काही दिवसांपूर्वी माझा मुलगा आणि मुलगी ( जे जेन-झी पिढीतील असून नवमतदार आहेत ! ) यांनी मला अतिशय उत्कंठतेने कॉकरोच जनता पार्टीबाबत सांगितले तेव्हा मी थंड प्रतिसाद दिला. सोशल मीडियात असे काही तरी क्रेझी होतच असल्याने मी याकडे साफ दुर्लक्ष केले तेव्हा मुले हिरमुसली. मात्र दोन दिवसांत सोशल मीडियात यावरून प्रचंड लाट उसळल्यानंतर मला याचे गांभीर्य लक्षात आले तेव्हा मुलांनी माझी फिरकी घेतली. ”पप्पा आम्ही आधीच मित्रांसह कॉकरोच जनता पार्टीला फॉलो केले आहे….तुम्ही देखील करा !” आता हाच प्रश्न मला सतावतोय की, मी प्रचंड सजग आणि वर्तमानाविषयी विलक्षण आवड असणारा असून देखील मला घरातील जेन-झीच्या मनात काय चाललेय याचा थांगपत्ता लागला नाही. तर याच पिढीच्या देशातील तरूणाईच्या मनात नेमके काय चाललेय ? हे प्रौढ, ज्येष्ठ आणि वृध्दांची पिढी समजून घेणार की नाही ?

शेखर पाटील
भारतीय राजकारणाचा पाच दशकांचा इतिहास तपासून पाहिला असता जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन, आणीबाणी, जनता सरकारचा उदय व अस्त, शाहबानो प्रकरण, रामजन्मभूमी आंदोलन, मंडल आयोगाचे पडसाद अन् याला कमंडल विचारधारेचा प्रतिकार, केंद्र व राज्यातील युती आघाड्यांचे प्रयोग, २०११ चे ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ आंदोलन आणि त्यानंतर जन्माला आलेली ‘आम आदमी पार्टी’; २०१४ मध्ये उसळलेली मोदी लाट आणि यानंतर प्रखर हिंदुत्वाचे राजकारण असे महत्वाचे टप्पे आपल्याला यातून दिसून येतात. मात्र यंदाच्या कडक उन्हाळ्यात भारतीय डिजिटल विश्वात जे काही घडत आहे, ते अत्यंत अभूतपूर्व आणि चकित करणारे आहे. सरन्यायाधिश सूर्यकांत यांनी बेरोजगारांना उपहासाने दिलेली झुरळाची उपमा ही लागलीच ट्रेंडींगला येणे तसे स्वाभाविक होते. तथापि, यातून अचानक निर्माण झालेली ‘कॉकरोच जनता पार्टी’ ( सीजेपी ) आज देशातील सर्वात मोठा डिजिटल ट्रेंड बनली आहे. अवघ्या काही दिवसांत या उपरोधिक पक्षाने इन्स्टाग्रामवर थेट सत्ताधारी भारतीय जनता पक्षालाही मागे टाकले आहे. पण एक पत्रकार आणि यापेक्षा देखील मेनस्ट्रीम व डिजीटल मीडीयाचा अभ्यासक म्हणून मला पडलेला मूळ प्रश्न असा आहे: केवळ सोशल मीडियावरील मीम्स आणि उपरोधाच्या जोरावर उभी राहिलेली ही ‘कॉकरोच जनता पार्टी’ भविष्यात प्रस्थापित राजकीय पक्षांना गंभीर राजकीय पर्याय बनू शकेल का ? की निव्वळ एक तत्कालीन उद्रेक म्हणून याची नोंद घेतली जाईल ?
१५ मे २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांची तुलना अनपेक्षितपणे ‘कॉकरोच’ आणि ‘समाजावरील परजीवी’ अशी केली. ही टिप्पणी जरी नंतर स्पष्टीकरण देऊन सावरून घेण्याचा प्रयत्न झाला, तरी देशातील सुशिक्षित पण बेरोजगार तरुणांच्या मनाला ती थेट लागली. १६ मे रोजी अभिजित दिपके नावाच्या एका तरुण डिजिटल रणनीतीकाराने (जो एकेकाळी ‘आप’साठी काम करत होता) या विचाराला बरोबर टिपले. त्याने उपरोधाने म्हटले की, “जर व्यवस्था आपल्याला कॉकरोच समजत असेल, तर आपण सर्व कॉकरोच एकत्र येऊ या!” आणि इथेच जन्म झाला ‘कॉकरोच जनता पार्टी’चा !
