी असतो, हे त्यांनी अधोरेखित केले आहे. “मुझको पता है, तुमको पता है” या ओळीत जो विश्वास दडलेला आहे, तो प्रेमाच्या परिपक्वतेचे दर्शन घडवतो.

जावेद अख्तर यांनी या गीतात अफाट प्रतिभेने निसर्गाचे मानवीकरण अत्यंत केले आहे. “पर्वत से यूँ उतरे बादल, जैसे आँचल ढलके” ही प्रतिमा वापरताना त्यांनी निसर्गालाच प्रेयसीच्या रूपाशी जोडले आहे. डोंगरावरून उतरणारे ढग आणि प्रेयसीच्या खांद्यावरून सरकणाऱ्या पदराची तुलना करणे, ही भारतीय काव्यपरंपरेतील कालिदासांच्या ‘मेघदूत’ या महाकाव्याची आधुनिक आणि तितकीच शालीन आवृत्ती वाटते.

सुलगी-सुलगी सांसें, बहकी बहकी धड़कन ।। महके महके शाम के साये, पिघले पिघले तन मन ॥ या शब्दांतून त्यांनी त्या एकांत क्षणाची व्याकुळता आणि प्रणयोत्सुकता दोन्ही एकाच वेळी टिपली आहे. येथे काव्य हे सुरांच्या मागे धावत नाही, तर सूर शब्दांना अधिक उजळ करतात. ही साधी शब्दावली असूनही तिची खोली अथांग आहे, कारण त्यात प्रेमाचा ‘उत्सव’ साजरा करण्यापेक्षा प्रेमाचा ‘अनुभव’ घेण्यावर अधिक भर आहे. स्तब्ध झालेल्या एकांत क्षणातील प्रेमातल्या आसुसलेपणाची इतकी उत्तुंग अभिव्यक्ती खचितच आढळते. ‘शब्देविणू संवादू’ या काव्यपंक्तीत आत्मीक अद्वैताची अभिव्यक्ती असली तर तर या गाण्यात पार्थिव प्रेमातील अद्वैताची विलोभनीय सृजनशीलता अनुभवता येते. सहजसोप्या शब्दांमधून तात्वीक पातळीवर जाणारी प्रतिमासृष्टी उभी करण्याची किमया ही यातूनच साधली आहे.

कुछ ना कहोचे गायन करतांना कुमार सानू यांनी अक्षरश: ‘चार चांद’ लावले आहेत. किशोर कुमारची कॉपी म्हणून हेटाळणी झालेल्या या गायकाला पंचमदा यांनी वेगळ्या पातळीवर वापरल्याने सानूच्या अनुनासीक स्वरांच्या पलीकडला स्वर या गाण्यात आढळतो. पंचमदांनी त्यांच्याकडून ही जुनी सवय मोडीत काढली. त्यांनी सानूंना अत्यंत संयत आणि ‘मखमली’ आवाजात गायला लावले. कुमार सानू यांच्या आवाजातील तो ‘ब्रीदिंग’ प्रभाव किशोर कुमार यांच्या शैलीची आठवण करून देतो. सानूंनी हे गाणे गायले नाही, तर त्यांनी ते श्रोत्याच्या कानात कुजबुजले आहे. सानू यांच्या शब्दोच्चारातील स्पष्टता आणि स्वरांवरील ताबा यामुळे हे गाणे ऐकताना गायक विरून जातो आणि केवळ भावना उरतात. यामुळे हे गाणे गायकाचे न उरता ते आपलेच वाटते.

या गाण्यातील चौथा आयाम हा अर्थातच, दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा आणि सिनेमॅटोग्राफर बिनोद प्रधान यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाचा होय. त्यांनी हे गाणे चित्रित करताना महान भारतीय चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या चित्रांमधून सखोल प्रेरणा घेतली होती. मनीषा कोईरालाची बसण्याची पद्धत, तिची पांढरी साडी, विखुरलेले केस आणि वातावरणातील तो सात्विक शृंगार थेट रवी वर्मा यांच्या कॅनव्हासमधून जिवंत होऊन पडद्यावर आल्यासारखा वाटतो. चित्रपटामध्ये सूर्यास्ताच्या वेळचा नैसर्गिक प्रकाश वापरण्यात आला आहे, ज्यामुळे संपूर्ण दृश्य स्वप्नवत आणि दैवी वाटते.

