मी तर बारागाड्या ओढणारा भगत : संघर्ष, जिद्द व नेतृत्वाचा प्रवास !

मी माझ्या वैयक्तीक आयुष्याबाबत सोशल मीडियात फारसे शेअर करत नाही. ही केवळ सवय वा माझा स्वभाव नाही, तर एक जाणीवपूर्वक घेतलेली भूमिका आहे. आपल्या जीवनातील महत्वाचे क्षण, काही नातेसंबंध आणि भावना या केवळ आपल्यासह निकटवर्तीयांसाठीच असाव्यात, असा माझा ठाम विश्वास आहे. यामुळे मी अनेक विषयांवर लिखाण करतांना वैयक्तीक आयुष्यातील घटना जाणीवपूर्वक टाळल्या आहेत. तथापि, प्रत्येक प्रवासात एक असा टप्पा येतो, जेव्हा मनातील काही अनुभव शब्दांच्या रूपाने बाहेर पडण्याची ओढ निर्माण होते. आज तसाच एक क्षण आहे. याला कारण म्हणजे मी माझ्या सहकाऱ्यांसह अलीकडेच नवीन कार्यालयात स्थलांतर केले. या भव्य सोहळ्याच्या निमित्ताने मनात दाटून आलेल्या भावना आज व्यक्त कराव्याशा वाटतात.

मी सध्या काय करतो ? याची माहिती अनेकांना नाही. माझा मुख्य व्यवसाय हा ‘मीडिया स्ट्रॅटेजीस्ट’ म्हणून असून मोजक्या मान्यवरांसाठी याचे काम करतो. सोबत माझ्या मालकीचा आणि मी संपादक असलेला लाईव्ह ट्रेंडस न्यूज हा डिजीटल मंच देखील असून तो जळगाव जिल्ह्यात बऱ्यापैकी लोकप्रिय आहे. याच लाईव्ह ट्रेंडस साठी आम्ही जळगावातील रिंग रोडवर स्वमालकीचे नवे कार्यालय घेतले असून याचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. आता या मंचाच्या जन्माआधीची कथा आपल्याला समजून घ्यावी लागेल.

मी सातत्याने नाविन्याचा स्वीकार करत असून आजवर देखील हा शिरस्ता कायम आहे. माझा आजही वापरात असलेला ई-मेल आयडी हा २००१ सालचा असून याच प्रमाणे युट्युब, फेसबुक, ट्विटर आदी मंचांवर मी फार आधी जुडलो गेलो. संपादक असतांना डिजीटल मीडियाचे भविष्य पाहून नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा मानस दृढ झाला तेव्हाच माझी जळगावातील ख्यातनाम व्यावसायिक विनय पारख यांच्याशी भेट झाली. ते म्हणजे माझ्या आयुष्यातील एक रिमार्केबल, अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी व्यक्तीमत्व…! त्यांच्याबाबत मी सविस्तर लिहतोच. पण आता विषय सुरू आहे तो डिजीटल मंच सुरू करण्याचा.

मीडियात काही तरी नवीन करावे…यावर आमचे यावर मंथन सुरू झाले असतांनाच माझा डेव्हलपर मित्र मानस गाजरे जळगावात आमच्या कार्यालयात भेटीसाठी आला. दिनांक २९ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी सात वाजता आम्ही डिजीटल मंचावर चर्चा सुरू केल्यावर तो म्हणाला की, ”असे काही सुरू करा की जे घडेल ते लाईव्ह झाले पाहिजे.” तेव्हा तात्काळ पारख सरांच्या तोंडातून नाव आले- लाईव्ह ट्रेंडस न्यूज ! त्या एका क्षणाने केवळ नावच दिले नाही, तर एका मीडिया ब्रँडला जन्म दिला.