आता लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, ‘कॉकरोच जनता पार्टी’ या नावामध्येच उपरोध दडलेला आहे. समाजातील बेरोजगारी, आर्थिक असुरक्षितता, भ्रष्टाचार, संधींची कमतरता आणि तरुणांबद्दलची उपेक्षेची भावना या सगळ्यांविरोधात ही संकल्पना उभी राहिल्याचे दिसते. विशेष म्हणजे या चळवळीने ‘अपमानाला ओळख बनवणे’ ही पद्धत स्वीकारली आहे. जेव्हा एखाद्या वर्गाला सतत कमी लेखले जाते, दुर्लक्षित केले जाते किंवा त्यांच्या समस्या गांभीर्याने घेतल्या जात नाहीत, तेव्हा तेच लोक उपरोधाला शस्त्र बनवतात. याच प्रकारातून सीजेपीचा उदय झाला. या पक्षाची अधिकृत घोषणा करताना काही अटी ठेवण्यात आल्या: यामध्ये सदर पक्षाला जॉईन करण्यासाठी तुम्ही बेरोजगार असले पाहिजे; तुम्ही आळशी आणि २४ तास ऑनलाईन असणारे असले पाहिजे आणि यासोबत, तुम्हाला व्यवस्थेवर व्यावसायिक पद्धतीने वैचारिक संताप व्यक्त करता आला पाहिजे.
पहिल्यांदा सर्वांना हा प्रकार म्हणजे एक विनोद वाटला. तथापि, काही दिवसांमध्येच सोशल मीडियावर सीजेपीला मिळालेला प्रतिसाद हा भल्याभल्यांना थक्क करणारा ठरला आहे. इन्स्टाग्रामवर तर जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष अशी बिरूदावली मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्ष तसेच अन्य मातब्बर पक्षांपेक्षा जास्त फॉलोअर्स त्यांना मिळाल्याने सोशल मीडियात ते ट्रेंडींगला आले. अर्थात, लोकप्रियता मिळाल्यानंतर अपेक्षेनुसार त्यांच्या वाटेत अडसर देखील निर्माण झाले. त्यांचे एक्स (आधीचे ट्विटर ) अकाऊंट बंद करण्यात आले. तथापि, त्यांनी जिद्दीने पुन्हा नवीन अकाऊंट खोलून वाटचाल सुरू केली असून त्यांना तुफान प्रतिसाद लाभत आहे. सीजेपीचा संस्थापक हा अमेरिका स्थित मध्यमवर्गीय मराठी तरूण अभिजीत दिपके असून त्याने आधी आम आदमी पक्षासोबत काम करण्याचे देखील सांगण्यात येत आहे. तर, शाळकरी वयात आपण अण्णा हजारेंच्या नावाची टोपी चढवून सहभागी झाल्याचे देखील त्याच्या मुलाखतीतून समोर आले आहे. आता दिपकेचे आप सोबतचे आधीचे कनेक्शन आणि तरूणाईतील तत्कालीक उद्रेक लक्षात घेऊन त्याने सीजेपीची केलेली स्थापना ही आप पक्षाच्या उदयाची तंतोतंत कॉपी वाटत असले तरी या दोन्ही स्थितींमधील फरक देखील आपण समजून घेतला पाहिजे.
