फटा पोस्टर, निकला हिरो : रीलबाजांच्या स्वप्रतिमेचे ‘सिनेमॅटिक’ मायाजाल !

राजकारणाच्या गढूळ वातावरणात राहूनही सुसंस्कृतपणा जोपासणारे एक सुविद्य नेते माझे मित्र आहेत. मात्र अलीकडच्या काळात सोशल मीडियातील त्यांच्या विविध उथळ रील्सचा भडीमार पाहून मला धक्का बसला. उठसूठ स्लो मोशन, कडक गाणी वा डायलॉग्जमधील ॲटीट्युड, आजूबाजूला एपीक वातावरण ! मी त्यांना म्हणालो, ”’***भाऊ हे तुम्हाला खरोखर आवडते का ? यातून तुम्हाला जनतेला आवश्यक असणारा संदेश देता येतो का ? तुमची कामगिरी मतदारांपर्यंत पोहचते का ?” ते म्हणाले- ”मुळीच नाही आवडत ! पण आता प्रत्येकाची स्थिती लग्नातील नवरदेव व नवरींसारखी झालीय. स्वत:चे स्वातंत्र्य नाही, फक्त फोटोग्राफर व व्हिडीओग्राफरच्या सूचना पाळाव्या इतकेच त्यांच्या हातात असते. आता प्रत्येक जणच हिरो बनण्यासाठी स्मार्टफोनच्या तालावर कळसूत्री बाहुलीप्रमाणे वागू लागलाय. तर मी काय करणार ? …शेवटी ट्रेंड फॉलो करणे महत्वाचे !” हे उत्तर मला खूप समर्पक वाटले. आता प्रत्येकाचे जीवन हे सीनेमॅटीक रीलपर्यंत येऊन पोहचले आहे. अर्थात, वास्तव काहीही असो, आकर्षक दिसणे व दाखविणे हेच बहुतेकांच्या आयुष्याचे ध्येय बनलेय !

शेखर पाटील

आपल्या आजूबाजूला माणसे जितकी वाढली नसतील तितके त्यांच्या आयुष्याचे ‘ट्रेलर्स’ वाढले आहेत. फेसबुक उघडा, इन्स्टाग्राम उघडा, व्हॉट्सॲप स्टेटस पाहा किंवा यूट्यूब शॉर्ट्सवर फिरा; कुठे ना कुठे कुणीतरी चालत येत असतो, कुणीतरी गॉगल लावत असतो, कुणी स्वप्नसुंदरी सोबत असतो, कुणीतरी गाडीचा दरवाजा बंद करत असतो, कुणीतरी मंदिराच्या पायऱ्या चढत असतो, तर कुणीतरी खुन्नस देत पाहत असतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक विलक्षण चकाकी आणि आत्मविश्वास असतो. जणू तोच त्या क्षणाचा केंद्रबिंदू आहे आणि जगाने आता त्याच्याकडेच लक्ष द्यावे. आपल्या प्रत्येकाची सोशल फिड अशा रील्सने ओसंडून वाहू लागली आहे. काही जणांना प्रत्यक्ष भेटण्याआधी आपण त्यांच्या आयुष्याचे इतके सिनेमॅटिक ट्रेलर्स पाहून झालेले असतात की प्रत्यक्ष माणूस भेटल्यावर तो आपल्याला त्याच्या रीलपेक्षा कितीतरी पटीने साधा वाटू लागतो. मात्र बहुतेकांना ‘रील’ आणि ‘रीअल’ यातील फरक समजत नाही है दुर्दैव !

या सिनेमॅटिक युगाची सुरुवात आजची नाही. साधारण दहा-बारा वर्षांपूर्वी स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यांनी आणि त्यातील फिल्टर्सनी स्वतःला मिरवण्याच्या पद्धतीत मोठी क्रांती घडवून आणली होती. त्याआधी फोटो म्हणजे जसा आहे तसा फोटो येत असे. नंतर फिल्टर आले आणि अचानक आपल्या चेहऱ्यावर डिजिटल सौंदर्यप्रसाधनांचा थर चढू लागला. त्वचा गुळगुळीत झाली, चेहरा उजळला, डोळे चमकले, आकाश अधिक निळे झाले, झाडे अधिक हिरवी दिसू लागली. काही फिल्टर्स तर इतके शानदार होते की आपला फोटो पाहतांनाही वाटायचो की, ‘अरे हा मीच आहे का ?’ पण ते दिवस तुलनेने निरागस होते. कारण तेव्हा आपण फक्त चेहरा सुधारत होतो. आज आपण संपूर्ण आयुष्याचीच ‘पोस्ट-प्रॉडक्शन’ करत आहोत. पूर्वी फिल्टर फोटोला होता; आता फिल्टर जीवनशैलीला आहे.

