अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आणि त्यातही विशेष करून कृत्रीम बुध्दीमत्तेमुळे ‘डोळ्यांनी पाहिलं म्हणजे खरं’ आणि ‘कानांनी ऐकलं म्हणजे खरं’ हा आजवर चालत आलेला नियम संपत चाललेला आहे. एआय इतक्या वेगाने वास्तवाची नक्कल करू लागला आहे की खरे आणि कृत्रिम यांच्यातील सीमारेषाच धूसर होत आहे. आता प्रश्न फक्त एआय काय तयार करू शकतो हा राहिलेला नाही; प्रश्न आहे, त्याने तयार केलेले आपण ओळखणार कसे ? हा आहे. आणि नेमक्या याच क्षणी गुगलने एक मोठे पाऊल टाकत ‘सिंथआयडी डिटेक्टर’ सर्वांसाठी खुले केले आहे. यामुळे गुगलचे हे टुल सत्यशोधनासाठी महत्वाचे आयुध सिध्द होऊ शकते.
शेखर पाटील
सध्या एआय निर्मीत कंटेंटचा सोशल मीडियात अक्षरश: उत आला आहे. एखादा फोटो आपल्या मोबाईलवर येतो. तो इतका वास्तवदर्शी असतो की त्यातील व्यक्ती, जागा आणि घटना खरीच वाटते. एखाद्या नेत्याचा आवाज असलेली ध्वनिफीत काही क्षणांत समाजमाध्यमांवर फिरू लागते. एखादा वलयांकीत व्यक्ती कधीही न केलेल्या उत्पादनाची जाहिरात करताना दिसतो. युद्ध सुरू झाल्याचा, दंगल उसळल्याचा किंवा एखाद्या मोठ्या नेत्याने धक्कादायक घोषणा केल्याचा व्हिडिओ अचानक व्हायरल होतो. मग केव्हा तरी ते फेक असल्याचे समजते. मात्र तोवर तो व्हिडीओ आगीसारखा पसरलेला असतो. यामुळे एकूणच सत्य आणि असत्यातील सीमारेषा ही धुसर झाल्याचे दिसून येत आहे.

जनरेटिव्ह एआयच्या झपाट्याने झालेल्या प्रगतीमुळे इंटरनेटसमोरील हा प्रश्न आता केवळ तंत्रज्ञानाचा राहिलेला नाही. तो प्रत्येकासाठी महत्वाचा बनलेला आहे. याच पार्श्वभूमीवर गुगलने ७ ऑक्टोबर २०२६ रोजी आपल्या ‘सिंथआयडी डिटेक्टर’ हे टुल जगभरातील सर्व वापरकर्त्यांसाठी खुले करण्याची केलेली घोषणा लक्षणीय आहे. सध्या याच्या मदतीने प्रतिमा, व्हिडिओ किंवा ध्वनीफीत अपलोड करून त्यात सिंथआयडीचा वॉटरमार्क ( अदृश्य चिन्ह ) आहे की नाही, याची तपासणी कुणालाही शक्य होणार आहे.
आता या टुलची माहिती जाणून घेण्याआधी सिंथआयडी हा प्रकार नेमका आहे तरी काय ? हे जाणून घेऊया. तर कोणतीही सामग्री म्हणजे प्रतिमा, शब्द, ध्वनी अथवा व्हिडीओ हे मानव निर्मित आहे की कृत्रीम ? हे जाणून घेण्यासाठीचा हा एक अदृश्य संकेत ( सिग्नल ) आहे. गुगलच्या डीपमाइंड लॅबने याला २०२३ मध्ये पहिल्यांदा सादर केले होते. साध्या भाषेत सांगायचे तर, कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेल्या कंटेंटमध्ये मानवी डोळ्यांना किंवा कानांना न जाणवणारा डिजिटल संकेत समाविष्ट करण्याची ही पद्धत आहे.
प्रतिमेच्या कोपऱ्यात दिसणारा लोगो किंवा वॉटरमार्क ( जसा गुगल जेमीनीवरून इमेज तयार केल्यावर खालील कोपऱ्यात दिसतो ! ) यापेक्षा ही पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. सिंथआयडीचे चिन्ह आशयाच्या संरचनेतच मिसळलेले असते. ते वरून दिसत नसले तरी अदृश्य स्वरूपात अस्तित्वात असते. प्रतिमा, व्हिडीओ आणि ध्वनी या तिन्हींमध्ये अशा प्रकारे कोड टाकला जातो. प्रतिमा क्रॉप केली, तिच्यावर फिल्टर लावला, रंग किंवा उजेड बदलला, ती संकुचित स्वरूपात पुन्हा सेव्ह केली किंवा व्हिडिओच्या फ्रेम दरात बदल झाला तरी हे चिन्ह टिकविण्याच्या दृष्टीने सिंथआयडी विकसित करण्यात आले आहे. ध्वनीमध्येही हा संकेत मानवी कानाला ऐकू येत नाही आणि काही सामान्य बदलांनंतरही शोधता यावा, अशी त्याची रचना आहे.