केंद्रातील तत्कालीन युपीए सरकारच्या विरोधातील सर्वसामान्यांच्या उद्रेकाला अण्णा हजारे यांच्या आंदोलनांनी अवघा देश ढवळून काढला होता. सर्वसामान्यांमधील रोषाचा रोख ओळखून केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अण्णा हजारे यांच्या प्रतिमेचा वापर करून याला देशव्यापी स्वरूप दिले, आणि यातूनच आम आदमी पक्षाचा उदय झाला होता. याची तुलना आजच्या सीजेपीशी केली असता, २०११ सारखीच आज अस्वस्थता असली तरी या तरूणांकडे अण्णा हजारे सारख्या प्रतिमेचा चेहरा नाही. तसेच केजरीवाल व कंपनीने आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर तर केलाच, पण याच्या जोडीला स्वयंसेवकांचे जाळे उभारून राजकीय पक्ष उभा केला. आता अभिजीत दिपके याने डिजीटल विश्वात पक्ष उभा केला असला तरी प्रत्यक्षात किती जण त्याच्या सोबत येतील ? याबाबत संभ्रम आहे.
खरं तर, आज ‘कॉकरोच जनता पार्टी’कडे प्रचंड डिजिटल ऊर्जा असून सोशल मीडियावर ते चर्चेत आहेत. त्यांच्यावर मीम्स तयार होत आहेत. व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तरूणाईला ते आपले वाटत आहेत. असंख्य तरूण आपण सीजेपीत सहभागी होत असल्याचे ग्राफीक्स शेअर करत आहेत. पण राजकारण केवळ व्हायरल होण्यावर वा भावनांवर चालत नाही. डिजीटल विश्वातील एखादा ‘ट्रेंड’ काही दिवस टिकतो. पण राजकीय पक्ष उभारून त्याला दशकानुदशके टिकण्यासाठी व्यापक संघटन, कुशल नेतृत्व, धोरण, आर्थिक व्यवस्थापन, स्थानिक कार्यकर्ते, निवडणूक रणनीती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्पष्ट विचारसरणी लागते.
‘आप’ने अण्णांच्या आंदोलनातून पक्ष तयार केला असला तरी त्यांच्याकडे कुशल नेतृत्वाची भली मोठी फळी तयार होती. यात इंटलॅक्चुअल्सचा समावेश होता. तर सीजेपी ही अजूनही डिजीटल विश्वातील भावनांचा उद्रेक यावरच उभी असल्याचे दिसते. आज ते जनतेच्या संतापाला वाट करून देत आहेत. ते लोकांना हसवत आहे, विचार करायला भाग पाडत आहे, अंतर्मुख करत आहेत; पण उद्या जर सीजेपीला खरोखर राजकीय मैदानात उतरून निवडणूक लढवायची असेल, तर त्यांना शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती, अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण यावर ठोस भूमिका घ्यावी लागेल. आणि हेच खरे आव्हान आहे. कारण आम आदमी पक्षाला यश मिळाले पण यासाठी त्यांनी डिजिटल आणि ग्राउंड लेव्हल या दोन्ही पातळ्यांवर काम केले. आज सीजेपीची डिजीटल पायाभरणी झाली असली तरी प्रत्यक्षातील काम बाकी आहे. देशव्यापी अपील असणारा चेहरा, निवडणुका जिंकण्यासाठी लागणारे प्रचंड आर्थिक बळ, बूथ मॅनेजमेंट आणि जातीय व प्रादेशिक समीकरणे हाताळण्याची क्षमता या डिजिटल सैन्याकडे आहे का ? हा मोठा प्रश्न आहे.
गत दशकात भारतीय राजकारणात सोशल मीडियाचा प्रभाव प्रचंड वाढला आहे. आधी राजकारण म्हणजे नेत्यांच्या सभा, पोस्टर्स, रॅली, वर्तमानपत्रे आणि टीव्ही यांच्यातील राजकीय युध्द असे होते. पण आता इन्स्टाग्राम रील, यूट्यूब शॉर्ट्स, ट्विटर ट्रेंड, व्हाटसॲप मॅसेजेस आणि मीम्स हीच नवे राजकीय शस्त्रे बनले आहेत. याच आयुधांचा वापर सीजीपीने अत्यंत प्रभावीपणे केल्याचे कुणाला अमान्य करता येणार नाही. आजचा तरुण दीर्घ भाषणे ऐकत नाही. तो तीस सेकंदांच्या व्हिडिओमध्ये सार शोधतो. तो व्यवस्था आणि प्रस्थापितांच्या विरोधात आहे. त्याला उपरोध समजतो. त्याला मीम्स आवडतात. तो पारंपरिक राजकीय भाषेपेक्षा इंटरनेट संस्कृतीशी अधिक जोडलेला आहे. कॉक्रोच जनता पार्टीने हाच नाडीचा ठाव घेतला आहे.