यानंतर आजवर सुमारे सव्वा सात वर्षात जे काही घडले तो इतिहास आहे. मी आणि माझे बहुतांश सहकारी हे प्रिंटमधून डिजीटलमध्ये आल्यानंतर प्रारंभी आम्ही अडखळलो. तसेच आमचे गावोगावचे प्रतिनिधी देखील पहिल्यांदाच नवीन माध्यमात येत असतांना त्यांना देखील काही महिने ‘नेमके काय करावे ?’ हेच उमजले नाही. तथापि, आम्ही नेटाने व जिद्दीने सुरूवात केली. २०१९ सालच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आम्ही महत्वाची भूमिका पार पाडली. मात्र डिसेंबर अखेरीस विनय पारख यांनी ‘लाईव्ह ट्रेंडस’ मधील भागीदारी काढण्याचा निर्णय मला सांगितला तेव्हा मला किती धक्का बसला असेल याचा अंदाज कुणी करू शकणार नाही. मात्र पारख सरांचे मोठेपण म्हणजे त्यांनी ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’ला माझ्याकडे सोपवत पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. अर्थात, आमची भागीदारी तुटली मात्र मैत्री अभंग राहिली. याचमुळे आमच्या कार्यक्रमात विनय पारख सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित तर होतेच, पण मी त्यांच्या अनमोल सहकार्याचा आवर्जून उल्लेख देखील केला. आज देखील ते माझे मार्गदर्शक आहेतच !

या स्थितीत खरं तर, संपादकाची नोकरी हा सर्वात सेफ मार्ग होता. मी स्वत: तर अगदी कुठेही सहजपणे नोकरीला लागू शकलो असतो. काही चांगल्या ऑफर्स हातात होत्याच…तथापि, माझ्या विश्वासावर सोबत आलेले सहकारी आणि जिल्हाभरातील पत्रकारांच्या नेटवर्कला वाऱ्यावर सोडणे मला अशक्य होते. यामुळे १ जानेवारी २००० पासून मी स्वबळावर लाईव्ह ट्रेंडस पुढे नेण्याचा निर्णय घेतला तेव्हा बहुतेकांनी मला वेड्यात काढले. अकस्मात पडलेल्या आघातातून कसातरी सावरण्याचा प्रयत्न करत असतांनाच कोरोना आला. या भयंकर कालखंडाने लाईव्ह ट्रेंडसला तुफान लोकप्रियता दिली तरी आर्थिकदृष्ट्या अत्यंत वाईट दिवस देखील पहायला लावले. मात्र आम्ही जिद्दीने यातून आगेकूच केली.

येथेवर लाईव्ह ट्रेंडसची वाटचाल ही अगदी ‘नॉन-प्रोफेशनल’ या प्रकारात सुरू होती. मी कार्यक्रमातील मनोगतात सांगितल्यानुसार, एखाद्या गाव भंडाऱ्यासारखे आमचे काम सुरू होते. म्हणजे कुठून तरी मदत येऊन दिवस अगदी मजेत निघून जायचे. तथापि, नेहमीच तणाव कायम असायचा. या कालावधीत माझे स्नेही नितीन चौबे यांचा एक सल्ला मोलाचा ठरला. ते म्हणाले की, ”शेखर तू पत्रकारितेत पारंगत असला तरी व्यवस्थापनात कच्चा आहेस. तू लीनाला (माझी पत्नी ) यात सहभागी करून तिला मॅनेजमेंट सोपव आणि एक चांगला सीए पाहून आर्थिक घडी बसव !” त्यांच्या सल्ल्यानुसार, मी संपूर्ण व्यवस्थापन हे पत्नीला तर आर्थिक व्यवहार हे कर सल्लागार किशोर बऱ्हाटे यांना सोपविले. यानंतर मी पूर्ण क्षमतेने लाईव्ह ट्रेंडस्‌ला ‘लीड’ केले. याचेच फलीत म्हणून आम्ही कधीही मागे वळून न पाहता प्रगतीपथावरून आगेकूच करत आहोत.