आता तो काळ बाळबोध वाटावा अशी स्थिती आहे. आज मापदंडच बदललाय. आता नुसतं सुंदर दिसून भागत नाही, आता “मी किती हिरो दिसतो” हे सिद्ध करावं लागतं. फिल्टरचा जमाना हा जणू प्राथमिक शाळेसारखा वाटावा, इतकी प्रगती (की अधोगती?) सिनेमॅटीक रील्सने केलीये. आधी आपण नुसते सुंदर दिसायचो, आता आपण थेट सिनेमाचा नायकच होऊन जातो – संगीत, अँगल, स्लो-मोशन सगळं कंप्लीट पॅकेज घेऊन ! खरं सांगायचं तर रोजचं आयुष्य रटाळ आहे. म्हणजे तेच ते – ऑफिस, ट्रॅफिक, वाद घालणं, कौटुंबीक, आर्थीक व सामाजिक ताण अन्‌ सगळेच काही कंटाळवाणे. यात कुठलाही “हिरोपणा” नसतो. पण रील्सच्या माध्यमातून आपण आपल्याच आयुष्याची एक झकपक आवृत्ती तयार करू शकतो, जिथे आपणच नायक असतो आणि बाकी सगळे केवळ पार्श्वभूमीतले पात्र ! शिवाय लाईक्स आणि कमेंट्सची भूकही काही कमी नाही. नुसती एक चांगली कमेंट आली की मन एकदम सुखावतं. मग हळूहळू साध्या चालण्यातसुद्धा नकळत एक ऐट येते, बोलण्यातही एक नाटकीपणा शिरतो. आपण स्वतःच्याच आयुष्याचे दिग्दर्शक, नायक आणि प्रेक्षक तिन्ही एकाच वेळी झालेलो असतो.

या संपूर्ण प्रकाराला सर्वांत मनापासून राजकारण्यांनी स्वीकारले. नेत्यांच्या रील्समध्ये असे काही मनमोहक असते की पुढच्या काही सेकंदांत किमान एखादी ऐतिहासिक घोषणा तरी होणार असे वाटते. नंतर कळते की हा कार्यक्रम नगरपालिकेच्या रस्त्याच्या पाहणीचा होता. आजच्या सिनेमॅटिक राजकारणात गटाराच्या कामालाही ‘Mission’, पाण्याच्या टाकीला ‘Historic Moment’ आणि चार कार्यकर्त्यांच्या भेटीला ‘जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद’ बनवण्याची ताकद एडिटिंगमध्ये आहे. काही नेत्यांच्या रील्स पाहिल्यावर तर आपल्याला वाटते की त्यांच्या सार्वजनिक आयुष्यातील मोठा भाग गाडीतून उतरणे, दोन पावले चालणे आणि गॉगल व्यवस्थित करणे यातच जात असावा. आणि राजकारणी तर हे सर्व काही प्रोफेशनल पध्दतीत करत असले तरी विविध क्षेत्र तर सोडूनच द्या आता सर्वसामान्यांना देखील ‘रील मॅनिया’ झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. देशाच्या पंतप्रधानांपासून ते गल्लीबोळातल्या पोराटोरांनाही रीलयुगाने वेड लावलेय हे निश्चीत ! समाजातील श्रीमंतातील श्रीमंतांपासून ते फाटक्या लोकांपर्यंत सर्वच जण रीलच्या पूर्णपणे आहारी गेल्याचे दिसून येत आहे.

