डोंगरवाटांवर उमललेला पिता-पुत्राचा अलवार भावबंध !

जागतिक मातृदिनी मी दिग्गज शायर मुनव्वर राणा यांच्या आईवरील कवितांवर आधारित लिखाण केले होते. यामुळे साहजीकच पितृ दिनाला देखील काही तरी व्यक्त व्हावे असे वाटत होते. तथापि, आधीच फुटबॉल वर्ल्डकपचे गारूड अनुभवत असतांनाच विधानपरिषद निवडणुकीच्या निकालामुळे थोडासा विलंब झाला. यामुळे आता याबाबत दोन शब्द सांगावेसे वाटतात. यात मी आपल्याला एका अतिशय नितांतसुंदर आणि भावगर्भ अशा ‘पोस्टमन इन द माऊंटन्स’ या चिनी चित्रपटातील पिता व पुत्राचा भावबंध उलगडून सांगणार आहे.

आपला बहुतेकांचा चीनी चित्रपटांचा परिचय हा मारधाडीने भरगच्च भरलेल्या कुंग फू चित्रपटांपुरता मर्यादीत असतो. अर्थात, ते चित्रपटही मनोरंजक असले तरी, याच्या पलीकडील चिनी सिनेमा हा विलक्षण समृध्द असाच आहे. आणि भारतीय व चिनी संस्कृतीतील बऱ्यापैकी समानता असल्यामुळे आपल्याला त्यांचे अनेक चित्रपट जवळचे वाटतात. यातच ‘ना शान ना रेन ना गौ’ (याचा शब्दश: अर्थ तो माणूस, तो मुलगा, तो कुत्रा असा होय ! ) म्हणजेच ‘पोस्टमन इन द माऊंटन्स’ या चित्रपटाचा समावेश होतो. ही एका अर्थाने दिग्दर्शक हुओ जियानकी यांची रूपेरी पडद्यावरील एक सारगर्भ कविताच होय. याचे कथानक फार गतीमान नसून यात उत्कंठा, हाणामारी असला काहीही प्रकार नाहीय, तर तेंग रूजून नावाचा पोस्टमन आणि त्याच्या लियू ये या मुलातील संबंधाला विलक्षण प्रत्ययकारी स्वरूपात रेखाटण्यात आले आहे.

शेखर पाटील

या चित्रपटाची पार्श्वभूमी १९८० च्या दशकातील चीनमधील हुनान प्रांतातील दुर्गम डोंगराळ भागातील आहे. याची कथा अगदी साधी सोपी अशीच आहे. पन्नाशीतला बाप गेल्या सुमारे तीन दशकांपासून दुर्गम भागात पोस्टमनचे काम करत असून आताशा त्याला सांधेदुखीमुळे फिरण्यात अडचणी येत आहेत. यामुळे तो निवृत्ती घेऊन आपल्या मुलाकडे ही जबाबदारी सोपवितो. आणि ही ड्युटी अतिशय खडतर असते. यात त्याला अदमासे ११५ किलोमीटर अंतर कापून डोंगर-दऱ्यांमधील वाडी वस्त्यांवर टपाल वाटप करत तेथून टपाल घेऊन यावे लागते. आणि हा प्रवास तीन दिवस आणि दोन रात्रींमध्ये पार करावयाचा असतो.

आपल्या मुलाची अडचण होऊ नये म्हणून बाप पहिल्या फेरीत सोबत म्हणून जाण्याचे ठरवितो. म्हणजेच बापाची ही त्या मार्गावरील शेवटची तर मुलाची पहिली फेरी असते. सोबतीला असतो त्यांचा जीवाभावाचा कुत्रा ! हा इमानी प्राण जणू काही त्यांचा दुसरा मुलगाच असतो. याच एकशे पंधरा किलोमीटरच्या प्रवासात ‘पोस्टमन इन द माऊंटन्स’ची कथा फुलत जाते. मुलासाठी हा केवळ नोकरीचा पहिला दिवस आहे, पण वडिलांसाठी तो त्यांच्या संपूर्ण अस्तित्वाचा शेवटचा प्रवास आहे. या प्रवासात मुलाला बाप तर बापाला मुलगा कळत जातो. आणि हा प्रवास फक्त एक चाकरी वा वारश्याचे हस्तांतरणच नव्हे तर बाप-लेकाच्या नात्याला नवीन उंची प्रदान करणारे ठरते. हा चित्रपट इंग्रजी सबटायटल्ससह युट्युबवर उपलब्ध असून मी याची लिंक सोबत दिलेली आहे.