आमच्या आजवरच्या वाटचालीत मी जळगाव जिल्ह्यात डिजीटल पत्रकारांचे मोठे नेटवर्क विकसित केले. प्रत्येक जण मेहनत करून शिकत गेला, स्वत:ला अपस्कील करून घडवत गेला. याचमुळे सर्वात वेगवान आणि अचूक अपडेटस्‌ ही आमची खासियत बनली. याला आमच्या ऑफिसच्या सहकाऱ्यांची समर्थ साथ लाभली. जितेंद्र कोतवाल, संदीप होले, प्रवीण पाटील, राहूल शिरसाळे, फरजाज सय्यद आणि रामसिंग परदेशी हे देखील माझ्यासोबत शिकत गेले, स्वत:ला अपग्रेड करत गेले ! सध्या बातम्या देणाऱ्या पोर्टल्स आणि युट्युब चॅनेल्सचे उदंड पीक आले असतांना आम्ही सातत्याने वेगळेपण जोपासले. अर्थात, याचे मोठे व्यावसायिक आणि वैयक्तीक फायदे झालेत.

माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील यांच्यासारख्या महनीय व्यक्तीमत्वाने मीडियातील हा नवा बदल तात्काळ स्वीकारला. यानंतर भंगाळे परिवार देखील डिजीटल मार्गावर सोबतीला आला. यानंतर अनेक संस्था आल्यात. राजकीय क्षेत्रात तर अनेकांनी आमच्या डिजीटल मंचाची सेवा घेतली. अजून देखील आम्ही काही राजकीय मान्यवरांसाठी मीडिया सर्व्हीसेसचे काम करत आहोत. सिंगल कॉलम बातमीपासून ते संपूर्ण पेजचा जंबो लेख आणि तीस सेकंदाच्या स्टोरी वा रीलपासून ते एक तासाच्या पॉडकास्ट पर्यंत काँटेंटमध्ये होत गेलेला बदल मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी जाणीवपूर्वक अभ्यासून याला आत्मसात केले. यामुळे मुद्रीत माध्यमापासून ते डिजीटल पर्यंतची सेवा आम्ही पुरवू शकलो.

‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’ची खासियत काय ? अशी विचारणा केल्यास संक्षीप्त उत्तर देता येणार आहे. मात्र दोन-तीन महत्वाच्या बाबी नक्की सांगता येतील. यातील पहिली बाब म्हणजे आम्ही जळगाव जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यात कुशल पत्रकारांचे जाळे निर्माण केले. अपवाद वगळता जळगाव जिल्ह्यातील बहुतांश महत्वाच्या बातम्या या सर्वात आधी आमच्याच मंचावरून जगापर्यंत पोहचतात. एखाद्या वेळेस कुण्या गाव वा शहरात तेथील प्रतिनिधी उपलब्ध नसला तरी शेजारच्या तालुक्यातून वा कार्यालयातून अर्धा-पाऊण तासात सहकारी तेथे जाईल अशी व्यवस्था आम्ही तयार केली आहे. जिथे बहुतांश डिजीटल मंच हे कॉपी-पेस्ट वा देवाण-घेवाणीवर अवलंबून राहतात तिथेच आम्ही नेहमी ‘ग्राऊंड झीरो’वरील रिपोर्टींगला प्राधान्य दिले आहे.

दुसरी बाब म्हणजे आम्ही फक्त वर्क फ्रॉम ऑफिस वा वर्क फ्रॉम होम नव्हे तर ‘वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ ही कार्यसंस्कृती अंमलात आणली आहे. यामुळे आम्ही चोवीस तास…होय अगदी चोवीस तास महत्वाचे अपडेट करत असतो. आमचे सहकारी ऑफिसची वेळ निघून गेली तरी रिपोर्टींग व अपडेशनला प्राधान्य देतात. तिसरी बाब म्हणजे आम्ही कधीही व्यावसायिक हिताचा विचार न करता वार्तांकन केले. यामुळे ‘जिथे कुणीही नसते तिथे लाईव्ह ट्रेंडस असतेच !’ हा विश्वास निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो. मुद्रीत माध्यमाने सोडलेल्या रिकाम्या जागा डिजीटल मीडियाने भरून काढल्या आहेत. आणि जिथे डिजीटल माध्यम देखील जात नाही तिथे आम्ही जातो. यामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी वा अधिकारीच नव्हे तर अगदी खुर्द वा बुद्रुक गावातील एखाद्या सामान्य व्यक्तीची बातमी घेण्यास देखील आम्ही कधी मागे राहिलो नाही. याचमुळे सर्वात गतीमान अपडेट देण्यात आम्ही सातत्याने अग्रेसर राहिलो आहोत. अजून एक महत्वाची बाब म्हणजे आमची सर्वसमावेशकता होय. आमच्या कार्यालयीन आणि फिल्डवरील सहकाऱ्यांमध्ये कोणताही भेद तर आम्ही केला नाहीच, पण वार्तांकनातही याला कधी थारा दिला नाही.

