फेसबुक इन्स्टाकरणाच्या वाटेवर : आपली आवड की अल्गोरिदमची निवड ?

मित्रांनो, फेसबुकमध्ये काही बदल होतांना तुम्हाला जाणवतोय का ? कदाचित, तुम्ही अनुभवला असला तरी त्याचे कारण समजले नसेल ! खरं तर, आजवर फेसबुक म्हटले की डोळ्यासमोर येत होते ते मित्रांचे फोटो, नातेवाईकांच्या पोस्ट, वाढदिवसाच्या शुभेच्छा, स्थानिक घडामोडी, फॉलो करत असलेल्या पेजेसचे अपडेटस आणि विविध गटांमधील चर्चा ! पण आता फेसबुकच्या मूळ स्वरूपातच मोठा बदल होताना दिसत आहे. भारतात फेसबुकने ‘रील्स फर्स्ट’ अनुभवाची चाचणी सुरू केली आहे. याचा स्पष्ट अर्थ आहे की, फेसबुक आता केवळ सोशल नेटवर्क राहू इच्छित नसून युजर्सला जास्तीत जास्त वेळ व्हिडिओमध्ये गुंतवून ठेवणारे संपूर्ण माध्यम बनू पाहत आहे. हे फेसबुकचे इन्स्टाकरण आहे का ? याबाबत आज भाष्य करावेसे वाटते.

शेखर पाटील

फेसबुकची फिड आजवर अनेकदा बदलल्याचे आपण अनुभवले आहे. आता मात्र अगदी मोठ्या प्रमाणातील आमूलाग्र बदलाची नांदी झडल्याचे दिसून येत आहे. याची पहिली पायरी म्हणजे आपण अनुभवत असलेला बदल होय. गेल्या काही दिवसांपासून आपल्याला फेसबुकचे ॲप स्मार्टफोनवर ओपन केल्यानंतर रेग्युलर फिडच्या ऐवजी संपूर्ण स्क्रीनभर असलेल्या रील्सची फिड दिसू लागली आहे. आता ‘रील्स फर्स्ट’ म्हणजे नेमके काय? साध्या भाषेत सांगायचे तर फेसबुक उघडल्यानंतर पारंपरिक पोस्टच्या ऐवजी पूर्ण पडद्यावर व्हिडिओला प्राधान्य मिळणार ! यात एका व्हिडिओवरून दुसऱ्या व्हिडिओकडे स्क्रोलींगचीही व्यवस्था असेल. मित्रांनी काय टाकले आहे, यापेक्षा आपल्याला काय पाहायला आवडते, यावर पुढील सामग्री ठरवली जाईल. म्हणजेच फेसबुकच्या वाटचालीत हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.

फेसबुकचा हा बदल अचानक झालेला नाही. काही काळापासून मेटा कंपनीने आपल्या सर्व प्लॅटफॉर्मवर व्हिडिओला केंद्रस्थानी आणले आहे. इन्स्टाग्रामवर रील्सला मिळालेला प्रतिसाद, फेसबुक वरील व्हिडिओंचे रील्स मध्ये होणारे एकत्रीकरण, एआयवर आधारित रेमकेंडेशन्स आणि क्रियेटर सेंट्रीक डिस्ट्रीब्युशन यांचा विचार केला, तर रील्स फर्स्ट हा त्याच दीर्घकालीन प्रक्रियेचा पुढचा टप्पा आहे. भारतात या प्रयोगाला सुरुवात होणे हा योगायोगाचा भाग मानता येणार नाही. फेसबुकसाठी भारत ही जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे आणि येथे लाँग व शॉर्ट व्हिडीओजचा वापर शहरांपुरता मर्यादित न राहता लहान शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत झपाट्याने वाढला आहे. यामुळे भारतासारख्या अवाढव्य बाजारपेठेत फेसबुकने आपल्या बदलाची चाचपणी सुरू केली आहे.

