जग मे रह जाएंगे प्यारे तेरे बोल !

महान गायक मुकेश यांचे आज पुण्यस्मरण ! आज त्यांच्या जाण्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. अर्धशतकाच्या एवढ्या काळात पिढ्या बदलल्या, नायक बदलले, सिनेमाची भाषा बदलली, गाण्यांची बांधणी बदलली, ग्रामोफोनच्या तबकड्या कॅसेटमध्ये, कॅसेट सीडीमध्ये आणि पुढे स्मार्टफोनवरून स्ट्रीमिंगमध्ये बदलल्या. पण एखाद्या शांत संध्याकाळी अचानक ‘कहीं दूर जब दिन ढल जाये’ कानावर पडले, तर काळ अजूनही थांबतो. ‘दुनिया बनाने वाले’ सुरू झाले की माणूस आजही नियतीलाच प्रश्न विचारू लागतो. ‘सब कुछ सीखा हमने’ ऐकताना जगाच्या व्यवहारात हरलेला आपल्यातला निष्पाप माणूस पुन्हा जागा होतो. ‘कभी कभी मेरे दिल में’च्या पहिल्या सुरांसोबत प्रेम आजही पहिल्यांदा झाल्यासारखे वाटते. आणि ‘एक दिन बिक जायेगा माटी के मोल’पर्यंत पोहोचल्यानंतर जाणवते की, मुकेश नावाच्या या कलावंताने आपल्या आयुष्यात कितीतरी मोठी कामगिरी केलेली आहे.

शेखर पाटील

मुकेशजींचा जन्म दिल्लीचा. अभिनय आणि गायनाच्या ओढीने मुंबईत आलेल्या या तरुणाच्या आरंभीच्या गायकीवर के. एल. सैगल यांचा प्रभाव होता. ‘पहली नजर’मधील ‘दिल जलता है तो जलने दे’ने त्यांना पहिली व्यापक ओळख दिली. पुढे मात्र त्यांनी दुसऱ्या कोणाचा आवाज होण्याऐवजी स्वतःचा स्वर शोधला—उबदार, किंचित थरथरणारा, अवघड ताना दाखवण्याची घाई नसलेला आणि म्हणूनच कमालीचा मानवी असा आवाज म्हणून त्यांची ख्याती झाली. हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगात मुकेश यांच्या आजूबाजूला एकापेक्षा एक विलक्षण स्वर होते. मोहम्मद रफींच्या गळ्यात आकाशाएवढी व्याप्ती होती. मन्ना डे यांच्या स्वरात शास्त्रीय संगीताचे विलक्षण प्रभुत्व होते. किशोरकुमार पुढे आपल्या मुक्त, रंगबदलत्या आवाजाने पिढ्यांना वेड लावणार होते.

अशा प्रतिभावंतांच्या मांदियाळीत मुकेश यांनी स्वतःचे स्थान कसे निर्माण केले ? हा प्रश्न त्यांच्या लोकप्रियतेचे रहस्य सांगतो. त्यांनी श्रोत्याला सुरेल गळ्याने चकित केले नाही; त्यांनी त्याला जवळ घेतले. ते गात असताना एखादा महान गायक आपल्यासमोर कला सादर करतो आहे, असे वाटत नसे; उलट एखादा आपलाच माणूस अगदी जवळ बसून आपल्या मनातलेच दुःख आपल्याला सांगतो आहे, असा भास व्हायचा. हेच सामान्यत्व त्यांना असामान्यत्व प्रदान करणारे ठरले.

मुकेशजी यांच्या आवाजातील किंचित कातरपणा, श्वासातील मृदु कंप, उच्चारातील साधेपणा आणि भाव व्यक्त करताना घेतलेला संयम हेच पुढे त्यांच्या गायकीचे सामर्थ्य बनले. मुकेश यांच्या बाबतीत ‘दर्द’ हा शब्द इतका वापरला गेला की जणू त्यांच्या आवाजात दुःखाशिवाय दुसरे काहीच नव्हते. प्रत्यक्षात मात्र त्यांच्या स्वरातील खरी गोष्ट दुःख नव्हती—ती होती संवेदना. म्हणून दुःख आले की त्यांचा आवाज त्या दुःखाचा होई; प्रेम आले की प्रेमाचा; आशा आली की आशेचा; आणि जीवनाचा प्रश्न आला की तो एखाद्या तत्वज्ञानासारखा शांत होई. हिंदी चित्रपटसृष्टीत मुकेशजींची वाटचाल सुरू होतांनाच त्यांच्या आयुष्यात आले राज कपूर ! आणि सारे काही बदलून गेले.

हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात नायक आणि पार्श्वगायकांच्या अनेक यशस्वी जोड्या झाल्या; पण राज कपूर आणि मुकेश यांच्यात निर्माण झालेले नाते वेगळ्याच पातळीवरचे होते. ते फक्त पडद्यावरचा चेहरा आणि पडद्यामागचा आवाज नव्हते. राज कपूरच्या व्यक्तिरेखेच्या अंतरंगातील शब्द जणू मुकेश यांच्या स्वरातून बाहेर पडत असत. ‘आग’च्या काळापासून सुरू झालेली ही संगत पुढे ‘आवारा’, ‘श्री ४२०’, ‘अनाडी’, ‘संगम’, ‘मेरा नाम जोकर’ अशा चित्रपटांतून इतकी दृढ झाली की राज कपूरच्या पडद्यावरील अस्तित्वापासून मुकेश यांचा आवाज वेगळा करणेच अशक्य वाटू लागले.

या संगतीचा पहिला जागतिक जयघोष म्हणजे ‘आवारा हूँ’ !

‘आवारा हूँ’ हे फक्त लोकप्रिय गाणे नाही; ते भारतीय लोकप्रिय संस्कृतीतील एक ‘कल्ट क्लासिक’ आहे. एका बेघर, भटक्या, परिस्थितीने बाहेर फेकलेल्या पण मनाने अजूनही मोडून न पडलेल्या तरुणाची ही उन्मुक्त घोषणा आहे. शैलेंद्रचे शब्द, शंकर-जयकिशनची चाल, राज कपूरची पडद्यावरील बेफिकीर देहबोली आणि मुकेश यांचा आवाज यांनी मिळून त्या ‘आवारा’ला भारतीय सीमांच्या पलीकडे पोहोचवले.

ना सोशल मीडिया, ना ठरवून केलेले जागतिक मार्केटिंग; तरी एका भारतीय भटक्याचे गाणे हजारो मैलांवरील लोकांच्या ओठांवर आले. ‘आवारा हूँ’मधील वेदना विलाप करत नाही. ती हसत पुढे जाते. ‘श्री ४२०’मधील ‘मेरा जूता है जापानी’ने या सामान्य माणसाला दुसरी प्रतिमा दिली. अर्थात, ‘मुकेश म्हणजे फक्त अश्रू’ ही कल्पना त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीनेच खोटी ठरवली होती. मात्र राज कपूर–मुकेश या नात्याचा सर्वांत मानवी अविष्कार कदाचित १९५९च्या ‘अनाडी’मध्ये दिसतो.

‘अनाडी’चा नायक हा जगाच्या व्यवहारात बसत नसलेला माणूस आहे. कपट, हुशारी, स्वार्थ आणि संधीसाधूपणा यांना यशाचे माप समजणाऱ्या जगात तो विश्वास, प्रेम आणि माणुसकी घेऊन फिरतो. आणि म्हणून ‘सब कुछ सीखा हमने’ हे फक्त प्रेमभंगाचे गीत उरत नाही; ते जगण्याची शोकांतिका बनते. माणसाने सर्व काही शिकले, पण स्वार्थी होण्याची हुशारी शिकली नाही—हा त्याचा गुन्हा आहे का ? हा प्रश्न त्या गीताच्या प्रत्येक सुरातून येतो. या गाण्याने त्यांना लोकप्रियतेसोबत पहिले फिल्मफेअर अवॉर्डही दिले हे विशेष. ‘अनाडी’मध्येच दुसऱ्या टोकाला ‘किसी की मुस्कुराहटों पे हो निसार’ आहे. ‘सब कुछ सीखा हमने’ हा जगाने दिलेल्या जखमेचा स्वर असेल, तर ‘किसी की मुस्कुराहटों…’ हे त्या जखमेवरचे उत्तर आहे. स्वतःसाठी जगण्यापेक्षा दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणणे, दुसऱ्याचे दुःख थोडेसे आपल्या वाट्याला घेणे आणि माणसाच्या कामी येण्यात जीवनाचा अर्थ शोधणे—ही किती साधी, पण किती मोठी जीवनदृष्टी! मुकेश यांच्या व्यक्तिमत्त्वाला श्रद्धांजली द्यायची असेल तर हे गाणे विसरून कसे चालेल ?