हे सगळे एवढे लोकप्रिय का झाले, हा प्रश्न मात्र महत्त्वाचा आहे. याचे उत्तर केवळ दिखाव्यात नाही. माणसाला नेहमीपासूनच स्वत:बाबत सांगायला आवडते हे कुणाला नाकारता येणार नाही. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात स्वतःला नायक मानत असतो. पूर्वी त्याला ते नायकपण फक्त स्वतःच्या कल्पनेत अनुभवता येत असे. आज सोशल मीडियाने त्याला स्मार्टफोनमधील कॅमेरा दिला, एडिटिंग दिले, संगीत दिले, सोशल मीडिया फिडमधील प्रेक्षक दिले आणि स्वतःची स्टोरी आपापल्या पद्धतीने मांडण्याचे व्यासपीठ दिले. पूर्वी प्रसिध्दीसाठी मीडिया आवश्यक होता. आता सोशल मीडियामुळे प्रत्येक जण स्वतःची कथा स्वतःच कल्पकतेने सांगू शकतो. ही बाब एका अर्थाने अत्यंत सुंदर आहे.

यात चुकीचे काही नाही. उलट सामान्य आयुष्यालाही दृश्यात्मक महत्त्व देण्याचा हा एक मार्ग आहे. रोजच्या जगण्यात टाळ्या फार कमी मिळतात. दैनंदिन कामात ना उत्कंठा असते ना बॅकग्राउंड म्युझिक ! त्यामुळे एखाद्या व्यक्तीला वीस-तीस सेकंदांसाठी स्वतःचा चेहरा सिनेमातील नायकासारखा पाहून आनंद मिळत असेल, तर तो आनंदही काही छोटा नाही. त्या अल्प काळासाठी त्याच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येतात. पण, गंमत तेव्हा सुरू होते जेव्हा हा प्रकार थांबतच नाही. प्रत्येक गोष्ट ‘Epic’, प्रत्येक क्षण ‘Iconic’, प्रत्येक प्रवास ‘Journey’, प्रत्येक वाढदिवस ‘New Chapter’, प्रत्येक नवीन शर्ट ‘Transformation’, प्रत्येक चहा ‘Therapy’, प्रत्येक रविवार ‘Reset’ आणि प्रत्येक सोमवार ‘Back to Grind’ झाला की साधेपणाला कुठे जागा उरते ? प्रत्येक क्षण खास बनवण्याच्या धडपडीत खासपणाचेच मूल्य कमी होऊ लागते. प्रत्येक एन्ट्री ‘ग्रँड’ असेल तर साधी एन्ट्री कुठे गेली ? प्रत्येक छोट्या गोष्टीला ट्रेलर असेल तर पूर्ण चित्रपटाचे महत्त्व काय उरले ? यामुळे अति झाले अन्‌ हासू आले अशी स्थिती निर्माण होते.

हळूहळू आपण अनुभव आणि त्याचे प्रदर्शन यांच्या मधल्या एका विचित्र अवस्थेत येऊन पोहोचलो आहोत. पूर्वी माणूस प्रवास करायचा आणि त्याचे फोटो काढायचा; आता काही वेळा फोटो काढण्यासाठी प्रवास ठरतो. पूर्वी कपडे घालून फोटो काढला जायचा; आता फोटो कसा येईल याचा विचार करून कपडे निवडले जातात. पूर्वी कार्यक्रम झाल्यानंतर त्याची बातमी व्हायची; आता कार्यक्रम सुरू होण्याआधीच त्याची रील कशी दिसेल याची आखणी केली जाते. यासाठीची स्वतंत्र यंत्रणा कामाला लागते. आपण खोटे जगत आहोत असे नाही, पण आपल्या खऱ्या आयुष्याची निवडक, संपादित, संगीतबद्ध आणि सुंदर आवृत्ती जगासमोर ठेवत आहोत. यामुळे कुणी केलेल्या कामांचा प्रचार करताय तर कुणी आश्वासन देताय, कुणी भाईगिरी करून समोरच्यांना धमकावताय तर कुणी आपले प्रेम जगासमोर मांडताय. कुणी दु:ख कुरवाळतेय तर कुणी बेकाबू होऊन हसतेय. प्रत्येक क्षणाला जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे रील्स बनताय. आणि या सर्वांचा उद्देश एकच- इतरांचे लक्ष वेधून घेणे !

