आधुनीक जगातील पासष्टावी कला आणि जिने पूर्ण जगावर कब्जा मिळवलाय ती म्हणजेच जाहिरात कला होय यात कुणाचे दुमत असणार नाही. आणि याच जाहिरातींना नवीन उंचीवर पोहचणारे आणि भारताचे ‘ॲड गुरू’ म्हणून ख्यात असणारे पियुष पांडे यांचे आज निधन झाले. मुद्रीत माध्यम सर्वशक्तीमान असल्याच्या काळापासून ते दूरदर्शन, दूरचित्रवाणी वाहिन्यांपासून ते थेट सोशल मीडियातील रील्सच्या युगापर्यंत अनेक पिढ्यांना आपल्या सृजनाने खिळवून ठेवणाऱ्या पांडेजींनी जाहिरात क्षेत्रात केलेली कामगिरी ही अद्वितीय अशीच मानावी लागणार आहे.

आम्ही तारूण्यात येत असतांनाच क्रिकेटचे सामना पहातांना आलेली एक जाहिरात ही काळजाचा ठोका चुकवत असे. एकदम सिनेस्टाईल सिच्युएशन ! 99 धावांवर असणारा फलंदाज उंच चेंडू टोलवतो आणि तो हमखास झेलबाद होणार म्हणून निराश झालेले प्रेक्षक अशी टेन्स स्थिती ! आणि चेंडू सिमेपार होताच स्टेडियममधील एक सुंदर तरूणी झोकात उठून पोलिसाला चुकवत मैदावर नाचतच धाव घेते. तिचे दोन्ही हात उंचावून आपल्या मैत्रीणीला गच्च मिठी मारणे असो की, मैदानात जणू काही तरंगत येतांनाची भावदशा ! तिचा एक्सटसीच्या धुंदीतील बहारदार नाच पाहून ‘काळीज खल्लास !’ अशी स्थिती व्हायची.
पहा कॅडबरीची आयकॉनीक जाहिरात
‘कुछ खास है हम सभी मे…कुछ बात है हम सभी मे…बात है, खास है….कुछ स्वाद है…क्या स्वाद है जींदगी मे !’ या अवघ्या काही शब्दांना मनमोहक असे संगीत, जबरदस्त चित्रीकरण आणि अर्थातच त्या कमनीय बांधा असणाऱ्या सुंदर ललनेचे हावभाव आणि आयकॉनीक डान्स हा आजच्या एखाद्या व्हायरल रील पेक्षाही अधिक सरस व फँटसीच्या विश्वात घेऊन जाणारा असाच होता. अवघ्या काही सेकंदाचा हा ड्रामा आपल्या भावविश्वाचा अविभाज्य घटक बनला होता. तेव्हा ही जाहिरात कुणी बनवली असेल ? असा प्रश्न पडला नाही. यथावकाश मीडियात आल्यानंतर सर्व बाबी कळू लागल्या. आणि यातूनच पियुष पांडे या किमयागाराची ओळख झाली.
पहा कॅडबरी दुसरी आवृत्ती
आज पियुषजी यांनी शेवटचा श्वास घेतल्यानंतर त्यांच्याबाबत मेनस्ट्रीम आणि सोशल मीडियातील प्रतिक्रिया पाहता हा माणूस किती उत्तुंग व्यक्तीमत्व होता याची चुणूक आपल्याला मिळते. एखाद्या प्रॉडक्टचे ब्रँडींग करतांना अनेक बाबी लक्षात घ्याव्या लागतात. एक तर त्या प्रॉडक्टचे कशाशी तरी तदात्म्य जोडावे लागते. यानंतर, त्याच्या कॅचलाईन पासून ते संगीतासह त्याच्या परिणामकारक चित्रीकरणापर्यंत प्रत्येकावर खूप काम करावे लागते. त्यातून अवघ्या काही सेकंदात त्या उत्पादनाची जाहिरात आकारात येते. या सर्व प्रकारात केंद्रस्थानी असतो तो याचा सृजनकर्ता ! आणि अशाच प्रकारातील सर्जनशीलता पियुष पांडे यांच्यात असल्यानेच ते भारतीय जाहिरात उद्योगातील ‘लार्जर दॅन लाईफ प्रतिमा’ असलेले दिग्गज बनले.
पहा : चल मेरी लुना !