याच ‘अनाडी’तील ‘वो चाँद खिला वो तारे हँसे’ आणि ‘दिल की नजर से’सारखी गाणी मुकेश यांच्या रोमँटिक स्वराची दुसरी छटा दाखवतात. लता मंगेशकरांसोबतच्या त्यांच्या युगुलगीतांना एक वेगळीच निरागसता लाभली होती. दोन्ही स्वर एकमेकांशी स्पर्धा करत नाहीत; ते संवाद साधतात. आणि येथेच मुकेश यांच्या कारकिर्दीतला आणखी एक अत्यंत महत्त्वाचा चित्रपट आठवतो—‘मधुमती’.

‘सुहाना सफर और ये मौसम हसीं’ हे मुकेश यांच्या सर्वाधिक आनंददायी गाण्यांपैकी एक. सलील चौधरींचे अप्रतिम संगीत आणि शैलेंद्रचे शब्द. ‘सुहाना सफर…’मध्ये मुकेश यांचा स्वर ऐकताना ‘दर्द का बादशाह’ ही उपाधी क्षणभर विसरावी लागते. इथे त्यांच्या आवाजात मुक्त आनंद आहे; पण त्या आनंदालाही एक निरागस आश्चर्य आहे. जग इतके सुंदर असू शकते, यावर विश्वास बसत नाही, अशी भावना.

याच ‘मधुमती’मध्ये लता मंगेशकरांसोबतचे ‘दिल तड़प तड़प के कह रहा है’ आले आणि प्रेमाच्या विरहाला वेगळा रंग मिळाला. त्या काळातील ‘यहूदी’चे ‘ये मेरा दीवानापन है’देखील विसरणे अशक्य आहे. दिलीप कुमारच्या पडद्यावरील तीव्र भावविश्वाला मुकेश यांनी दिलेला आवाज प्रेमाच्या वेडेपणाचा आहे. वेदना आहे, पण ती हतबल नाही; ती स्वतःच्या प्रेमाबद्दल निष्ठावान आहे. पुढे ‘रानी रूपमती’तील ‘आ लौट के आजा मेरे मीत’, ‘दिल भी तेरा हम भी तेरे’मधील ‘मुझको इस रात की तन्हाई में आवाज न दो’, ‘सारंगा’तील ‘सारंगा तेरी याद में’ अशा गाण्यांनी मुकेश यांच्या दर्दाची वेगवेगळी रूपे दाखवली. एखाद्याला परत बोलावण्याची आर्तता वेगळी, एकाकी रात्रीचे दुःख वेगळे आणि आठवणीत जिवंत असलेल्या प्रेमाचा हुंदका वेगळा—मुकेश प्रत्येक वेदनेला स्वतंत्र आवाज देत.

रूक जा ओ जानेवाली रूक जा किंवा ‘डम डम डिगा डिगा’सारखे चपळ, प्रसन्न गाणे ऐकले की मुकेश यांच्या स्वरातल्या खोडकरपणाचीही जाणीव होते. साठच्या दशकात राज कपूर–मुकेश ही जोडी अधिक प्रगल्भ झाली आणि ‘संगम’मध्ये तिच्या संवेदनांना जणू शिखरच मिळाले. यातील ‘दोस्त दोस्त ना रहा’ हे गाणे म्हणजे अविस्मरणीय ! हिंदी चित्रपटसंगीतातील मैत्रीभंगाचे यापेक्षा अधिक सार्वत्रिक गीत शोधणे कठीण. मित्राने साथ सोडली, प्रेमावरही विश्वास उरला नाही आणि माणूस गर्दीत असूनही स्वतःला एकटा समजू लागला—या सगळ्याचा हुंदका मुकेश यांच्या आवाजात आहे. ते आक्रोश करत नाहीत; म्हणूनच वेदना अधिक खोल जाते. पडद्यावर राज कपूर आहे, पण गीत ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यातील एखादा तुटलेला विश्वास त्यांच्या चेहऱ्यावरील वेदनेत सामावतो. ‘संगम’मधीलच ‘हर दिल जो प्यार करेगा’सारख्या रचनेत मात्र प्रेमाची उत्सवी बाजूही दिसते. म्हणजे एका चित्रपटात मुकेश मैत्रीच्या मृत्यूवर रडू शकतात आणि दुसऱ्या क्षणी प्रेमाच्या सार्वत्रिक आनंदात सामीलही होऊ शकतात.