खरे तर माणूस हे नेहमीच करत आला आहे. पूर्वी पाहुणे घरी आले की चांगली चादर बाहेर काढायची, सुंदर कप-बशा वापरायच्या, दिवाणखान्यातील पसारा आतल्या खोलीत ढकलायचा. आज आपण तेच डिजिटल स्वरूपात करतो. पसाऱ्याऐवजी बॅकग्राउंड ब्लर करतो, चांगल्या चादरीऐवजी फिल्टर वापरतो आणि पाहुण्यांऐवजी सोशल मीडियातल्या फॉलोअर्ससमोर आपली नीटनेटकी आवृत्ती ठेवतो. त्यामुळे सिनेमॅटिक रील हा फक्त तंत्रज्ञानाचा प्रकार नाही; तो मानवी स्वभावाचा आधुनिक अविष्कार आहे.

कदाचित म्हणूनच या सिनेमॅटिक रील्सकडे फक्त संताप वा वैतागाने पाहण्याऐवजी थोड्या कुतूहलाने आणि थोड्या विनोदाने पाहणे जास्त योग्य ठरेल. यात आत्ममग्नता आहे, पण सर्जनशीलताही आहे. प्रदर्शन आहे, पण आत्मविश्वासही आहे. स्पर्धा आहे, पण सामान्य आयुष्याला थोडे भव्य बनवण्याची इच्छा देखील आहे. प्रत्येकाला आयुष्यात नेहमीच मोठा पडदा मिळत नाही; सोशल मीडियाने मात्र प्रत्येकाच्या हातात एक छोटा पडदा दिला आहे. त्या पडद्यावर तो स्वतःच नायक आहे, स्वतःच दिग्दर्शक आहे, स्वतःच निर्माता आणि अनेकदा स्वतःच सर्वांत निष्ठावंत प्रेक्षकही आहे. रील पोस्ट केल्यानंतर ती पुन्हा उघडून पाहणे, संगीत नीट लागले का तपासणे, कट छान आहे का पाहणे, लाईक्स किती आले हे बघणे—या सगळ्यात निर्माता स्वतःच स्वतःच्या चित्रपटाचा पहिला ‘बिंज-वॉचर’ बनतो. भ्रामक विश्वातील ही मुशाफिरी त्याला जीवन जगण्यासाठी एक नवी उभारी देते. खरं तर, रील्सच्या माध्यमातून ब्रँडींग, व्यवसायवृध्दी वा कमाई होत असली तरी याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे देखील आपण लक्षात घेण्याची गरज आहे. यामुळे तूर्तास तरी बहुतांश लोकांसाठी रील हे मनोरंजनाच्या पलीकडे फारसे उपयुक्त नाहीच.

आपण आज जुन्या फोटो स्टुडिओतील चित्रांकडे पाहतांना ते सर्व विनोदी वाटते. मागे रंगवलेला बगीचा, बाजूला प्लास्टिकची फुलदाणी, हाताखाली लाकडी स्टँड, नकली बाईक वा स्कूटर आणि चेहऱ्यावर अतिशय गंभीर भाव ! असे फोटो प्रत्येकाच्या घरात असतात. आणि ते पाहून आपल्याला हसू येते. कदाचित तीस वर्षांनी आपली मुले आणि नातवंडे आजच्या रील्स पाहून विचारतील, “तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये स्लो का चालत होतात ? गॉगल का काढत होतात?” त्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर कदाचित आपल्याकडे नसेल. कारण प्रत्येक काळाची स्वतःची एक ‘पोझ’ असते. आजच्या काळाची पोझ म्हणजे थोडे तिरपे उभे राहणे, कॅमेऱ्याकडे न पाहणे, गॉगल लावणे, कॉलर सरळ करणे आणि मग स्लो मोशनमध्ये दोन पावले चालणे. हे आता एक शास्त्रच बनले असून गल्लोगल्ली याच्या क्रियेटर्सचे अक्षरश: पीक आले आहे. खरे तर ‘सिनेमॅटिक रील’ ही आपल्या काळाची एक सांस्कृतिक खूण बनली आहे. ज्याला बहुतेकांना टाळता येत नाही.