वर नमूद केलेल्या जाहिरातीत त्यांनी क्रिकेटच्या लोकप्रियतेला केंद्रस्थानी ठेवतांनाच चॉकलेट हे फक्त बालकांसाठीच असते हा समज विलक्षण परिणामकारकतेने खोडून काढला. याच्या अनेक आवृत्या आल्या तरी मूळ जाहिरातीची बात काही औरच होती. नाही म्हणायला 2021 साली लिंग बदलून ही जाहिरात तयार करण्यात आली. यात एक महिला खेळाडू सिक्सर टोलावते, आणि प्रेक्षकांमधील एक सरदारजी भन्नाट डान्स करतो. ही जाहिरातही विलक्षण गाजली. डेअरी मिल्कच्या या जाहिरातींना ‘कँपेन ऑफ द सेंच्युरी’ पुरस्काराने गौरविण्यात आले ते उगीच नव्हे !
पहा : ठंडा मतलब कोकोकोला
पियुष पांडे यांची महत्ता म्हणजे त्यांनी जाहिरातींना भारतीयत्व प्रदान केले. जाहिरात म्हणजे निव्वळ काही वस्तू विकणे नव्हे तर ते प्रॉडक्ट पाहणाऱ्याच्या मनात ठसविणे होय हे त्यांनी दाखविले. आधी जाहिराती या पाश्चात्य ॲडचे अंधानुकरण असे. त्यांनी याच्या विपरीत अस्सल भारतीय मातीतल्या जाहिराती तयार करून त्या लोकप्रिय देखील केल्या.
पहा : व्होडाफोनची झुझू जाहिरात
याचे एक समर्पक उदाहरण म्हणजे फेव्हीकॉलचे कँपेन होय. गर्दीने भरलेली बस असो वा मासे पकडणारा माणूस, प्रत्येक जाहिरात भारतीय वास्तवाचा आरसा होती. ‘फेविकॉल का मजबूत जोड है, टूटेगा नहीं’ ही टॅगलाइन केवळ एक घोषवाक्य न राहता, भारताच्या विविधतेतील एकतेचे आणि अतूट नात्यांचे प्रतीक बनली. तसेच फेव्हीकॉल व फेव्हीक्विकच्या जाहिरातींमध्ये अतिशय निखळ अशा विनोदाचा त्यांनी वापर केल्याचे दिसून आले.
तर दो बुंद जिंदगी की ! या मोहिमेतून त्यांनी विलक्षण परिणामकारक पध्दतीत पोलीओमुक्त भारतासाठी मोठा हातभार लावला. एशियन पेंट्सच्या ‘हर घर कुछ कहता है’ या मोहिमेने घरातील कथा, आठवणी आणि नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित केले, ज्यामुळे रंग केवळ सजावटीचा थर न राहता त्या भावनिक परिसराचा एक अविभाज्य भाग बनला. ‘बुलंद भारत की बुलंद तस्वीर’ ही विशालकाय प्रतिमा वापरतांनाच त्यांनी ‘हमारा बजाज’ असा स्नेहमय बंध गुंफला. भारत आर्थिक उदारीकरणाच्या वाटेवरून वाटचाल करण्याच्या तयारीत असतांनाच मध्यमवर्गीयांच्या आशा-आकांक्षाचे प्रतिक ‘चल मेरी लुना’ या जाहिरातीत वापरत तिला ‘सफलता की सवारी !’ म्हणून प्रोजेक्ट केले.
सोशल मीडियाचे आगमन होत असतांनाच त्यांनी व्होडाफोनसाठी ‘झूझू’ या पात्रांचा वापर करून केलेल्या जाहिराती देखील तुफान गाजल्या. यात देखील त्यांनी क्रिकेटचाच समर्पक वापर केला. तर यात कोणत्याही शब्दाचा वापर न करता जबरदस्त संदेश देण्यात ते यशस्वी झाल्याने झुझु या ‘कल्चरल आयकॉन’ बनल्या. एसबीआय लाईफ इन्शुरन्समध्ये त्यांनी मृत्यूची भिती न दाखविता जगण्याच्या उत्सवाला प्राधान्य दिले.
पहा : फेव्हीकॉल जाहिरात
मानवी भावनांचा कल्लोळ हा पियुष पांडे यांच्या जाहिरातीतील अविभाज्य घटक आहे. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी गुगलसाठी तयार केलेली ‘रियुनियन’ ही अविस्मरणीय जाहिरात होय. फाळणीत एकमेकांची साथ सुटलेल्या हिंदू व मुस्लीम मित्रांना गुगल सर्चच्या माध्यमातून कसे जोडले जाते याची विलक्षण हळूवार अशी कथा त्यांनी गुंफली. ही जाहिरात देखील प्रचंड लोकप्रिय झाली. आजही याला पाहतांना आपले डोळे पाणवतात. यातून गुगल हे निव्वळ ‘सर्च इंजिन’ नसून ते मानवी नात्यांना जोडणारे असल्याचा संदेश देखील देण्यात आला. आजही ‘रियुनियन’ ही जाहिरातीचा एक सर्वोत्तम नमूना म्हणून ओळखली जाते.