या काळात त्यांचा स्वर राज कपूरच्या पलीकडे अनेक अभिनेत्यांवरही तितक्याच परिणामकारकपणे खुलला. ‘हिमालय की गोद में’मधील ‘मैं तो एक ख्वाब हूँ’मध्ये प्रेम जणू स्वतःच्या अस्थिरतेची कबुली देते. ‘बंदिनी’मधील ‘ओ जानेवाले हो सके तो लौट के आना’मध्ये निरोपाची वेदना आहे. जाणाऱ्याला थांबवता येत नाही, पण त्याच्या मागे मनाचा एक भाग कायम उभा राहतो—मुकेश यांनी त्या भावनेला विलक्षण नाजूकपणा दिला.

आणि मग येतो ‘तीसरी कसम’- मुकेश यांच्या तत्त्वचिंतनशील गायकीचा विचार ‘दुनिया बनाने वाले’शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. यातील नायक हिरामनचा प्रश्न प्रत्यक्षात प्रत्येक सामान्य माणसाचा प्रश्न आहे. हे जग बनवणाऱ्या शक्तीला तो विचारतो—इतकी सुंदर माणसे, इतकी स्वप्ने, इतके प्रेम निर्माण करायचे, आणि मग त्यांच्या वाट्याला विरह व वेदना का द्यायची ? याची महानता ही आहे की त्यात देवाविरुद्ध बंड नाही; पण आंधळा स्वीकारही नाही. तो प्रेमात जखमी झालेल्या साध्या माणसाचा प्रश्न आहे. जगाच्या निर्मात्याशी बोलताना मुकेश आवाजात दैवी गांभीर्य आणत नाहीत. उलट त्यांची साधी, किंचित थरथरणारी शैलीच त्या प्रश्नाला अधिक मोठा बनवते.

त्याच ‘तीसरी कसम’मधील ‘सजन रे झूठ मत बोलो’ जीवनाच्या दुसऱ्या सत्याला स्पर्श करते. माणूस कितीही जमा करो, शेवटी जाताना त्याला सगळे येथेच ठेवायचे आहे. खोटेपणा, अहंकार, संपत्ती, प्रतिष्ठा यांच्यामागे आयुष्य खर्च करण्याचा काय अर्थ, असा तो प्रश्न आहे. आणि हे तत्त्वज्ञान मुकेश उपदेशासारखे गात नाहीत. एखादा अनुभवी प्रवासी आपल्या साथीदाराच्या खांद्यावर हात ठेवून सांगतो आहे—मित्रा, शेवटचा प्रवास सर्वांचा सारखाच आहे बरं । अशी त्याची भावना. तिसरी कसम ही शैलेंद्र यांच्या वैयक्तीक आयुष्यातील शोकांतीका बनली हा नियतीने घडवलेला आणखी एक योगायोग.

या तत्त्वचिंतनाला आणखी एक विलक्षण गीत जोडावे लागेल—‘ओ रे ताल मिले नदी के जल में’ या ‘अनोखी रात’मधील रचनेचे. नदी समुद्राला मिळते, जीवनाच्या प्रवाहातील प्रत्येक गोष्ट अखेरीस कोणत्या तरी विराट अस्तित्वात विलीन होते, ही कल्पना इतक्या साध्या प्रतिमांतून सांगितली जाते की गाणे ऐकताना जीवनाचा गुंता क्षणभर सोपा वाटू लागतो.

आणि ‘चल अकेला, चल अकेला’?- मुकेश यांच्या स्वरातील एकाकीपणाला धैर्याची जोड देणारे हे आणखी एक महत्त्वाचे गीत. जीवनाच्या प्रवासात प्रत्येक वेळी कुणी साथ देईलच असे नाही. कधी कधी स्वतःच्या पावलांवर विश्वास ठेवून एकट्याने चालावे लागते. मुकेश यांच्या आवाजात हे शब्द आल्यावर ते आक्रमक प्रेरणागीत तरी मनाला उभारी देणारे गीत बनते.

मुकेश यांच्या रोमँटिक वारशाचा विचार करताना मात्र ‘सरस्वतीचंद्र’ हा स्वतंत्र अध्याय आहे. ‘चंदन सा बदन, चंचल चितवन’मध्ये प्रेमाचा असा सुसंस्कृत, कोमल स्पर्श आहे की गीत ऐकताना प्रिय व्यक्तीच्या सौंदर्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलते. त्यात उत्कटता आहे, पण आक्रमकपणा नाही. सौंदर्याचा उपभोग घेण्याऐवजी त्याचे कौतुक करणारी भावना आहे. त्याच चित्रपटातील लता मंगेशकरांसोबतचे ‘फूल तुम्हें भेजा है खत में’ तर प्रेमपत्रांच्या काळाची एक सुंदर स्मृती आहे. याच चित्रपटातील ‘हमने अपना सब कुछ खोया’मात्र याच प्रेमविश्वाची शोकात्म बाजू आहे.