आणि या सगळ्या सिनेमॅटिक रील्सच्या गर्दीकडे पाहताना हिंदी सिनेमातील —“फटा पोस्टर, निकला हिरो !” हा डायलॉग आठवल्याशिवाय राहत नाही. फरक एवढाच की आता पोस्टरमधून नव्हे तर, मोबाईलची स्क्रीन उघडली की प्रत्येक स्वाइपला नवा हिरो बाहेर पडतो! कुणी गाडीतून उतरत आहे, कुणी गॉगल चढवत आहे, कुणी कॉलर सरळ करत आहे, कुणी पावसात चालत आहे, तर कुणी चार मित्रांना मागे घेऊन अशा रुबाबात पुढे सरकत आहे की पुढच्या क्षणी तो देशाला उद्देशून भाषण करणार की काय, अशी शंका यावी. यात राजकारण्यांचा प्रपोगंडा आहे, कपल्सचे प्रेम आहे, कुणाचा मेलोड्रामा तर कुणाची कॉमेडी देखील आहे. कुणी खुश होतोय तर कुणी अश्रू ढाळतोय. सिनेमात हिरो होण्यासाठी कथा, दिग्दर्शक, निर्माता आणि पडदा लागत असे; आता एक स्मार्टफोन, थोडे स्लो मोशन, जोरदार बॅकग्राउंड म्युझिक आणि आत्मविश्वासाने भरलेली काही सेकंदांची चाल पुरेशी आहे. आधी आपण रूपेरी पडद्यावर दुसऱ्या हिरोला पाहत होतो. आता आपल्याच हातातील स्मार्टफोनच्या स्क्रीनवर स्वत:लाच नायक म्हणून पाहण्यात काय वाईट ?

म्हणून सिनेमॅटिक रील करणाऱ्यांना करू द्या. गाडीतून चारदा उतरू द्या, पहिला शॉट चुकला तर पुन्हा गाडीत बसू द्या, कॉलर दहा वेळा सरळ करू द्या, गॉगल लावू द्या, काढू द्या, रिकाम्या रस्त्यावरून गंभीर चेहऱ्याने चालू द्या आणि मागे मित्रांना सुरक्षा रक्षकांसारखे घेऊन फिरू द्या. हेही आपल्या काळाचे एक सामूहिक नाटक आहे आणि त्यात कलाकार व प्रेक्षक दोन्ही आपणच आहोत. त्यांना हे आवडते त्यांनी नक्की हे करावे, आणि नाही, आवडत त्यांनी हे मुकाटपणे सहन करावे हेच उत्तम !

रीलच्या आहारी गेले तरी चालेल पण कधी तरी स्मार्टफोन बाजूला ठेवून जीवनाची मजा घेण्यास काहीही हरकत नाही. एखादा चहा त्याची रील न करता प्यावा, एखादा सूर्यास्त स्टोरीला न टाकता आपणच मंत्रमुग्ध होऊन पाहावा, एखाद्या मित्र वा मैत्रीणीला मिठी मारताना कॅमेरा कुठे आहे याचा विचार करू नये, मंदिरात गेल्यावर प्रथम देवाकडेच पाहावे आणि एखाद्या दिवशी गाडीतून फक्त उतरावे—‘एन्ट्री’ करू नये. कारण आयुष्यातील प्रत्येक क्षणाला ट्रेलरची गरज नसते. काही क्षण स्वतःतच पूर्ण चित्रपट असतात. आणि गंमत अशी की आपल्या आयुष्यातील सर्वांत सुंदर, सर्वांत खरे आणि सर्वांत ‘सिनेमॅटिक’ क्षण अनेकदा तेच असतात ज्यांच्या वेळी कॅमेरा सुरूच नसतो. कारण खरा आनंद फिल्टर आणि स्लो-मोशनमध्ये नाही, तर आजूबाजूच्या खऱ्या आणि साध्या क्षणांमध्ये दडलेला असतो. प्रत्येकाने असेच अनफिल्टर्ड आयुष्य जगावे, आणि त्यांना सिनेमॅटीक आयुष्य हवे त्यांनी खुशाल रील्समध्ये हरवून जावे !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top