तथापि, प्रश्न असा आहे की सोशल मीडियावरील लोकप्रियता मतदान केंद्रापर्यंत पोहोचते का ? इतिहास सांगतो की प्रत्येक लोकप्रिय अर्थात व्हायरल घटक निवडणूक जिंकत नाही. अनेक आंदोलनांनी सोशल मीडियावर मोठी हवा निर्माण केली, पण जमिनीवर त्यांना पाठिंबा मिळाला नाही. यामुळे सीजेपीच्या तत्कालीक लोकप्रियतेला एखाद्या मोठ्या राजकीय पक्षाची वा विचारधारेची नांदी ठरवण्याची घाई आपण करता कामा नये. “सोशल मीडियावरील ‘लाईक्स’ आणि ‘फॉलोअर्स’ म्हणजे प्रत्यक्ष ईव्हीएम मशीनमधील मते नव्हेत.” भारतीय राजकारणात इंटरनेटवर क्रांती घडवणे सोपे आहे, पण मतदान केंद्रावर माणसांना आणून बटण दाबायला लावणे अत्यंत कठीण काम आहे.
आज कॉकरोच जनता पार्टीचे प्रत्यक्षातील भवितव्य धुसर असले तरी त्यांनी प्रस्थापित राजकारण्यांना धडकी भरवली हे कुणाला अमान्य करता येणार नाही. सरन्यायाधिशांनी बेरोजगारांबाबत तुच्छतादर्शक काढलेल्या झुरळ या शब्दांला अभिजीत दिपके यांनी प्रतिक बनवून राजकीय पक्ष तयार करण्याची लढविलेली शक्कल ही खरचं दाद देण्यासारखी आहे. बरं, झुरळ हे सर्वव्यापी आहे. म्हणजे ते धनाढ्यांच्या महालांपासून ते रस्त्यावरच्या भणंग माणसांच्या भोवती देखील आढळते. खरं तर, झुरळ हे निरूपद्रवाचे प्रतिक असले तरी दिपके यांनी हेटाळणीयुक्त प्रतिमेला राजकीय आयकॉन बनविण्याची हुशारी केल्याची बाब लक्षणीय आहे.
याहून महत्वाची बाब म्हणजे झुरळ हे अतिशय चिवट आणि अगदी अणूयुद्द झाले तरी वाचू शकेल असे मानले जाते. त्यांच्या याच विजिगुषी वृत्तीला अभिजीत दिपके यांनी देशभरातील तरूणाईच्या संतापाचे प्रतीक बनविले आहे. एका अर्थाने ही देशातील संतापाची ‘डिजीटल ठिणगी’ होय, यातून वणवा पेटणार की ती काही दिवसात विरून जाणार ? हे कुणालाही सांगता येणार नाही. तथापि, जगावेगळे असेही काही होऊ शकते हे सीजेपीने दाखवून दिले आहे.
थोडं विनोदी पध्दतीत सांगावयाचे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचा सल्ला दिला आहे. अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्याचे तंतोतंत पालन करत ‘पॉलिटिक्स फ्रॉम होम’चा नवीन पॅटर्न यशस्वीपणे राबविला आहे. भारतासारख्या खंडप्राय आणि अनेक विरोधाभासांनी भरलेल्या देशात क्रांतीचा एकच विचार सत्तापालट करू शकेल, वा प्रस्थापितांना पर्याय होईल अशी आशा बाळगणे व्यर्थ होय. तथापि, सर्वव्यापी डिजीटल माध्यमाचा समर्पक उपयोग करत कुणी त्याच्या दिशेने एक पाऊल तरी टाकू शकते हे कॉकरोच जनता पार्टीने दाखवून दिले आहे. याचा विचार करता, आगामा काळातील राजकीय दिशादर्शक म्हणून सीजेपीकडे आपल्याला पाहता येईल. सोशल मीडिया आता दुधारी तलवार बनलाय, कुणी कितीही मार्केटींग करो, लोक संतापतात तेव्हा काहीही म्हणजे अगदी झुरळाला देखील आदर्श मानतात ! हे यातून नक्कीच अधोरेखीत झाले आहे.