एकीकडे प्रसारमाध्यमांमध्ये एआयमुळे नोकऱ्या कपात होत आहे. आगामी काळात न्यूजरूमचा आकार अजून आक्रसणार असून बरेचसे पत्रकार बेरोजगार होणार आहेत. मी स्वत: यावर अनेकदा भाष्य केलेले आहेच. यामुळे आता प्रश्न उरतो असा की, ‘एआयमुळे येत्या कालखंडात अनेक मीडिया हाऊसेस व अन्य कार्यालये बंद होणार असतांना लाईव्ह ट्रेंडसने नवीन कार्यालयात जाण्याचा निर्णय का घेतला ?’ याचे उत्तर सरळ आहे की, एआयच्या संकटासमान वाटणाऱ्या लाटेला संधीत परिवर्तीत करण्याचे काम आम्ही आधीच सुरू केलेले आहे.

आम्ही कधीपासूनच आमचा मार्ग डायव्हर्सीफाय केलेला आहे. सर्व सहकारी आधीच न्यूजरूममध्ये एआयचा विपुल वापर करत आहोत. आर्टीफिशीयल इंटीलेजीयन्सला आत्मसात करत पत्रकारितेला नवीन आयाम देण्याचे काम आम्ही नक्कीच करू हा संकल्प आम्ही घेतलेला आहे. अर्थात, हा मार्ग वाटतो तितका सोपा नाही याची जाणीव आम्हाला आहे. लाईव्ह ट्रेंडस सुरू झाले तेव्हा जळगाव जिल्ह्यात मोबाईलवर बातम्या तयार करणारे मोजके जण होते, आज हजार आहेत. आणि लिहून ठेवा २०३० अखेरीस किमान पंचवीस हजार असतील. मात्र आम्ही आजवर दखलपात्र होतो आणि भविष्यातही राहणार याचा विश्वास आहे. अर्थात, हा विश्वास अविश्रांत परिश्रमातून आलेला आहे.

आम्ही किती मेहनत घेतो ? याबाबतचा एक किस्सा सांगतो. एकदा रात्री साधारणत: पावणेचार वाजता मला भुसावळच्या प्रतिनिधीचा फोन आला. तो म्हणाला की, ”भाऊ भुसावळात खून झालाय !” मी म्हणालो-कुठे ? ते म्हणाले-पाण्याच्या टाकीवर…मी म्हणालो-तुम्ही कुठे आहात ? ते म्हणाले-पाण्याच्या टाकीवर ! यामुळे क्षणार्धात माझी झोप उडाली. लागलीच मी पाच मिनिटात टेक्स्ट तर अर्ध्या तासात व्हिडीओची बातमी टाकली. आता सांगा-पहाटे पावणे चार वाजता खुनासारखा गुन्हा घडलेल्या डेंजरस स्पॉटवरून वार्तांकन करणारा पत्रकार आणि याचे तात्काळ वृत्त व व्हिडीओ तयार करणारा डेस्कवाला याची जोडी ही पत्रकारितेची ठिणगी असल्याशिवाय शक्य आहे का ? लाईव्ह ट्रेंडस न्यूजमुळे ही सृजनाची झिंग आम्ही अनेकदा अनुभवली.

