दुष्यंतची कविता अन्‌ तरुणाईचा आक्रोश : बदलाची एकच भाषा, एकच भावना !

नुकत्याच दिल्ली येथील झालेल्या जेन-झी आंदोलनाची वैशिष्ट्ये म्हणजे यात तरूणाईच्या हातातील स्मार्टफोनला नव्या दृश्यभाषेची मिळालेली जोड होय. तरूण पिढीच्या नव्या शब्दावलीने अनेकांना धक्का बसला. मात्र याच पिढीच्या तोंडून ज्यांच्या अजरामर काव्यपंक्ती वारंवार उद्‌धृत करण्यात आल्या ते शायर म्हणजे दुष्यंत कुमार ! आज याच महान कविची जयंती. अवघ्या ४२ वर्षांचे अल्प आयुष्य लाभलेल्या शायराने आपल्या मागे ठेवलेला शब्दांचा वारसा इतका जिवंत व रसरशीत आहे की, पन्नास वर्षांनंतरही — गल्लीबोळांपासून ते जंतर-मंतरवरील आंदोलनापर्यंत — तरुण पिढी त्याच अस्वस्थतेने त्यांचे शब्द आपले मानते हा योगायोग नाही ! हे दुष्यंत कुमार यांच्या काव्याचं खरं सामर्थ्य आणि त्यांची महत्ता होय.

शेखर पाटील

दुष्यंत कुमार त्यागी म्हणजे केवळ गझल नव्हे. कथा, कादंबऱ्या, नाटक असा त्यांचा विस्तृत साहित्यप्रवास आहे. तरीही भारतीय जनमानसाच्या स्मृतीत दुष्यंत हे मुख्यतः गझलकार म्हणून जिवंत आहेत. १९७५मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘साये में धूप’ या काव्यसंग्रहाने हिंदी गझलेला केवळ नवी लोकप्रियता दिली नाही, तर गझलेच्या सामाजिक भूमिकेलाच एक नवे परिमाण दिले. अवघ्या बावन्न गझलांचे हे छोटंसं पुस्तक इतकं प्रभावी ठरलं की त्याला ‘युवा मनाची गीता’ असं म्हटलं गेलं, आणि प्रकाशनानंतरच्या काही वर्षातच त्याच्या डझनावारी आवृत्त्या निघाल्या. या संग्रहातील अनेक शेर आजही सामान्य सर्वसामान्यांच्या बोलण्यात म्हणी आणि वाक्प्रचारांसारखे रुळलेले आढळतात जे कोणत्याही कवीसाठी दुर्मीळ भाग्य आहे. त्या काळापर्यंत हिंदी ग़ज़ल ही प्रामुख्याने शृंगार, प्रेम आणि विरहाभोवती फिरणारी मानली जात असे. दुष्यंत कुमार यांनी हे समीकरण पूर्णपणे बदलून टाकत गझलेला भूक, गरिबी, राजकीय अपयश आणि सामान्य माणसाच्या रोजच्या संघर्षाची भाषा बनवलं. दुष्यंत कुमारांनी गझल राजवाड्यातून रस्त्यावर आणली, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

https://shekharpatil.in

दुष्यंत कुमारांना समजून घेण्यासाठी तत्कालीन भारत समजून घ्यावा लागतो. सत्तरचे दशक भारतीय लोकशाहीतील खोल अस्वस्थतेचे दशक होते. स्वातंत्र्याला दोन-अडीच दशके झाली होती. स्वातंत्र्यलढ्याने दाखविलेल्या आशा अजून स्मृतीत होत्या, पण सामान्य माणसाच्या दैनंदिन जगण्यात त्या आशांचे प्रतिबिंब पुरेसे दिसत नव्हते. वाढती महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, प्रशासकीय अनास्था आणि राजकीय व्यवस्थेबद्दल वाढणारा अविश्वास यामुळे विशेषतः तरुणाई बेचैन होत होती. यातच, गुजरातमधील विद्यार्थ्यांच्या असंतोषातून उभे राहिलेले नवनिर्माण आंदोलन, बिहारमधील विद्यार्थी चळवळ, जयप्रकाश नारायण यांनी दिलेली ‘संपूर्ण क्रांती’ची हाक, देशव्यापी रेल्वे संप आणि त्यानंतर अधिकाधिक तापत गेलेले राजकीय वातावरण…या साऱ्यांचा कळस जून १९७५ मध्ये घोषित झालेल्या आणीबाणीत झाला. दुष्यंत कुमारांची कविता याच वातावरणात आकार घेत होती आणि साये में धूप याच ऐतिहासिक वळणावर वाचकांसमोर आला अन्‌ क्रांतीचे प्रतीक बनला ! सेन्सॉरशिपच्या छायेतही, प्रतीकांच्या आणि रूपकांच्या आडून त्यांनी सत्तेला थेट प्रश्न विचारले. त्यांची भाषा साधी, बोलीभाषेच्या जवळची होती — त्यामुळे ती महाविद्यालयीन कट्ट्यांपासून ते कामगार वस्त्यांपर्यंत सहज पोहोचली.