गुगलने सुरुवातीला प्रतिमांपासून या तंत्रज्ञानाची सुरुवात केली होती. नंतर त्याचा विस्तार व्हिडिओ, ध्वनी आणि मजकुरापर्यंत करण्यात आला. जेमिनाय, इमेजेन, व्हिओ आणि लिरिया यांसारख्या गुगलच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर होत गेला. यानंतर गुगलने त्याचे दरवाजे सर्वांसाठी उघडले आहेत. म्हणजेच तुम्हा-आम्हा सर्वांना हे टुल वापरता येणार आहे. आपण ( https://synthid.com ) या लिंकवर क्लिक करून याचा वापर करू शकतात. यावरून आपल्याला फेक प्रतिमा, व्हिडीओ आणि ध्वनीची सत्यता क्षणार्धात समजणार आहे.
या घडामोडीतील सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे सिंथआयडी आता केवळ गुगलपुरता मर्यादित राहिलेला नाही. गुगलच्या नव्या घोषणेनुसार ओपनएआय, एनव्हिडिया आणि काकाओ या कंपन्यांच्या समर्थित कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींनी तयार केलेला आशयही नव्या डिटेक्टरद्वारे तपासता येतो आणि ॲपलचा समावेशही लवकरच होणार आहे. तर ओपनएआय कंपनीने आधीच आपल्या चॅटजीपीटीसह अन्य सेवांमध्ये सिंथआयडीचा वापर करण्याचा करार केलेला आहे. म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता कंपन्यांमध्ये ‘आपल्या आशयाची ओळख पटू शकेल अशी खूण त्यातच ठेवणे’ ही एक नवीन प्रणाली आकारास येतांना दिसत आहे.
भारतासाठी तर या तंत्रज्ञानाचे महत्त्व आणखी मोठे आहे. भारतात व्हॉट्सॲप, यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम आदींच्या माध्यमातून माहितीचा प्रसार प्रचंड वेगाने होतो. यात एआय रील्सचे प्रमाण लक्षणीय असेच आहे. खरं तर, एखादा बनावट व्हिडिओ राजकीय तणाव निर्माण करू शकतो; नेत्याच्या कृत्रिम आवाजातील ध्वनिफीत निवडणुकीच्या काळात संभ्रम निर्माण करू शकते; प्रसिद्ध व्यक्तीचा डीपफेक वापरून आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते; तर एखादा बनावट शासकीय आदेश काही तासांत लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. अशा परिस्थितीत सामान्य युजरसाठी ‘हे कुठून आले?’ हा प्रश्न विचारण्यासाठी तांत्रिक साधन उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. म्हणून सिंथआयडी उपयुक्त ठरणारे आहे.
याचा पत्रकारितेवर देखील मोठा परिणाम होणार आहे. या टुलचा वापर करून कोणते कंटेंट हे कृत्रीम आहे हे अगदी सहजगत्या समजणार आहे. परिणामी, भविष्यात वृत्तसंस्थांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आशयाची तपासणी ही स्वतंत्र संपादकीय प्रक्रिया म्हणून रूढ झाली तर आश्चर्य वाटायला नको. लवकरच इंटरनेटवरील प्रत्येक कंटेंटमागे एक प्रकारचा ही ‘डिजिटल जन्मदाखला’ राहणार आहे. हे टुल सत्यशोधनासाठी महत्वाचे ठरणार आहे.
मात्र या तंत्रज्ञानाच्या ताकदीइतक्याच त्याच्या मर्यादाही समजून घेणे आवश्यक आहे. सिंथआयडीला ‘सर्व प्रकारचे कृत्रिम बुद्धिमत्ता कंटेंट ओळखणारा डिटेक्टर’ समजणे चुकीचे ठरेल. कारण जगातील प्रत्येक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली सिंथआयडी वापरत नाही. काही कंटेंट दुसऱ्या वॉटरमार्क पद्धतीने तयार झालेला असू शकतो; काहींमध्ये कोणताही वॉटरमार्क नसेल; तर अत्यंत मोठ्या प्रमाणावरील बदलांमुळे मूळ संकेताची शोधक्षमता कमी होऊ शकते. अगदी गुगल डीपमाइंडनेही सिंथआयडी हा कृत्रिम बुद्धिमत्ता आशय ओळखण्याचा ‘सर्व समस्यांवरील रामबाण उपाय’ नसल्याचे स्पष्ट केले आहे. तो अधिक व्यापक पडताळणी व्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. याचा अर्थ असा की वॉटरमार्किंग तंत्रज्ञान आणि ते टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रांचा पाठशिवणीचा खेळ यापुढेही सुरू राहणार आहे.
गुगलने सिंथआयडी डिटेक्टर सर्वांसाठी खुला करून या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. हे साधन बनावट आशयाच्या समस्येचे अंतिम उत्तर नाही आणि तसा दावा करणेही योग्य ठरणार नाही. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की, एआय विकसित होण्याच्या पहिल्या टप्प्यात जगाची स्पर्धा ‘सर्वांत वास्तवदर्शी कृत्रिम आशय कोण तयार करणार?’ यासाठी होती. आता त्याचबरोबर दुसरी शर्यत सुरू झाली आहे ती म्हणजे ‘तो आशय कृत्रिम आहे हे सर्वांत विश्वासार्हपणे कोण सिद्ध करणार?’ कदाचित पुढील काही वर्षांत ही दुसरी शर्यत पहिल्यापेक्षाही अधिक महत्त्वाची ठरेल. कारण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात सर्वांत दुर्मिळ गोष्ट माहिती राहणार नाही; सर्वांत दुर्मिळ गोष्ट असेल—विश्वास ! आणि याचसाठी सिंथआयडीच्या माध्यमातून गुगलने टाकलेले महत्वाचे पाऊल मानावे लागणार आहे.