आज अभिनेत्री रेखाचा तर उद्या महानायक अमिताभचा वाढदिवस. वैयक्तीक आयुष्यातील एका रहस्यमयी अध्यायामुळे जवळपास आख्यायिका बनलेल्या या दोन्ही मान्यवरांचा लागोपाठचा वाढदिवस हादेखील खरं एक योगायोगच ! पडद्यावर वारंवार एकमेकांसमोर आलेली, रसिकांच्या मनात कायमची एकमेकांशी जोडली गेलेली, तर प्रत्यक्ष आयुष्यात मात्र विलक्षण मौनाच्या अंतरावर उभी राहिलेली ही दोन व्यक्तिमत्त्वे कॅलेंडरमध्येही जणू एकमेकांच्या मागोमाग चालत आली आहेत. ( हा लेख आधी ११ ऑक्टोबर २०१८ रोजी लिहलेला होता. आज पुन्हा नव्या संदर्भाने पोस्ट करतोय )

शेखर पाटील
रूपेरी पडद्यावर अनेक जोड्या गाजल्या. पण अमिताभ आणि रेखाची बातच काही और! याला कारण म्हणजे दोन्हींची केवळ पडद्यावरील केमिस्ट्रीच नव्हे तर दोघांच्या संबंधांमधील अलवार अध्याय देखील होता. सत्तरच्या दशकात अमितजींनी आपल्या ‘अँग्री यंग मॅन’ या प्रतिमेने पडद्यावरील इतरांना अक्षरश: खाऊन टाकले. हा अभिनेता जीवंतपणीची दंतकथा बनला. मात्र या दंतकथेतील नायिकेचा शिरकाव हा अनेक चित्तथरारक गॉसीप्सला जन्म देणारा ठरला. या दोघांचे नाव येताच पहिल्यांदाच आठवण होते ते सिलसिला चित्रपटाची ! यश चोप्रा यांनी अत्यंत खुबीने ‘रिअल लाईफ टू रील लाईफ’ अशा कथानकाला मनमोहक संगीताची जोड देऊन ही कलाकृती सादर केली. ‘फुल भी हो दरमिया तो फासले हुवे…’ अशी अतिशय विलक्षण प्रेमाची अभिव्यक्ती अमितजी व रेखाशिवाय कुणाला शोभून दिसली असती का हो ? नक्कीच नाही !
https://shekharpatil.in
सिलसिलामध्ये प्रेमातील त्रिकोणातला सर्व मेलोड्रामा आहे. आधीच अमिताभ व रेखा यांच्याबाबत अचाट अफवा पसरलेल्या असतांना यश चोप्रांच्या ‘आधी हकीकत आधा फसाना’ स्टाईलच्या या चित्रपटाला आजही माईलस्टोन म्हणून गणले जाते. खर तर या जोडीने अनेक चित्रपट केले आहेत. तथापि, मला ‘मुकद्दर का सिकंदर’मधील या दोघांच्या भूमिका खूप भावतात. कारण ‘सिलसिला’मध्ये प्रेमाला शब्द आहेत; ‘मुकद्दर का सिकंदर’मध्ये प्रेमाला नियती आहे.
हा खरं तर, प्रकाश मेहरा यांच्या खास शैलीतला हा भव्य मसालापट ! मैत्री, श्रीमंती, गरिबी, संघर्ष, त्याग, गैरसमज, प्रेमभंग, कोठा, मुजरा आणि शेवटी शोकांतिका असे लोकप्रिय हिंदी चित्रपटाला आवश्यक असणारे जवळपास सारे घटक यात आहेत. तरीदेखील हा चित्रपट केवळ मसालापट म्हणून उरत नाही. त्याच्या केंद्रस्थानी एक विलक्षण भावनिक रचना आहे. यातील कथानक, संवाद, गाणी आणि अर्थातच अभिनय हे सारेच काही सरस. जोहराबाई व सिकंदर यांच्यातल्या अव्यक्त व शोकात्म प्रेमाने याला नवीन आयाम प्रदान केला. यातील ‘सलामे इश्क’ हे गाणे तर अक्षरश: अजरामर झालेले आहे.