एक गुड़िया की कई कठपुतलियों में जान है ।

आज शायर यह तमाशा देखकर हैरान है॥

या काव्यपंक्ती तेव्हा सर्वशक्तीमान असणाऱ्या इंदिरा गांधी यांना उद्देशून लिहण्याचे धाडस दुष्यंत कुमार यांच्यात होते. तर-

मुझमें रहते हैं करोड़ों लोग चुप कैसे रहूँ ।

हर ग़ज़ल अब सल्तनत के नाम एक बयान है ॥

या पंक्ती गझलला प्रतिकाराचे आयुध बनविण्याचा शंखनाद होय. आणि हेच काम त्यांनी आपल्या काव्यातून सातत्याने केले.

आज अर्धशतकानंतर पिढी बदलली आहे, शब्द बदलले आहेत; पण आश्वासन आणि अनुभव यांच्यातील दरी अजूनही प्रश्न निर्माण करते. म्हणूनच दुष्यंत कुमार सत्तरच्या दशकातील तरुणालाही आपले वाटले आणि आजच्या जेन-झी लाही आपले वाटतात. त्यांच्या क्रांतिकारी काव्यदृष्टीची सर्वांत प्रसिद्ध अभिव्यक्ती बहुधा या ओळींमध्ये आढळते—

हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए,
इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए।

सिर्फ़ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,
मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।

दुष्यंत कुमारांच्या संपूर्ण सामाजिक विचारांचा सार म्हणजे या ओळी आहेत. ‘पीर’ म्हणजे पीडा अर्थात दु:ख जेव्हा पर्वताएवढे होते तेव्हा ते वितळून त्यातून जणू काही हिमालयातून गंगा निघावी. म्हणजेच, साचलेल्या वेदनेतून क्रांती जन्माला यावी अशी इच्छा ते व्यक्त करतात. येथे दुष्यंतचा विद्रोह विध्वंसवादी नाही; तो सर्जनशील आहे. जुनी व्यवस्था नष्ट व्हावी म्हणून मोडायची नाही, तर तिच्या जागी जीवनदायी प्रवाह निर्माण झाला पाहिजे. अन्यायाविरुद्ध संताप असावा; पण त्यातून चांगल्या समाजाची निर्मिती व्हावी असे कविला अपेक्षित आहे.

तसेच, आंदोलन म्हणजे केवळ भावनांचा उद्रेक वा आक्रस्तळेपणा नव्हे. आपल्या हक्कांसाठी घोषणा देणे, रस्ते भरून काढणे, सरकारला धारेवर धरणे, भाषणे करणे—हे आवश्यक असू शकते; पण ते अंतिम उद्दिष्ट नाही. आंदोलनाचा खरा प्रश्न आहे—परिस्थिती बदलली का ? ज्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तो कमी झाला का ? ज्या धोरणावर प्रश्न विचारला त्यात सुधारणा झाली का? सामान्य माणसाच्या जीवनात प्रत्यक्ष फरक पडला का ? असे अस्वस्थ करणारे प्रश्न देखील दुष्यंत कुमार विचारतात.