यामुळे फेसबुकच्या मूळ तत्त्वज्ञानातही बदल होताना दिसतो. एकेकाळी फेसबुकची संपूर्ण रचना ‘आपण कोणाला ओळखतो’ याभोवती फिरत होती. आपल्या मित्रांची यादी, आपण फॉलो केलेले पेजेस, परिचित व्यक्तींच्या पोस्ट, भौगोलीक स्थानाशी संबंधीत अपडेटस आणि आपल्या सामाजिक वर्तुळातील हालचाली यावर फीड आकार घेत असे. आता मात्र केंद्रस्थानी ‘आपल्याला काय पाहायला आवडते’ हा प्रश्न येत आहे. यालाच तंत्रज्ञानाच्या भाषेत ‘सोशल ग्राफ’ वरून ‘इंटरेस्ट ग्राफ’ कडे होणारा प्रवास म्हणता येईल. ( सध्याचे समाजमाध्यम हे ‘सोशल मीडिया’ नव्हे तर ‘इंटरेस्ट मीडिया’ होय याबाबत मी आधी त्रोटक लिहले असले तरी लवकरच सविस्तर लिहतो. )

हा बदल दिसायला साधा असला, तरी फेसबुकच्या ओळखीत मूलभूत परिवर्तन घडवणारा आहे. कारण यापुढे आपण कोणाला फॉलो करतो यापेक्षा आपण कोणत्या व्हिडिओवर थांबतो, कोणती सामग्री पूर्ण पाहतो, काय शेअर करतो, कोणत्या विषयावर प्रतिक्रिया देतो आणि कोणती गोष्ट पुन्हा पाहतो यावर पुढील सामग्री ठरू शकते. म्हणजेच मित्रांच्या जगापेक्षा अल्गोरिदमचे जग अधिक प्रभावी होणार आहे.

या बदलाच्या माध्यमातून फेसबुकचे इन्स्टाग्रामकरण की टिकटॉककरण होतेय ? हा प्रश्न विचारण्यात येत असून तो स्वाभाविक देखील आहे. कारण पूर्ण पडद्यावरील छोट्या व्हिडिओंचा अनुभव म्हटला की पहिल्यांदा टिकटॉक आणि त्यानंतर इन्स्टाग्राम रील्स आठवतात. आता फेसबुकही त्याच मार्गावर जात असल्याने फेसबुकचे इन्स्टाकरण सुरू झाले आहे का ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

यासोबतच, युट्युबची व्हिडीओतील मक्तेदारी मोडीत काढण्यासाठीच फेसबुकनेही आता व्हिडीओ प्रथम हे धोरण स्वीकारल्याची चर्चा होत असून ती अनाठायी नाही. फेसबुकने आधीच आपल्या सर्व लहान-मोठ्या लांबीच्या व्हिडीओजला रील्समध्ये समाविष्ट केले आहे. यामुळे युट्युबला टक्कर देण्याचा मानस यातून उघड झाला आहे. डिजिटल जगातील खरी लढाई कोणाकडे अधिक मित्र आहेत किंवा कोणाकडे अधिक सामग्री आहे याची नाही. ती वापरकर्त्याच्या वेळेची आहे. कोणते प्लॅटफॉर्म वापरकर्त्याला किती काळ खिळवू शकतो, किती व्हिडिओ दाखवू शकतो, किती जाहिराती पोहोचवू शकतो आणि त्याचे लक्ष किती वेळ स्वतःकडे राखू शकते, यावर आजच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे गणित उभे आहे. या अर्थाने ‘रील्स फर्स्ट’ हा केवळ ‘कंटेंट स्ट्रॅटेजी’चा भाग नसून तो ‘अटेन्शन इकॉनॉमी’ मधील मेटाचा मोठा डाव आहे.

याचा सर्वाधीक लाभ हा क्रियेटर्सला होणार आहे. इतरांचे व्हिडीओ अथवा स्टोरीलाईनला कॉपी-पेस्ट करणाऱ्यांपेक्षा मौलीकतेला अधिक प्राधान्य आणि अर्थातच अधिक व्ह्यूज मिळतील हे आता स्पष्ट झाले आहे. लवकरच फॉलोअर्सपेक्षा ओरिजनॅलिटी (मौलीकता) आणि एंगेजमेंट हे फॅक्टर्स महत्वाचे बनणार आहेत. स्थानिक डिजिटल पत्रकारितेसाठी या बदलात मोठी संधी दडलेली आहे. जळगावसारख्या जिल्ह्यात तयार झालेली एखादी महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांचा प्रश्न, स्थानिक राजकीय प्रतिक्रिया, बाजारभाव, एखादी दुर्घटना किंवा सामाजिक विषयावरील व्हिडिओ जर प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पाहिला, तर तो संबंधित वृत्तपेजच्या फॉलोअर्सच्या पलीकडेही पोहोचू शकतो. अगदी जागतिक पातळीवर याची पोहच जाऊ शकते.
ही इन्फ्लुएन्सर्ससह स्थानिक पत्रकारितेसाठी अभूतपूर्व संधी आहे; पण त्यात धोका देखील तितकाच मोठा आहे. जर एखादी वृत्तसंस्था फेसबुकच्याच अल्गोरिदमवर अवलंबून राहिले, तर भविष्यात प्लॅटफॉर्मच्या धोरणात बदल झाल्यास त्या संस्थेची पोहोच एका झटक्यात कमी होऊ शकते. म्हणूनच युजरला सावध रहावे लागणार आहे. तर महत्वाची बाब म्हणजे आता एआयच्या मदतीने कोणत्याही स्थानिक भाषेतील कंटेंट हे जगभरातील विविध भाषांमध्ये सहज भाषांतरीत होत असल्याने लोकल-टू-ग्लोबल हे केवळ घोषवाक्य राहणार नसून ते प्रत्यक्षात साकार होणार आहे.