मुकद्दर का सिकंदरमध्ये प्रेमाचे अनेक विलोभनीय रंग आहेत. बालपणापासूनच मेमसाहबवर जीवापाड प्रेम करणार्या सिकंदरचे स्वप्न वास्तवाच्या तडाख्याने तुटते. कसे तरी उसासे टाकत जीवन जगत असतांना त्याच्या जीवनात हीच मेमसाहब कामिनी बनून येते तेव्हा त्याला आयुष्यात बहार आल्याची भावना होते. मात्र तोवर बराच बदल झालेला असतो. म्हणजे सिकंदरला कामिनी आवडत असते तर कामिनीच्या हृदयात असतो विशाल ! गुंड दिलावर कोठेवाल्या जोहराबाईवर जीव ओवाळून टाकत असता तरी ती मात्र खर्या प्रेमाचा शोधात असते. यातच प्रेमभंगाने व्याकुळ बनलेल्या सिकंदरला त्याचा मित्र प्यारेलाल हा जोहराबाईच्या कोठ्यावर घेऊन जातो. यानंतर अवघ्या काही मिनिटांचे नाट्य आपल्या अंगावर शहारा आणते.
जोहराबाई आपल्या गीत व नृत्यातून खर्या प्रेमासाठी आसुसलेली असल्याचे भासते. ‘तुम हमसे प्यार करने की जरासी भूल कर लो…’ अशी आर्जवे करते. एकीकडे गाणे टिपेला पोहचलेले असतांनाच सिकंदर उभा राहतो. त्याच्या आवाजाची विलक्षण तान या गाण्याची चाल अक्षरश: तोडून टाकते. जोहराबाई प्रेमाचे वर्णन करत असली तरी तिने आता यापुढे आपले म्हणणे ऐकावे असे तो सुनावतो. यानंतरचे शब्द अंगावर काटा आणतात….
तू मसिहा मुहब्बत के मारो का है
हम तेरा नाम सुन के चले आये है ।
अब दवा दे हमे या तू दे दे जहर,
तेरी महेफिल मे ये दिलजले आये है ॥
मला वाटत नाही प्रेमाची दग्ध भावना इतक्या विलक्षण पध्दतीत अवघ्या काही शब्दांमध्ये कुणाला मांडता येईल ! जीवनात असा क्षण कधी तरी येतो की, एक तर आपल्याला दवा हवी असते अथवा जहर ! अशाच क्षणाची आपण या गाण्याच्या माध्यमातून अनुभूती घेऊ शकतो. यामुळे सलामे-ईश्क हे गाणे नसून एक अतिशय उत्कट अशी प्रेमानुभूती आहे. खरे तर प्रेमातील सर्वांत मोठा त्रास नकाराचा नसतो. स्पष्ट नकार कालांतराने स्वीकारता येतो. प्रेमातील खरी असह्य अवस्था असते ती अनिश्चिततेची. समोरची व्यक्ती आपली आहे की नाही? ती आपल्याला समजते की नाही? उद्या काही घडेल की नाही? आपण थांबावे की निघून जावे ? या प्रश्नांना उत्तर मिळत नाही तेव्हा माणूस ‘दवा’ आणि ‘जहर’ यांच्या मधोमध अडकतो.
सिकंदरची हीच अवस्था आहे. पण नियतीची गंमत पाहा. आपल्या मनातील ठसठसणारी वेदना घेऊन तो जोहराबाईच्या मैफिलीत आलेला आहे; आणि त्याला कल्पनाही नाही की त्याच्या काही शब्दांनी आता जोहराबाईच्या मनात आयुष्यभरासाठी एक नवीन वेदना जन्माला घातली आहे. सिकंदर जखमी आहे. पण नकळत तो दुसऱ्याला जखमी करून निघून जातो.
याच ठिकाणी ‘मुकद्दर का सिकंदर’मधील प्रेमकथा साध्या त्रिकोणाच्या पलीकडे जाते. मुजरा संपतो. मैफिल संपते. पण जोहराबाईसाठी काहीतरी सुरू झालेले असते. तिच्या मनाचा तोल बदललेला असतो. त्या अनोळखी माणसाच्या वेदनेत तिला काहीतरी असे दिसलेले असते ज्याने तिच्या स्वतःच्या आयुष्याला अर्थ दिल्यासारखे वाटते.