पहा : रियुनियन जाहिरात
पियुष पांडे यांनी केवळ व्यावसायीक उत्पादनेच विकली नाहीत तर 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ‘पॉलिटीकल कँपेनींग’चा मापदंड प्रस्थापित करणारी मोहिम राबविली. त्यांच्या ‘अब की बार मोदी सरकार’ आणि ‘हम मोदीजी को लाने वाले है…अच्छे दिन आने वाले है !’ या कॅचलाईन्स जबरदस्त गाजल्या. देशातील परिवर्तनाच्या वाऱ्याला एका महाप्रचंड वावटळीत परिवर्तीत करण्याची किमया या घोषणांनी केली. राजकीय जाहिरातींच्या क्षेत्रात ही मोहिम अजरामर झाली आहे.
पियुष पांडे यांच्या सर्जनशीलतेमुळेच ते काम करत असलेली ‘ओगिल्वी’ ही कंपनी देशातील आघाडीची जाहिरात कंपनी बनली. या जाहिरात मोहिमांनी केवळ उत्पादने विकली नाहीत, तर भारताच्या सांस्कृतिक जाणिवांना आकार दिला आणि एक शक्तिशाली व चिरस्थायी वारसा मागे ठेवला.
पांडे यांनी ‘पांडेमोनियम’ नावाचे पुस्तक लिहिले, ज्यात त्यांनी आपले जीवन आणि सर्जनशील प्रक्रियेबद्दलचे विचार मांडले आहेत. त्यांच्या मते, चांगल्या कल्पना या बोर्डरूमच्या बंद खोल्यांमध्ये नाही, तर बाहेरच्या जगात, लोकांच्या जीवनाचे निरीक्षण करून मिळतात. त्यांनी ब्रँड्सना केवळ उत्पादने विकायला नाही, तर लोकांच्या हृदयाशी संवाद साधायला शिकवले. त्यांनी विनोद, भावना आणि भारतीय संस्कृतीचा वापर करून अशा कथा (Stories ) तयार केल्या, ज्या केवळ जाहिराती न राहता आपल्या सामूहिक चेतनेचा एक अविभाज्य भाग बनल्या. त्यांची कहाणी म्हणजे सर्जनशीलतेने कसे केवळ ब्रँडच नाही, तर संस्कृतीलाही आकार देता येतो, याचा एक प्रेरणादायी धडा आहे.
पियुष पांडे यांची कला केवळ जाहिराती बनवण्यापुरती मर्यादित नव्हती, तर ती भारतीय समाजाचा आरसा होती. त्यांच्याकडून शिकण्यासारखी सर्वात मोठी गोष्ट हीच आहे की, तंत्रज्ञान आणि डेटा कितीही प्रगत झाला तरी, कथेच्या केंद्रस्थानी नेहमीच एक प्रामाणिक मानवी भावना असली पाहिजे. तीच भावना लोकांच्या हृदयाला जोडते आणि ब्रँड तयार करते. त्यांचा विश्वास होता की ब्रँड केवळ ‘तर्काने (Logic)’ नाही, तर ‘जादूने (Magic)’ तयार होतात.
पहा : हमारा बजाज
खरं तर पियुष पांडे हे बहुआयामी व्यक्तीमत्व होते. त्यांनी ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ हे भारतीय एकतेचे प्रतिक बनलेले गाणे लिहले होते. काही चित्रपटात त्यांनी भूमिका देखील केल्या. एक उत्तम वक्ता आणि लेखक म्हणूनही त्यांची ख्याती होती. तथापि, त्यांचा खरा पिंड हा सर्जनशील जाहिरातींचाच होता. याचा विचार करता त्यांच्या माध्यमातून भारतीय जाहिरात क्षेत्रातील एका युगाचा अस्त झाले आहे. अर्थात, त्यांच्या जाहिरातीतील सृजनातून ते चिरंतन आपल्या सोबत राहणार आहेत.
पियुष पांडे यांचा वारसा हा केवळ यशस्वी जाहिरातींपुरता मर्यादित नाही, तर तो एक महत्त्वाचा धडा आहे. तो सांगतो की सर्जनशीलता, सहानुभूती आणि आपल्या मुळांची खोलवरची समज असेल, तर असे काम निर्माण करता येते जे केवळ ब्रँडच घडवत नाही, तर संस्कृतीलाही आकार देते.