यानंतर ‘मिलन’मधील ‘सावन का महीना’कडे वळले की पुन्हा पूर्ण वातावरण बदलते. लता मंगेशकर आणि मुकेश यांचे हे गाणे भारतीय ग्रामीण प्रेमाची, पावसाची आणि सहज संवादाची अप्रतिम आठवण आहे. ‘चाँद सी महबूबा हो मेरी’ हे मुकेश यांच्या रोमँटिक गायकीचे आणखी एक शिखर. प्रेमिकेच्या सौंदर्याची कल्पना आहे; पण त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे मनाला ‘तशीच’ व्यक्ती हवी आहे, ही उत्कट इच्छा. ‘जो तुमको हो पसंद वही बात करेंगे’मध्ये तर प्रेमाचे समर्पण जवळजवळ निरपेक्षतेपर्यंत जाते. ‘जिस गली में तेरा घर ना हो बालमा’मध्ये प्रिय व्यक्तीचे अस्तित्वच जगाला अर्थ देते. तिचे घर नसलेला रस्ता निरर्थक आणि तिची आठवण नसलेला प्रवास रिकामा—या भावनेला मुकेश यांनी अत्यंत तरल स्वर दिला.

आणि ‘कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे’चा उल्लेख तर अपरिहार्य आहे. प्रिय व्यक्तीने आपल्याला निवडले नाही, तरी जगाने तिला जखमी केल्यावर ती परत आली तर दार उघडे राहील—ही किती विलक्षण उदात्त भावना ! यात स्वतःचा अपमान नाही, सूड नाही, कटुता नाही. दुखावलेले प्रेम अजूनही करुणा राखून आहे. याच भावविश्वाला ‘वक्त करता जो वफा आप हमारे होते’ आणखी गडद करते. इथे तक्रार प्रिय व्यक्तीपेक्षा काळाशी अधिक आहे. वेळच साथ देत नाही, परिस्थितीच प्रेमाला पूर्णत्व देत नाही—अशा वेळी माणूस कुणाला दोष देणार? मुकेश यांच्या स्वरातील नियतीपुढील हतबलता या गाण्याला सामान्य प्रेमभंगाच्या पलीकडे घेऊन जाते. ‘ज़ुबाँ पे दर्द भरी दास्ताँ चली आई’मध्ये मात्र दर्द स्वतः गाणे बनून ओठांवर येतो.

सत्तरच्या दशकात हिंदी सिनेमाचा स्वभाव बदलत होता. नायक बदलत होता. तरुणाईची भाषा बदलत होती. पण मुकेश यांच्या आवाजाचे आश्चर्य असे की तो जुनाट झाला नाही. उलट त्यांच्या कारकिर्दीच्या अखेरच्या काळात काही सर्वाधिक अविस्मरणीय गाणी आली. ‘आनंद’मधील ‘मैंने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने’मध्ये मैत्री, प्रेम आणि जगण्याच्या आठवणींची विलक्षण ऊब आहे. मात्र त्याच ‘आनंद’मधील ‘कहीं दूर जब दिन ढल जाये’ हा मुकेश यांच्या स्वरविश्वाचा स्वतंत्र अध्याय आहे. या गाण्यात दुःखाचे कारण ठामपणे सांगता येत नाही. म्हणून ते इतके सार्वत्रिक आहे. काहीतरी हरवले आहे; पण काय? कुणाची आठवण आहे; पण कोणाची? कोणीतरी आपले आहे; पण कुठे? ही अनामिक हुरहूरच ‘कहीं दूर…’चे सौंदर्य आहे.