बिनोद प्रधान यांनी ‘फ्रेम विदिन अ फ्रेम’ या तंत्राचा वापर केला आहे. मनीषा आणि अनिल यांना पडद्यावर अनेकदा खिडक्यांच्या चौकटीत, नक्काशीदार दरवाजांच्या आड किंवा मलमली पडद्यांच्या हालचालींमधून टिपण्यात आले आहे. यामुळे प्रेक्षकांना आपण या दोन प्रेमिकांच्या अत्यंत खाजगी क्षणांमध्ये डोकावून पाहत आहोत, असा भास होतो. स्लो-मोशनचा वापर आणि पांढऱ्या मलमली पडद्यांची हवेतील हालचाल गाण्याला एक प्रकारची प्रवाही स्थिती प्रदान करते. हे गाणे पाहणे म्हणजे एक जिवंत पेंटिंग किंवा ‘दृश्य कविता’ पाहण्यासारखा अनुभव आहे, जिथे प्रकाश आणि सावलीचा खेळ सुरांशी एकरूप होतो. पांढरा, अंबर आणि पिवळसर रंगांच्या छटांचा वापर करून प्रधान यांनी एक असे दृश्यविश्व तयार केले, जे काळाच्या मर्यादेपलीकडे जाणारे वाटते.

या गाण्यातील शेवटचा आयाम हा अर्थातच ज्यांच्यावर चित्रीकरण झालेय ते अनिल कपूर व मनीषा कोईराला यांच्या अभिनयाचा होय. त्यांनी अतिशय तन्मयतेने हे गाणे साकार केले आहे. दोन्ही कलावंत या गाण्याला अक्षरश: जगले आहेत. यातील काही बाबी खटकणाऱ्या देखील आहेत. माझ्या मते तरी या गाण्यातील भावना या इतक्या तरल व स्वप्नाळू आहेत की, यासाठी पडद्यावरील प्रणय आवश्यक नव्हता. कारण यातील भावना ही दैहीक प्रेमाच्या पलीकडची आहे. मात्र या गाण्याला गहन श्रुंगारीक पध्दतीत सादर करण्याची बाब ही काही जणांना रसभंग करणारी वाटू शकते. तर, नायक आणि नायिकेची वेशभूषा ही तत्कालीन कालखंडाशी सुसंगत वाटत नाही.
अर्थात या बाबी ‘सिनेमॅटीक लिबर्टी’च्या नावाखाली मान्य केल्या तर ‘कुछ ना कहो’ हे एक मास्टरपीस आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही. आणि याचे यश पाहण्यासाठी पंचमदा आपल्यात उरले नाहीत. आपल्या अत्युच्च प्रतिभेची अत्युच्च भरारीयुक्त भैरवी सादर करत ते परलोकी निघून गेलेत. हे गाणे म्हणजे पंचमदांच्या स्वरांची अमर सांजवेळ ! आणि ती देखील संध्याकालीन प्रेमाची विलोभनीय रूपे घेऊन आलीत हा अजून एक योगायोग. पंचमदांच्या अनेक सुरावटी या अजरामर आहेत. यातीलच एक मुकुटमणी म्हणजे कुछ ना कहो-कुछ भी ना कहो हे गीत होय. आज जयंतीच्या दिवशी आर. डी. बर्मन आठवले आणि त्यांच्यासोबत सुरू झाला सिलसिला त्यांच्या सृजनाचा ! यातूनच या अवीट गोडीच्या गाण्याबाबत लिहता आले.

1 thought on “संगीत, मौन व प्रेमाचा अद्वैत सोहळा आणि पंचमदांच्या प्रतिभेची ‘भैरवी’ !”

  1. डॉ राही

    शेखर पाटील साहेब,
    हा लेख वाचताना आपल्यातील पत्रकार हरवून एका सिने समीक्षकाने अत्यंत नजाकतीने गाण्याशी संबंधित अनेक बाबींवर जे भाष्य केले आहे ते पंचमदा यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीला सर्वोच्च पातळीवर नेणारे ठरले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top