आजच्या जेन-झीच्या आंदोलनांच्या संदर्भात या ओळींचे महत्त्व अनेक पटींनी वाढते. आजच्या डिजीटल युगात इतिहासात प्रथमच ‘हंगामा’ निर्माण करण्याची क्षमता अभूतपूर्व प्रमाणात वाढली आहे. पूर्वी एखाद्या विषयाला राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी मोठी संघटनात्मक यंत्रणा, वृत्तपत्रांचे सुनियोजीत प्रचारतंत्र किंवा दीर्घकाळ चालणारी चळवळ आवश्यक असे. आज एका स्मार्टफोनवरील व्हिडिओमुळे काही तासांत लाखो लोक एखाद्या प्रश्नाशी जोडले जाऊ शकतात. कोणताही हॅशटॅग ट्रेंडींगला येऊ शकतो. एखाद्या विद्यार्थ्याची छोटीशी पोस्ट राष्ट्रीय माध्यमांना विषय हाताळण्यास भाग पाडू शकते.

पण दुष्यंत कुमार जणू आजच्या तरुणाच्या खांद्यावर हात ठेवून विचारतात—”व्हायरल झालात, पुढे काय ?”

एक दिवस ट्रेंड लोकप्रिय झाला पण प्रश्न सुटला का ?

याच अर्थाने दुष्यंत हे केवळ आंदोलनाचे कवी नाहीत; ते आंदोलनाच्या आत्मपरीक्षणाचेही कवी आहेत.

त्याच गझलेतील आणखी दोन ओळी तरुणाईला पिढ्यान्‌पिढ्या प्रेरित करत आल्या आहेत—

मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही,
हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए।

येथील ‘आग’ म्हणजे हिंसा नव्हे. ती अस्वस्थता आहे. अन्याय सामान्य मानण्यास नकार देण्याची वृत्ती आहे. समाजात कुणाच्या तरी मनात प्रश्न जिवंत राहिले पाहिजेत, कुणाला तरी अपमान असह्य वाटला पाहिजे, कुणीतरी ‘हे असेच चालणार’ या वाक्याला नकार दिला पाहिजे—ही दुष्यंतजींची अपेक्षा आहे.

यातील सर्वांत विलक्षण बाब ही आहे की दुष्यंत कुमारांचे निधन १९७५मध्ये झाले आणि आज त्यांच्या ओळी उद्धृत करणाऱ्या अनेक तरुणांच्या आई-वडिलांचाही जन्म कदाचित त्यानंतर झाला असेल. तरी पन्नास वर्षांपूर्वीचा कवी आजच्या मुलाला स्वतःच्या मनाचा अधिक जवळचा वाटतो. यालाच साहित्याचे कालातीतपण म्हणावे लागेल.

दुष्यंत कुमारांची आणखी एक प्रसिद्ध ओळ आजच्या नव्या पिढीच्या मानसशास्त्राशी विलक्षण जुळते—

कौन कहता है आसमान में सूराख़ नहीं हो सकता,
जरा एक पत्थर तो तबीअत से उछालो यारो।

समोरची व्यवस्था इतकी मोठी आहे की तिच्यासमोर आपले काहीही चालणार नाही, ही भावना कोणत्याही परिवर्तनाची सर्वांत मोठी शत्रू असते. दुष्यंत या मानसिक पराभवाला नाकारतात. आकाश असीम असले म्हणून प्रयत्नच करायचा नाही, हे त्यांना मान्य नाही. एक प्रयत्न करून तर पाहा; अशक्यतेला आव्हान द्या, असे ते सांगतात. यामुळे येथे पत्थर’ येथे हिंसेचे आवाहन नव्हे तर प्रयत्नाचे रूपक आहे.

दुष्यंतच्या काव्यातील आणखी एक विलक्षण गुण म्हणजे ते घटना पकडण्याऐवजी व्यवस्थेचे स्वरूप पकडतात. म्हणून घटना वा संदर्भ बदलल्यानंतरही कविता कालबाह्य होत नाही.

यहाँ तक आते-आते सूख जाती हैं कई नदियाँ,
मुझे मालूम है पानी कहाँ ठहरा हुआ होगा।

या ओळींचा सरळ अर्थ नदीचा असला तरी त्यातील राजकीय आणि प्रशासकीय अर्थ खोल आहे. एखादी योजना राजधानीतून उत्साहाने निघते; पण शेवटच्या गावातील माणसापर्यंत पोहोचेपर्यंत तिचे पाणी कुठे सुकते वा मुरते ? निधी मंजूर होतो; पण प्रत्यक्ष रस्त्याचा दर्जा खराब का? शाळेसाठी अनुदान असते; पण वर्गात मूलभूत सुविधा का नसतात ? शिष्यवृत्तीची तरतूद असते; पण विद्यार्थ्याच्या खात्यात पैसा वेळेवर का पोहोचत नाही? सरकारी योजनेची घोषणा भव्य व हेतू उदात्त असतो; पण ती खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहचतच नाही.