या काळातच ‘शोर’मधील ‘एक प्यार का नगमा है’ आले. लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजातील हे गीत प्रेमगीत असूनही प्रत्यक्षात संपूर्ण जीवनाचे तत्त्वज्ञान सांगते. याच दशकातील ‘रजनीगंधा’मधील ‘कई बार यूँही देखा है’ विशेष महत्त्वाचे आहे. ही ना पारंपरिक शोकांतिका, ना मोठे प्रेमनाट्य. शहरातील मध्यमवर्गीय मनाच्या छोट्या, गुंतागुंतीच्या भावनांना योगेशच्या शब्दांनी आणि सलील चौधरींच्या संगीताने आवाज दिला. आणि मुकेश यांनी ते इतक्या संयतपणे गायले की ते आधुनिक मनाचे अंतर्मुख गीत बनले. याच गीतासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

‘रोटी कपडा और मकान’मधील ‘मैं ना भूलूँगा’सारख्या युगुलगीताने प्रेमाच्या आठवणीला भव्यता दिली, तर ‘धर्मात्मा’मधील ‘क्या खूब लगती हो’मध्ये मुकेश यांचा आवाज पुन्हा हलका, प्रसन्न आणि प्रेमात हरखलेला दिसतो. ‘क्या खूब लगती हो’ हेही मुकेश हिट्समधील प्रमुख गाण्यांपैकी आहे.

आणि मग पुन्हा राज कपूर यांचाच ‘मेरा नाम जोकर’ ! ‘आवारा हूँ’मध्ये जगाकडे खोडकर वृत्तीने चालत जाणारा तरुण आता आयुष्याच्या बराच पुढे आला आहे. चेहऱ्यावर अजूनही रंग आहे, पण मनाला जखमांची किंमत कळली आहे. म्हणून ‘जाने कहाँ गये वो दिन’ ऐकताना जणू ‘आवारा’ स्वतःच आपल्या तरुणपणाकडे मागे वळून पाहतो आहे असे वाटते.

‘जाने कहाँ गये वो दिन’मध्ये फक्त जुने हरवलेले दिवस नाहीत; तर, त्यात काळ हातातून निसटल्याची वेदना आहे. एकेकाळी जवळ असलेले चेहरे, आशा, प्रेम, तारुण्य—सगळे हळूहळू दूर गेले. म्हणून हे गाणे ऐकणारा प्रत्येक माणूस स्वतःचे ‘वो दिन’ शोधू लागतो.

पण पन्नासाव्या पुण्यतिथीच्या संदर्भात मला त्याहूनही अधिक अर्थपूर्ण वाटते ते ‘जीना यहाँ मरना यहाँ’.

हे कलाकाराचे जीवनतत्त्व आहे. रंगमंच आपला आहे. आपल्याला इथेच जगायचे आणि मरायचे आहे. आपण येथे आलो, आपली भूमिका केली आणि एका दिवशी निघून जाणार. पण रंगमंच राहणार अन्‌ टाळ्याही राहणार. आणि उद्या मी नसलो तरी माझ्याऐवजी दुसरा कुणी येऊन जगाला हसवणार ! ‘मेरा नाम जोकर’च्या कथेत हे जोकरचे विधान आहे; आज ऐकताना मात्र ते मुकेश यांच्या संपूर्ण कलाजीवनाचे रूपक वाटते.

‘केहता है जोकर सारा जमाना’चा उल्लेखही येथे करायलाच हवा. जोकर लोकांना हसवतो; पण त्याच्या हास्यामागे स्वतःच्या वेदना असतात. ही कल्पना तर मुकेश यांच्या स्वराला जन्मापासूनच जवळची वाटावी अशी.

आणि मग मुकेश यांच्या जीवनातील अखेरच्या वर्षात येतो ‘कभी कभी’.

साहिर लुधियानवींचे शब्द, खय्याम यांचे संगीत आणि मुकेश यांचा स्वर.

कभी कभी मेरे दिल में’ कुणालाही भावविभोर करणारे गीत आहे. ते प्रणयगीत असूनही त्यात मुकेश यांच्या स्वराला शोभणारा विरहाची मंद छटा आहे. अमिताभ आणि राखी यांनी या गाण्याला पडद्यावर त्याच ताकदीने साकारल्याने या गाण्याने नवीन उंची गाठली आहे.

आणि त्याच चित्रपटात—

‘मैं पल दो पल का शायर हूँ’.

आज पन्नास वर्षांनंतर हे गाणे ऐकताना शब्द आणि वास्तव यांच्यातील विरोधाभास मनाला चटका लावतो. कवी स्वतःला सांगतो—माझे अस्तित्व काही क्षणांचे आहे; माझ्यानंतर दुसरे येतील, जग पुढे जाईल, मला कोण आठवेल ?

आणि काळ उत्तर देतो—पन्नास वर्षांनंतरही आम्ही तुलाच ऐकतो आहोत.

स्वतःला ‘पल दो पल’चा समजणारा स्वर अर्धशतक ओलांडूनही एका नव्या पिढीच्या कानात पोहोचतो, यापेक्षा कलाकाराच्या अमरत्वाचे मोठे प्रमाणपत्र काय असू शकते ?