कॉकरोच जनता पार्टीने प्रस्थापित राजकारणाचे सौंदर्यशास्त्र देखील बदलून टाकले आहे. पॉलिटीकल कँपेनींगमध्ये चकचकीतपणासह सर्वसामान्यांना आकर्षीत करणारे, भावनांना हात घालणारे कंटेंट वापरण्यात येते. तर सीजेपीने मात्र पराभूत मनोवृत्तीच्या ‘जेन-झी’ला नवीन भाषा दिली आहे. यात बेरोजगारी, आळस आणि सोशल मीडियात पडीक राहण्याचा गौरव करण्यात आलाय. त्यांच्या मीम्समध्ये रोजगार नसल्याची व्यथा-वेदना असली तरी यावर मनमुरादपणे हसण्याचा दिलखुलासपणा देखील आहे. तरूणाईचे हे नवीन सौंदर्यशास्त्र देशातील सत्ताधारी आणि तमाम विरोधी पक्षांना धडकी भरवणारे आहे. अगदी नाना पाटेकर यांचा आयकॉनीक डायलॉग थोडा बदलून आपण म्हणू शकतो की-
साला एक कॉकरोच…पुरी पॉलिटीकल सिस्टीम को हँग कर देता है !
कॉकरोच जनता पार्टीला जगासमोर आणणाऱ्या अभिजीत दिपकेच्या कल्पकतेला सर्वांनी नक्की दाद द्यावी. मला त्याचे कौतुक जास्त असे की, तो पत्रकार तर आहेच, पण त्याने माझा व्यवसाय असणाऱ्या डिजीटल माध्यमालाच राजकीय आयुध बनविले आहे. याहून महत्वाचे म्हणजे तो माय मराठीचा सुपुत्र आहे. कुणालाही अशक्यप्राय असणारी बाब त्याने करून दाखवलीय. दिग्गज कवि दुष्यंत कुमार यांच्याच शब्दात सांगावयाचे तर-
कौन कहता है, आसमान मे सुराख नही हो सकता ?
जरा इक पत्थर तो तबियतसे उछालो यारो !
कॉकरोच जनता पार्टी म्हणजे अभिजीत दिपकेने अथांग अवकाशात भिरकावलेला दगड होय. त्याची अंतीम नियती सर्वांना ज्ञात आहे, पण त्याने जे धाडस दाखविले त्याची दखल इतिहासाला नक्की घ्यावी लागणार आहे.
सर्वात शेवटी, पुन्हा एकदा दुष्यंतजी यांच्याच अजरामर काव्यपंक्ती !
सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,
सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।
मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही,
हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए।।
अशाच प्रकारे आगीने पेटलेल्या लक्षावधी हृदयांचे डिजीटल नेटवर्क म्हणजेच कॉकरोच जनता पार्टी नव्हे काय ?
मी योगेंद्र यादव यांचे या विषयावरील अभिप्राय
‘कॉकरोच जनता पार्टी का अकाउंट बैन करके सरकार ने पंगा ले लिया है’: योगेंद्र यादव – BBC News हिंदी https://www.bbc.com/hindi/articles/c3r21g2wgvyo
वाचन होताच आपला लेख वाचला तेव्हा वैचारिक जुगलबंदीची अनुभूती आली. मला आपले तथ्यात्मक विश्लेषण भावले.
मी योगेंद्र यादव यांचे या विषयावरील अभिप्राय
‘कॉकरोच जनता पार्टी का अकाउंट बैन करके सरकार ने पंगा ले लिया है’: योगेंद्र यादव – BBC News हिंदी https://www.bbc.com/hindi/articles/c3r21g2wgvyo
वाचन होताच आपला लेख वाचला तेव्हा वैचारिक जुगलबंदीची अनुभूती आली. मला आपले तथ्यात्मक विश्लेषण भावले.