दुष्यंत कुमारांनी पन्नास वर्षांपूर्वी विचारलेला ‘पाणी कुठे अडते ?’ हा प्रश्न प्रशासनाविषयीच्या आधुनिक चर्चेत आजही तेवढाच जिवंत आहे. यामुळे त्यांची कविता कोणत्याही एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणाशी मर्यादित राहत नाही. ती प्रत्येक अशा व्यवस्थेला लागू होते जिथे घोषणेपासून अंमलबजावणीपर्यंतच्या प्रवासात काहीतरी हरवते. दुष्यंतच्या कवितेतील सामान्य माणूस मात्र केवळ पीडित नाही. तो संघर्षरत असतला तरी त्याच्यात आत्मसन्मान आहे. तो जीवनाच्या ओझ्याने वाकलेला असू शकतो; परंतु त्याने शरणागती पत्करली असे समजू नका, असे दुष्यंत ठामपणे सांगतात—

ये सारा जिस्म झुक कर बोझ से दोहरा हुआ होगा,
मैं सज्दे में नहीं था आप को धोखा हुआ होगा।

किती विलक्षण आत्मसन्मान आहे या दोन ओळींमध्ये ! माझे शरीर वाकले आहे, कारण माझ्यावर जगण्याचे ओझे आहे; पण, मी तुमच्यासमोर नतमस्तक झालेलो नाही. आजचा बेरोजगार तरुण, वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी, कॉन्ट्रॅक्ट जॉबवर असलेला युवक, गिग इकॉनॉमीमध्ये धावणारा डिलीव्हर वर्कर, कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण करणारा विद्यार्थी—या प्रत्येकाला या ओळीत स्वतःचे प्रतिबिंब दिसू शकते. दुष्यंत सामान्य माणसाला दयेचा विषय बनवत नाहीत. ते त्याला प्रतिष्ठा देतात. ही त्यांच्या कवितेची फार मोठी सर्जनशील ताकद आहे.

खरं तर गेल्या पन्नास वर्षात जग किती तरी बदलले ! तरी एक गोष्ट बदललेली नाही—ती म्हणजे तरुणाईला ऐकले जात नसल्याची भावना. गुजरातच्या नवनिर्माण आंदोलनापासून बिहारच्या विद्यार्थी चळवळीपर्यंत सत्तरच्या दशकातील तरुण व्यवस्थेला सांगत होता की आम्हाला फक्त आश्वासने नकोत. आजची जेन-झी सुद्धा अनेक प्रश्नांवर त्याच स्वरात उत्तरदायित्व मागते. त्यांना शिक्षणव्यवस्थेत पारदर्शकता हवी, परीक्षा विश्वासार्ह हव्यात, रोजगाराच्या संधी हव्यात, सार्वजनिक संस्था जबाबदार हव्यात आणि नागरिकाच्या प्रश्नाला उत्तर मिळाले पाहिजे. याच ठिकाणी दुष्यंत कुमार दोन पिढ्यांमधील अदृश्य पूल बनतात.

दुष्यंत कुमार यांनी ‘जेन-झी संज्ञा’ ऐकलेली नव्हती. त्यांनी स्मार्टफोन पाहिलेला नव्हता. त्यांना अल्गोरिदम वा व्हायरल कंटेंटची कल्पना नव्हती. तरी त्यांच्या गझलेतील प्रत्येक शेर स्वतंत्र अर्थपूर्ण एकक असल्याने तो आजच्या डिजिटल अभिव्यक्तीत सहज रूपांतरित होतो. एका फलकावर बसतो, ट्विट मध्ये मावतो, इन्स्टाग्राम कॅप्शनमध्ये ताकदीने उभा राहतो आणि रीलच्या काही सेकंदांच्या ऑडिओ मध्येही विलक्षण प्रभाव निर्माण करतो. याचमुळे दुष्यंत अनवधानाने सोशल-मीडिया युगाचेही कवी ठरतात. म्हणूनच त्यांच्या काव्यपंक्ती आजही सोशल मीडियात विलक्षण परिणामकारक पध्दतीत वापरल्या जातात.