मात्र मुकेशजींच्या या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी मला एकच गाणे ठेवावेसे वाटते—

‘इक दिन बिक जायेगा माटी के मोल’.

मजरूह सुलतानपुरींचे शब्द. आर. डी. बर्मनचे संगीत. आणि मुकेश.

माणसाचे शरीर मातीचे होणार—हे तर त्रिकालबाधीत सत्य होय. यात नवीन काही नाही. पण माणूस गेल्यानंतर त्याने उच्चारलेले सुंदर शब्द मागे राहू शकतात, हा या गीताचा आत्मा आहे. म्हणूनच पन्नास वर्षांनंतर मुकेश यांच्या स्मृतीसमोर हे गीत ठेवले की ते चित्रपटातील गाणे राहत नाही; ते त्यांच्या जीवनावर लिहिलेला शिलालेख बनते. यात जग मे रह जायेंगे प्यारे तेरे बोल ! म्हणतांना मुकेश यांना जाणीव नसेल की, याच गीतपंक्ती त्यांच्या आयुष्याचे सार सांगणाऱ्या बनणार आहेत !

२७ ऑगस्ट १९७६ रोजी अमेरिका दौऱ्यावर असतांना डेट्रॉईटमध्ये मुकेश यांनी शेवटचा श्वास घेतला.

पण खरोखर मुकेश गेले का ?

ते आजही ‘दिल जलता है तो जलने दे’च्या सुरुवातीच्या तरुण आवाजात आहेत.

ते ‘आवारा हूँ’ म्हणत आपल्याच मस्तीत चालत आहेत.

ते ‘मेरा जूता है जापानी’मध्ये जगाकडे हसत पाहत आहेत.

ते ‘सुहाना सफर’मध्ये डोंगरांशी बोलत आहेत.

ते ‘दिल तड़प तड़प के’मध्ये प्रेमासाठी व्याकूळ आहेत.

ते ‘सब कुछ सीखा हमने’मध्ये दुनियादारीसमोर परास्त आहेत.

ते ‘किसी की मुस्कुराहटों पे’मध्ये दुसऱ्यासाठी जगण्याचा अर्थ सांगत आहेत.

ते ‘दोस्त दोस्त ना रहा’मध्ये तुटलेल्या विश्वासाच्या जागी बसले आहेत.

ते ‘चंदन सा बदन’मध्ये प्रेमिकेकडे आदराने पाहत आहेत.

ते ‘फूल तुम्हें भेजा है खत में’च्या पत्रात सुकलेल्या फुलाचा सुगंध आहेत.

ते ‘सावन का महीना’च्या धुंद पावसात आहेत.

ते ‘दुनिया बनाने वाले’मधून नियतीला प्रश्न विचारत आहेत.

ते ‘सजन रे झूठ मत बोलो’मध्ये शेवटच्या प्रवासाची आठवण करून देत आहेत.

ते ‘ओ रे ताल मिले’मध्ये जीवनाच्या विराट प्रवाहाचा अर्थ शोधत आहेत.

ते ‘चल अकेला’ म्हणत साथ सुटल्यावरही पुढे चालायला शिकवत आहेत.

ते ‘जो तुमको हो पसंद’मध्ये समर्पण आहेत.

ते ‘कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे’मध्ये उदार हृदयी आशीक आहेत.

ते ‘जिस गली में तेरा घर’मध्ये प्रिय व्यक्तीच्या अस्तित्वासमोर नतमस्तक झाले आहेत.

ते ‘ज़ुबाँ पे दर्द भरी दास्ताँ’मध्ये ओठांवर आलेली जखम आहेत.

ते ‘मैंने तेरे लिये’मध्ये आठवणींचे सात रंग आहेत.

ते ‘एक प्यार का नगमा है’मध्ये जगण्याचा प्रवाह आहेत.

ते ‘कई बार यूँही देखा है’मध्ये शहरात एकटे पडलेल्या मनाचा विचार आहेत.

ते ‘क्या खूब लगती हो’मध्ये सहज उमटलेले कौतुक आहेत.

ते ‘जाने कहाँ गये वो दिन’मध्ये ओसरलेले तारुण्य अन्‌ कारूण्य आहेत.

ते ‘जीना यहाँ मरना यहाँ’मध्ये कलाकाराच्या नियतीचा स्वीकार आहेत.

ते ‘कहीं दूर जब दिन ढल जाये’मध्ये मावळतीच्या प्रकाशात तरंगणारी हुरहूर आहेत.