पहिल्या नजरमध्येच सिकंदरच्या प्रेमात पडलेल्या जोहराबाईची तगमग सुरू होते ती मुजरा संपल्यानंतर ! ”इस कोठे पर लोग चोट खाकर आते है या चोट खाकर जाते है…ये पहला शख्स है जो मुझे चोट देकर जा रहा है !” अशा शब्दांमध्ये ती आपल्या प्रेमाची स्वीकारोक्तीही देऊन टाकते. आणि हो सिकंदर येथे पुन्हा येईल तेव्हाच मुजरा होईल असा प्यारेलालला इशारादेखील देऊन टाकते. आता गंमत अशी की, जोहराबाई सिकंदरवर जीवापाड प्रेम करत असली तरी त्याला त्याचा पत्ताही नसतो. अगदी याच प्रकारे सिकंदरच्या प्रेमाची कामिनीला कल्पनाही नसते. अव्यक्त प्रेमातला नियतीचा हा शोकात्म खेळ या चित्रपटाला नवीन उंची प्रदान करतो.
पहा : सलामे ईश्क
सलामे-ईश्क या गाण्यातील सिकंदर आणि जोहराबाई अर्थात अमिताभ आणि रेखाच्या पडद्यावरील वावराची देहबोली पाहिली असता आपल्याला निस्सीम प्रेमानुभूती आढळून येते. नो डाऊट…अंजान यांचे विलक्षण प्रत्ययकारी शब्द, कल्याणजी-आनंदजींचे संगीत आणि अर्थातच लता व किशोर यांच्या स्वर्गीय सुरांनी हे गाणे अजरामर बनले आहे. मात्र माझ्या तरी मते हे गाणे फक्त आणि फक्त अमिताभ आणि रेखाचेच होय. किंबहुना या गाण्यात इतर कुणी अभिनेता वा अभिनेत्रीची आपण कल्पना तरी करू शकतो का ?
आज रेखाच्या वाढदिवसानिमित्त आणि उद्या अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या असंख्य भूमिका आठवल्या जातील. ‘दीवार’चा विजय आठवेल, ‘जंजीर’चा विजय आठवेल, ‘डॉन’ आठवेल, ‘अग्निपथ’ आठवेल. रेखाची ‘उमराव जान’ आठवेल, ‘खूबसूरत’ आठवेल, तिच्या असंख्य रूपांची चर्चा होईल. पण या दोघांचा एकत्रित विचार मनात आला की माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा तोच कोठा उभा राहतो.
मैफिल रंगलेली आहे….जोहराबाई समोर आहे….सिकंदरच्या मनात मात्र दुसरेच कुणीतरी आहे. एक स्त्री त्याच्यावर प्रेम करू लागली आहे. आणि हा पुरुष दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात होरपळत आहे. एकाच खोलीत दोन प्रेमकथा आहेत; पण दोन्हींचा मार्ग वेगळा आहे. संगीत सुरू आहे. नजरा बोलत आहेत.
आणि अचानक त्या मैफिलीतून एक सूर काळजाचा ठाव घेतो-
अब दवा दे हमें या तू दे दे जहर…
त्या चार शब्दांमध्ये कदाचित ‘मुकद्दर का सिकंदर’च नव्हे, तर जगातल्या असंख्य अपूर्ण प्रेमकथांची वेदना सामावलेली आहे. म्हणून आजही ‘सलाम-ए-इश्क’ सुरू झाले की आपण काही क्षणांसाठी काळ विसरतो.
आणि आपल्यापैकी कुणाच्या तरी आयुष्यात कधी ना कधी आलेल्या त्या एका क्षणाची आठवण नकळत जागी होते…जेव्हा मनानेदेखील देवाकडे बहुधा हेच मागितलेले असते… औषध दे अथवा विष दे पण या प्रतीक्षेचा शेवट कर ! कदाचित यालाच प्रेम म्हणत असावेत.
आणि कदाचित म्हणूनच अमिताभ-रेखा ही केवळ हिंदी चित्रपटातील एक लोकप्रिय जोडी नाही. ती आपल्या सामूहिक स्मृतीतील अपूर्ण प्रेमाची एक चिरंतन प्रतिमा आहे. दोन्ही दिग्गजांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!