मात्र दुष्यंतजी यांचे कालातीतपण केवळ या ‘कोटेबिलीटी’ मध्ये नाही. त्यांच्या कवितेत एक सखोल लोकशाहीवादी नैतिकता आहे. ते कोणत्याही एका पक्ष वा विचारधारेचे कवी नाहीत. म्हणूनच त्यांच्या ओळी सत्तेबाहेर असताना एक पक्ष उद्धृत करतो आणि काही वर्षांनी तोच पक्ष सत्तेत गेल्यावर त्याच्यावर टीका करण्यासाठी दुसरा पक्ष तीच ओळ वापरतो. यामुळे दुष्यंतची कविता कोणाच्याही कायम मालकीची होत नसून हेच खऱ्या कवीचे स्वातंत्र्य असते. हे सौभाग्य दुष्यंतजींना लाभले. याचमुळे अनेकदा परस्परविरोधी विचारधारांचे आंदोलक त्यांच्या काव्यपंक्ती वापरत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

कविता जर एखाद्या पक्षाची वा विचारधारेची प्रचारपत्रिका झाली, तर तिचे आयुष्य पुढच्या निवडणुकीपर्यंत असते. पण कविता जर सत्ता आणि नागरिक यांच्यातील नैतिक संबंधांवर बोलत असेल, तर सत्ता कोणाचीही असो ती लागू राहते. दुष्यंत कुमारांचे काव्य याच कारणाने डाव्या वा उजव्या राजकीय चौकटींपेक्षा मोठे ठरते. त्यांची निष्ठा सामान्य माणसाशी आहे. सत्ता कोण चालवतो, यापेक्षा सत्ता कशी चालविली जाते, हा त्यांचा प्रश्न आहे. आणि याचेच उत्तर त्यांची कविता मागते.

आजच्या तरूणाईसाठी दुष्यंत आणखी एका कारणामुळे जवळचे आहेत. या पिढीला पॉलीश्ड व प्रचारकी भाषेची चीड आहे. त्यांना प्रचारकीपणा व कृत्रीमता हे सर्व काही तात्काळ ओळखता येते. दुष्यंत यांचे काव्य याच्या नेमका उलट आहे. त्यात आक्रोश आहे. उपरोध आहे. राग आहे. वेदना आहे. कधी असहायता आहे; पण तरीही हार नाही. ते तरुणाईला उपदेश करत नाहीत. ते त्याच्याबरोबर प्रश्न विचारतात. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.

दुष्यंत यांचे काव्य वाचताना असे वाटत नाही की एखादा ज्येष्ठ कवी तरुणांना काय करावे याचे धडे देतो आहे. उलट असे वाटते की तो स्वतः गर्दीत उभा आहे. त्याच्याही मनात तेच प्रश्न आहेत. तोही व्यवस्थेच्या उत्तराची वाट पाहत आहे. फरक एवढाच की त्या गर्दीतील इतर लोकांच्या अस्पष्ट संतापाला त्याच्याकडे असामान्य शब्दसामर्थ्य मिळाले आहे. म्हणून दुष्यंत कुमारांचे क्रांतिकारी काव्य कालातीत आहे. त्यातील क्रांती एखाद्या विशिष्ट वर्षातील वा कालखंडातील क्रांती नाही; ती माणसाच्या मनातील अन्यायाविरुद्धची चिरंतन अस्वस्थता आहे. एका कवीचे विद्रोह, व्यंग व आक्रोश पन्नास वर्षांनंतरही तेवढेच समकालीन वाटणे ही त्या कवीच्या प्रतिभेची विजयगाथा निश्चितच आहे; पण त्यात समाजासाठी थोडी शोकांतिकाही दडलेली आहे. कारण वर्षे उलटली तरी सर्वसामान्यांना छळणारे प्रश्न तेच कायम आहेत.