ते ‘कभी कभी मेरे दिल में’मध्ये अधुऱ्या प्रितीचा उसासा आहेत.

ते ‘मैं पल दो पल का शायर हूँ’मध्ये स्वतःच्या क्षणभंगुरतेची नम्र कबुली आहेत.

आणि ते ‘एक दिन बिक जायेगा’मध्ये आपल्या मृत्यूच्या पलीकडे जगणारा स्वर आहेत.

म्हणून मुकेश यांना केवळ ‘दर्दभऱ्या नगम्यांचा बादशाह’ म्हणणे कदाचित अपुरे आहे. ते मानवी भावनांच्या साधेपणाचे गायक होते. त्यांच्यातील सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी भावना मोठ्या केल्या नाहीत; त्यांनी त्या भावना ते संवेदनशीलपणे जगले.

कदाचित म्हणूनच तांत्रिकदृष्ट्या अधिक निर्दोष आवाजांच्या कितीतरी पिढ्या आल्या आणि गेल्या, तरी मुकेश यांच्या जुन्या ध्वनिमुद्रणातील तो थरथरणारा स्वर अजूनही हृदयाच्या सर्वांत आतल्या खोलीपर्यंत पोहोचतो. तंत्रज्ञान आवाज स्वच्छ करू शकते; सूर दुरुस्त करू शकते; पण माणसाच्या जखमेची अनुभूती तयार करू शकत नाही.

मुकेश यांच्या आवाजात ती अनुभूती होती.

आणि म्हणून आज त्यांची पन्नासावी पुण्यतिथी ही केवळ मृत्यूची स्मृती नसावी. ती एका स्वराच्या अमरत्वाचा उत्सव असावा.

‘आवारा हूँ’पासून सुरू झालेला तो मुसाफिर कितीतरी रस्त्यांवरून गेला. कधी प्रेमात पडला, कधी मित्राने त्याला दुखावले, कधी जगाच्या हुशारीत तो हरला, कधी देवाशी भांडला, कधी पावसात प्रेम केले, कधी संध्याकाळी एकटा बसला, कधी गेलेल्या दिवसांसाठी व्याकूळ झाला आणि शेवटी स्वतःला ‘पल दो पल’चा समजून शांतपणे निघून गेला.
\
पण काळाने त्याला ‘पल दो पल’चा राहू दिले नाही. पन्नास वर्षांनंतरही त्याची गाणी आपल्या जगण्याच्या प्रसंगांना अर्थ देतात.

कुणाचे प्रेम फुलले की मुकेश आहेत.

कुणाचे प्रेम तुटले की मुकेश आहेत.

मित्राने साथ सोडली की मुकेश आहेत.

जग अन्यायकारक वाटले की मुकेश आहेत.

संध्याकाळी अचानक मन उदास झाले की मुकेश आहेत.

आयुष्य सुंदर वाटले की ‘सुहाना सफर’चे मुकेश आहेत.

आयुष्य क्षणभंगुर वाटले की ‘एक प्यार का नगमा है’चे मुकेश आहेत.

आणि एक दिवस आपणही निघून जाणार आहोत, ही जाणीव झाली की ‘एक दिन बिक जायेगा’चे मुकेश आपल्या खांद्यावर हात ठेवून उभे आहेत.

मातीने पन्नास वर्षांपूर्वी मुकेश यांचा देह स्वीकारला. पण काळाला त्यांचा स्वर गिळता आला नाही. कारण काही आवाज गाणे संपल्यावर शांत होतात. काही आवाज गाणे संपल्यानंतर आपल्या आठवणीत थोडा काळ राहतात. आणि काही मोजके आवाज असे असतात की गाणे संपल्यावरच ते आपल्या आत खऱ्या अर्थाने सुरू होतात. मुकेश यांचा आवाज त्यापैकीच एक !

मुकेश गात आहेत. पन्नास वर्षांनंतरही.

आणि जोपर्यंत माणसाच्या हृदयात प्रेम, विरह, आठवण, करुणा आणि जगण्याचा प्रश्न शिल्लक आहे—

तोपर्यंत मुकेश गातच राहतील. मुकेश कधीही जाणार नाहीत. मुकेश देहाने गेले तरी शब्दांमुळे कधीही मरणार नाहीत.

इक दिन बिक जायेंगा माती के मोल ।

जग मे रह जायेंगे प्यारे तेरे बोल ।

आणि याच बोलांनी त्यांना अमर केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top