एआयमुळे पत्रकारांच्या नोकऱ्या निश्चीत जाणार आहेत. मात्र ज्यांच्यात अहोरात्र काम करण्याचा ‘किडा’ आहे, त्याला कृत्रीम बुध्दीमत्ता रिप्लेस करणार नाहीच. बाकी आमचे कार्यालय हे फारसे भव्य नसले तरी यापेक्षा आमची स्वप्ने मोठी आहेत, आणि त्यापेक्षाही स्वप्नपूर्तीसाठीची जिद्द ही मोठी होय. जिद्द, चिकाटी, समर्पितपणा, कामावर फोकस, नाविन्याचा स्वीकार आणि सर्वसमावेशकता यातूनच लाईव्ह ट्रेंडस न्यूजची आजवरची वाटचाल साकारली आहे.

लोकांना पत्रकार आणि त्यात देखील विविधांगी लेखन करणारा पत्रकार म्हणून शेखर पाटील ज्ञात आहे. लाईव्ह ट्रेंडसचा संपादक शेखर पाटील हा यापेक्षा भिन्न आहे. कार्यालयाच्या उदघाटनातील माझ्या भाषणात सांगितल्यानुसार, मी बारागाड्या ओढणारा भगत आहे. आमच्या खान्देशात बहुतांश गावांच्या यात्रोत्सवात बारागाड्या ( एकामागे एक या प्रकारात लावलेल्या बारा बैलगाड्या ) ओढण्याची परंपरा आहे. यातील भगताची भूमिका ही सर्वात महत्वाची अशीच असते. बारागाड्यांचा नायक असणारा भगत हा कडाडणारा डफ वा हलगीच्या तालावर ट्रान्सच्या अवस्थेत घुमत बारागाड्या ओढण्याचा आव आणतो. खरं तर सर्व गाव या बारागाड्या ढकलत असते, मात्र भगत असा आव आणतो की, जणू काही तोच हे काम करतोय. मी संपादक म्हणून नेमकी भगताचीच भूमिका पार पाडत आहे. माझ्या कार्यालयीन आणि फिल्डवरील तमाम सहकारी पत्रकारांना एक समर्पित भावनेतून एकत्र करत मी जळगाव जिल्ह्यातील एक दखलपात्र मीडिया हाऊस तयार करण्याची किमया केली आहे. याला मी निमित्तमात्र ठरलो आहे.

मी फक्त एक चेहरा आणि एक निमित्त आहे…
खरी ताकद माझ्या सहकाऱ्यांची आहे.

जाता-जाता : मी आजवर कधीही लाईव्ह ट्रेंडस न्यूज हे माझ्या मालकीचे असल्याचे मिरवले नाही. मी कधीही यात डोकावलो नाही, लोकांनी याला फॉलो करावे अशी कधी गळ देखील घातली नाही. बहुतेक जणांनी तर आमच्या कार्यक्रमात पहिल्यांदा मला ‘लाईव्ह ट्रेंडस’चा मालक व संपादक म्हणून पाहिले. या कार्यक्रमाचे आभार मानतांना मी अतिशय संक्षीप्त शब्दांचा वापर केला. मी म्हणाले की, ”मी शेखर पाटीलला आम्ही मध्ये परिवर्तीत करणाऱ्या सर्वांचे आभार !” हीच माझी आजवरची भावना होय…खरं तर मी आधी दोन ठिकाणी संपादक म्हणून काम केले होतो. चकाचक कार्यालय, प्रतिष्ठा, चांगली सॅलरी आणि भले मोठे नेटवर्क देखील अनुभवले. मात्र दुसऱ्या संस्थेत काम करणाऱ्या शेखर पाटीलला स्वत:च्या व्यवसायात आणून उभे करण्याची किमया लाईव्ह ट्रेंडसमुळे साधली असून माझ्या मते तरी हीच माझ्यासाठी सर्वात कृतार्थ भावना होय !

( उदघाटन कार्यक्रम आणि यात सहकार्य करणाऱ्यांबाबत स्वतंत्र लिहतोय )

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top