दुष्यंतजींच्या मृत्यूनंतरच्या पन्नास वर्षांत भारताने विविध विचारांची असंख्य सरकारे पाहिली. आर्थिक धोरणे बदलली, तंत्रज्ञान बदलले, माध्यमे बदलली, सामाजिक रचना बदलली. तरी सत्ता आणि नागरिक यांच्यातील काही मूलभूत ताण टिकून राहिले. म्हणून दुष्यंत कुमार यांचे काव्य टिकले. कदाचित त्यांनी भविष्य लिहिले नव्हते; त्यांनी मानवी स्वभाव वाचला होता. त्यांना माहीत होते की प्रत्येक सत्ता स्वतःभोवती सुख, समृध्दी व समाधानाची कथा ( नरेटीव्ह ) निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि प्रत्येक नवी पिढी त्या कथेला आपल्या अनुभवाच्या कसोटीवर तपासते. प्रत्येक व्यवस्था सांगते की मोठा बदल झाला आहे; पण प्रत्येक नव्या तरुणाला प्रश्न पडतो—”माझ्या आयुष्यात तो बदल कुठे आहे ?” दुष्यंत आपल्या काव्यातून त्या प्रश्नाच्या बाजूने उभे ठाकतात.

आणि म्हणूनच दुष्यंत कुमार सत्तरच्या दशकाचे कवी असूनही फक्त त्या दशकाचे राहत नाहीत. ते १९७४च्या अस्वस्थ विद्यार्थ्याचेही कवी आहेत आणि २०२६च्या स्मार्टफोन हातात घेऊन रस्त्यावर उतरलेल्या जीन-झी तरुणाचेही. उद्या कोणती नवी पिढी येईल, तिच्या हातात कोणते तंत्रज्ञान असेल, तिच्या प्रश्नांचे स्वरूप काय असेल हे आपल्याला ठाऊक नाही. पण जोपर्यंत कुणाला तरी अन्याय अस्वस्थ करेल, कुणीतरी व्यवस्थेला प्रश्न विचारेल, कुणीतरी निराशेला नकार देईल आणि कुणाच्या तरी छातीत परिस्थिती बदलण्याची आग जिवंत असेल, तोपर्यंत दुष्यंत कुमारांचा आवाजही जिवंत राहील.

कारण काही कवी आपल्या काळाबद्दल लिहितात; काही कवी काळाच्या पलीकडील माणसाबद्दल लिहितात. दुष्यंत कुमार दुसऱ्या प्रकारातले होते. त्यामुळे त्यांची कविता इतिहासाच्या पुस्तकात बंद होत नाही. ती प्रत्येक नव्या आंदोलनात दरवाजा उघडून बाहेर येते.

आणि पुन्हा प्रखरतेने सांगते—

तुम्हारे पांव के नीचे जमीन नही है ।

कमाल ये है की, फिरभी तुम्हे यकीन नही है ॥

दुष्यंत कुमार सत्तेच्या आत्ममग्नतेवर आणि वास्तवापासून तुटलेल्या व्यवस्थेवर जेव्हा प्रहार करतात, तेव्हा त्यांचा हा शेर विलक्षण धारदार ठरतो. पायाखालची जमीन सरकली आहे; वास्तव बदललं आहे; लोकांच्या मनात असंतोष आहे—पण सत्तेला अजूनही स्वतःच्या सुरक्षिततेचा भ्रम आहे. हा शेर एका विशिष्ट सरकारापुरता नाही. तर, वास्तवापासून तुटलेल्या प्रत्येक सत्तेला, व्यवस्थेला वा व्यक्तीला तो लागू पडतो.

दुष्यंत कुमार यांनी अल्पायुष्यात लिहलेल्या मोजक्या ग़ज़लांनी हिंदी साहित्याला, भारतीय निषेध संस्कृतीला, चळवळी व आंदोलनांना जो वारसा दिला, तो आजही तितकाच धगधगता आहे. साठ-सत्तरच्या दशकातल्या आणीबाणीविरुद्ध लढणाऱ्या तरुणापासून, आज मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्या हक्कांसाठी संघटित होणाऱ्या जेन-झी तरुणापर्यंत — हा एक अखंड धागा आहे. सत्तेला प्रश्न विचारण्याचं धैर्य, सामान्य माणसाच्या वेदनेला वाचा फोडण्याची तळमळ आणि बदल घडवण्याची अनावर आस — या तीनही गोष्टी काळाच्या पलीकडे जातात. म्हणूनच, आज दुष्यंत कुमार यांच्या जयंतीदिनी, त्यांचं काव्य पुन्हा एकदा वाचणं किंवा नव्याने शोधणं — हे केवळ साहित्यिक श्रद्धांजली नाही, तर आजही तितकंच प्रस्तुत असलेलं एक वैचारिक भान आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top