खालील लिंकवर क्लिक करून पहा ‘पोस्टमन इन द माऊंटन्स’ चित्रपट

या चित्रपटात पहिल्यांदा आपल्या पित्याप्रती कोरडेपणाचा भाव असणारा आधुनिक तरूण प्रवासात आपल्या बापाला खऱ्या अर्थाने ओळखतो. ही केवळ एक भौगोलिक अंतर कापण्याची गोष्ट नाही; हे पिता आणि पुत्रामधील असलेल्या भावनिक अंतराचे मर्मभेदी चित्रण आहे. मुलाने लहानपणापासून वडिलांना फक्त वर्षातून काही दिवस पाहिले आहे, त्यामुळे त्याच्या मनात वडिलांबद्दल एक प्रकारची भावनिक अलिप्तता आहे. प्रवासाच्या पहिल्या दिवशी मुलगा उत्साही असतो, पण त्याला या वाटेतील पहिलाच चढ चढताना जाणवते की, हा रस्ता दिसतो तितका सोपा नाही. वडिलांची शिस्त, त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा आणि मार्गातील प्रत्येक गावकऱ्याशी असलेले त्यांचे नाते पाहून मुलाच्या मनातील वडिलांची प्रतिमा हळूहळू बदलू लागते. आणि या बाप-लेकात आयुष्यामध्ये पहिल्यांदाच एक विलोभनीय बंध तयार होतो.

या प्रवासात मुलाला आपल्या वडिलांनी फक्त पोस्टमन म्हणून काम केले नसून ते त्या परिसरातील लोकांच्या आयुष्याचा ते अविभाज्य घटक बनल्याचे दिसून येते. यातील अंध आजीचा प्रसंग तर डोळ्यात पाणी आणणारा आहे. त्या वृध्द महिलेस तिचा नातू कधीचाच विसरला असतो. तो कधीही पत्र पाठवत नाही. मात्र या मुलाचे वडील दर वेळेस त्याचे पत्र आल्याचे भासवत खोटे पत्र तर वाचतातच पण तिला काही रक्कम देखील नातवाने पाठविल्याचे दर्शवून देतात. या आजीच्या आयुष्यातील आशेचा किरण टिकवून ठेवण्यासाठी वडील जे ‘खोटे’ बोलतात, त्यातून त्यांच्यातील माणुसकीचे एक नवीन ‘खरे’ रूप मुलासमोर साकार होते.

वडिलांनी आयुष्यभर जपलेला हा वारसा केवळ सरकारी वा खासगी पत्रांची देवाणघेवाण नव्हती. दुर्गम गावातील लोकांसाठी पोस्टमन हा बाहेरच्या जगाशी संवाद साधणारा एकमेव दुवा होता. गावकऱ्यांसाठी पोस्टमनचे येणे म्हणजे एखाद्या सणासारखे असे. पत्रांची देवाण-घेवाण होत असतांना मन भरून गप्पा देखील होत असत. पोस्टमनचे लहानशा खेड्यात येणे हा तेथील लोकांसाठी जणू एखादा ‘इव्हेंट’च असल्याचे त्याच्या मुलाच्या पहिल्याच फेरीत लक्षात येते.

या चित्रपटात निसर्गाचे जे रूप टिपले आहे, त्याला तोड नाही ! हिरवेगार डोंगर, धुक्याने वेढलेली गावे, पायऱ्यांची भातशेती आणि धुक्यात हरवलेल्या नागमोडी वाटा हे केवळ पार्श्वभूमी नसून ते एक जिवंत पात्र आहेत. चित्रपटातील ‘लॉन्ग शॉट्स’ पात्रांमधील एकाकीपणा आणि डोंगराची भव्यता अधोरेखित करतात. डोंगराळ दुर्गम भागातील साधीभोळी माणसे आणि त्यांच्या परंपरांचेही दर्शन आपल्याला घडते. यात पारंपरीक चिनी वाद्यांसह बासरीचा विपुल वापर करण्यात आला असून तो पाहणाऱ्याला ‘मेडीटेटिव्ह इफेक्ट’ प्रदान करतो. तर मुलगा त्याला आवडणारी पॉप गाणी रेडिओवरून ऐकतांना देखील दाखविण्यात आला आहे. मात्र एकूणच यातील संगीत हे हृदयाला स्पर्श करणारे आहे. या चित्रपटात संवाद कमी आहेत, पण जो संवाद होतो तो अत्यंत अर्थपूर्ण आहे. वडील आणि मुलामधील नातेसंबंधांतील गुंतागुंत यातील एका प्रसंगातून उलगडते.

या चित्रपटातील ओढा ओलांडण्याचा प्रसंग हा चित्रपटाचे सर्वोच्च भावनात्मक शिखर आहे. या ओढ्याच्या ( खरं तर ही लहानशी डोंगराळ नदीच असते !) पाण्याला वेग तर आहेच, पण ते खूप थंड देखील असते. वडिलांना सांधेदुखीचा त्रास असल्याने थंड पाण्यातून चालल्यास अजून त्रास वाढणार असतो. यामुळे मुलगा कोणताही विचार न करता थेट आपल्या वडिलांना पाठीवर उचलून पात्र पार करतो तो क्षण अतिशय भावस्पर्शी असा झालेला आहे. वडिलांना कधी काळी आपण आपल्या चिमुकल्या मुलाला खांद्यावर मिरवल्याचे आठवते, आणि आज आपणच त्याच्या पाठीवर स्वार झालोय या दोन स्थितींनी त्याच्या डोळ्यात पाणी येते.