फेसबुकच्या ‘रील फर्स्ट’ धोरणाचा एक महत्त्वाचा परिणाम व्यापारावरही होणार आहे. ई-कॉमर्सची पारंपरिक पद्धत ग्राहकाने उत्पादन शोधण्यावर आधारित होती. आता मात्र प्रॉडक्ट हे ग्राहकाला आकर्षीत करून घेते. कुणालाही रील पाहताना एखादे कपडे, मोबाईल, सौंदर्यप्रसाधन किंवा स्थानिक दुकानातील वस्तू आवडते; त्यानंतर ग्राहक माहिती घेतो, डीएम किंवा व्हाटसॲपवर संपर्क करतो आणि खरेदीपर्यंत पोहोचतो. म्हणजे मनोरंज, रेकेंडेशन, जाहिरात आणि खरेदी यातील सीमारेषा हळूहळू मिटत आहेत. आणि फेसबुकचे नवीन फिचर याला प्राधान्य देणार आहे.

म्हणूनच ‘रील फर्स्ट’ कडे केवळ फेसबुकचे नवीन फिचर म्हणून पाहणे चुकीचे ठरेल. हा सोशल नेटवर्कपासून अल्गोरिदमिक माध्यमाकडे होत असलेल्या संक्रमणाचा टप्पा आहे. फेसबुकची जुनी ओळख ‘आपल्या लोकांच्या पोस्टचे ठिकाण’ अशी होती. नवी ओळख ‘आपल्या आवडीचा पुढचा व्हिडिओ दाखवणारे माध्यम’ अशी होऊ शकते. तथापि, यामुळे फेसबुकची मूळ ओळख हरवण्याचा धोका देखील आहे.

भारतामध्ये सुरू झालेली ‘रील्स फर्स्ट’ फिचरची चाचणी त्यामुळे केवळ एका अॅपमधील बदलाची बातमी नाही. ती पुढील सोशल नेटवर्क कसे दिसेल याची झलक आहे. उद्या फेसबुक उघडल्यावर आपल्याला मित्राने काय लिहिले ते आधी दिसेल की एआयने आपल्यासाठी निवडलेला एखादा व्हिडिओ ? हे आज निश्चित सांगता येणार नाही. मात्र एक गोष्ट निश्चित आहे फेसबुक हे जुन्या अर्थाने केवळ ‘सोशल नेटवर्क’ न राहता कात टाकण्याच्या तयारी असल्याचे स्पष्ट आहे. त्याला व्हिडीओजच्या माध्यमातून सर्वांना आणि त्यात देखील नवीन पिढीला कनेक्ट करावयाचे आहे. कारण फेसबुकवर जेन-झी आणि जेन-अल्फा हे तुलनेत कमी प्रमाणात येत असल्याचे आधीच सिध्द झालेले आहे. यामुळे आगामी काळात देखील आपला दबदबा कायम राखण्यासाठीचा हा फेसबुकचा प्रयत्न असू शकतो.

आणि म्हणून प्रश्न केवळ इतकाच नाही की फेसबुकचे इन्स्टाकरण होत आहे का. खरा प्रश्न असा आहे की, उद्याचे इंटरनेट आपल्याला आपण शोधलेल्या गोष्टी दाखवेल की अल्गोरिदमने आपल्यासाठी निवडलेल्या ? त्या प्रश्नाचे उत्तर कदाचित फेसबुकच्या ‘रील्स फर्स्ट’ या रणनितीतून आपल्याला मिळणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top