जेव्हा मुलगा वडिलांना पाठीवर उचलून थंड पाण्यातून पलीकडे नेतो, तेव्हा कॅमेरा त्यांच्या चेहऱ्यांवरील भाव टिपतो. मुलाच्या खांद्याला स्पर्श होताच वडिलांना जाणवलेला अभिमान आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू हे दोन पिढ्यांमधील दुरावा संपल्याची साक्ष देतात. तसेच वडिलांच्या डोळ्यांत साचलेले पाणी हे केवळ शारीरिक थकव्यामुळे नाही, तर आपल्या मुलाने आपला वारसा आणि भार उचलला आहे याच्या समाधानामुळे आहे. तर मुलाला पहिल्यांदा वडिलांच्या शरीराचे ओझे आणि त्यांच्या कष्टांची प्रत्यक्ष जाणीव होते. असं म्हणतात की, ”जिथे शब्द कमी पडतात, तिथे अश्रू कथा सांगतात !” अगदी त्याच प्रमाणे थकलेल्या बापाचे अश्रू इथे आपल्याला संवादाविना सगळेच काही सांगतात.

चित्रपटात शहरीकरण आणि ग्रामीण मूल्ये यांमधील संघर्षही अधोरेखित केला आहे. वडील हे जुन्या मूल्यांचे प्रतिनिधी आहेत, तर मुलगा हा नवीन युगाचा. पण अखेरीस, मुलाने वडिलांची पिशवी आपल्या खांद्यावर घेणे हे परंपरेच्या विजयाचे प्रतीक आहे. याच प्रवासात मुलगा एका तरूणीच्या प्रेमात पडतो, तर वडिलांना देखील आपल्या प्रेमाचे क्षण आठवतात. म्हणजे वडिलांना आपली जीवनसाथी याच डोंगरवाटांवर भेटलेली असते, तर मुलाच्याही मनातही याच वाटेवर प्रेमांकुर उमलतात ! आईचे पात्र चित्रपटात केवळ ‘फ्लॅशबॅक’ आणि मोजक्या संवादांमध्ये येते, पण तिचे अस्तित्व संपूर्ण प्रवासात जाणवते. ती अशा ग्रामीण स्त्रियांचे प्रतिनिधित्व करते ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य पतीच्या आणि मुलाच्या वाटेकडे डोळे लावून घालवले आहे. तिचे संपूर्ण आयुष्य हे पती आणि मुलगा यांच्या भोवतीच गुंफलेले असते. मुलाच्या संवादातून समजते की, आई नेहमी वडिलांची वाट पाहत असायची. तिचे साधेपण आणि डोंगराळ जीवनातील तिचा संघर्ष चित्रपटात एक कारुण्य निर्माण करतो. बाप आपल्या पोस्टमनपदाचा शेवट आणि मुलगा प्रारंभ करतांना सुरू झालेली ही यात्रा या दोघांना आमूलाग्र बदलून टाकतांनाच प्रेक्षकांना एक विलक्षण भावपूर्ण नाट्याची अनुभुती प्रदान करते. यात जुन्या पिढीचे मूल्य आणि नव्या पिढीच्या स्वप्नांनी विलक्षण गुंफण आपल्याला भावविभोर केल्याशिवाय राहत नाही !

टेंग रुजुन या अभिनेत्याने एका अनुभवी आणि मोजके बोलणाऱ्या पित्याची भूमिका समर्थपणे पेलली आहे, तर लिऊ ये यांनी या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकीर्दीची प्रभावी सुरुवात केली आहे. या सिनेमाचे चित्रीकरण हे हुनान प्रांतातील खऱ्याखुऱ्या दुर्गम भागात करण्यात आल्याने प्रेक्षकांना वास्तविक निसर्ग सौंदर्याची अनुभुती घेता येते. हा चित्रपट १९९९ साली प्रदर्शीत झाल्यानंतर प्रारंभी चीनमध्ये याने फारशी कमाई केली नाही. मात्र जपानमध्ये याला उदंड प्रतिसाद लाभला. तर, जागतिक पातळीवर देखील अभिजात चित्रपट म्हणून या कलाकृतीला ख्याती लाभली.

आजच्या हाय-स्पीड इंटरनेटच्या युगात, जिथे पत्रे कालबाह्य झाली आहेत, तिथे पोस्टमन देखील दिसेनासा झालेला आहे. मात्र आजच्या हायपर कनेक्ट युगातही मानवी संवादाचा उबदारपणा शोधण्यासाठी हा चित्रपट पाहणे गरजेचे आहे. जर तुम्हाला जागतिक सिनेमाची खरी ताकद अनुभवायची असेल, तर हुओ जियानकी यांची ही मास्टरपीस नक्कीच पहा. ही एक अशी कविता आहे, जी फक्त पडद्यावर अनुभवता येते. आणि बाप-लेकाच्या नात्याला या चित्रपटाने नवीन उंची प्रदान केली आहे. यामुळे पिता-पुत्राने याला एकत्रीतपणे पाहिले तर अधिक उत्तम !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top